मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते, पण…: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितली ‘मन की बात’

0
427
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावे असे मलाही वाटते. माझीही इच्छा असणारच. परंतु आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रिपद आलेले नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली आहे. पाटील यांनी केलेल्या या विधानाची आता राजकीय वर्तुळाबरोबरच समाज माध्यमांवरही जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

राज्याच्या राजकारणात विशिष्ट उंचीवर पोहोचलेल्या कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असतेच. तशी इच्छा असण्यात गैर काहीच नाही, परंतु प्रत्येकच नेत्याची ही इच्छा पूर्ण होतेच, असेही नाही. काही जणांच्या वाट्याला तर इच्छा नसतानाही अशी महत्वाची पदे येतात. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे त्याचेच चांगले उदाहरण आहे. त्यामुळे जयंत पाटलांनी मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते, असे म्हणण्यात गैर काहीच नाही, परंतु त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थही काढले जाऊ लागले आहेत.

इस्लामपूरमध्ये एका यूट्यूब चॅनेलने जयंत पाटील यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी आपली सुप्त इच्छा बोलून दाखवली. या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची तुमची इच्छा आहे का?, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरात जयंत पाटील म्हणाले की, अजून आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद आलेले नाही. माझीही इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावेसे वाटणारच. पण पक्ष म्हणजे शरद पवार जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो, असे जयंत पाटील म्हणाले.

इच्छा आहे. मला वाटते सगळ्यांनाच असेल. एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची संख्या ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणे शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. पक्ष मोठा झाला… संख्या वाढली तर शरद पवार जो निर्णय घेतील तो, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांची ही मुलाखत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. सध्या महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेच्या आमदारांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे पाच वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहील, दुसऱ्या क्रमांकाची आमदार संख्या असलेल्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद राहील, असे महाविकास आघाडी स्थापन करतानाच ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या पाच वर्षांत तरी जयंत पाटलांची ही सुप्त इच्छापूर्ती होण्याची शक्यता दिसत नाही. असे असले तरी पाटलांची ही मुलाखत चर्चेत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा