मोठा यू-टर्न: ‘मैंही पिछे हट जाती हूं’ म्हणत धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माची माघार?

0
5204
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप करणारी गायिका तरूणी रेणू शर्मा आपणच या प्रकरणात फसत चालल्याचे दिसू लागताच तिची भाषा बदलली असून आता मीच माघार घेत आहे, जशी तुमची इच्छा आहे, असे म्हणत तिने हे प्रकरण आता फार ताणून न धरण्याची मानसिकता केली असल्याचे संकेत दिले आहेत.

धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केला आणि लैंगिक शोषण केल्याची तक्रार रेणू शर्मा या महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर तिने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आणि तिने ते स्वतःच ट्विट केले. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाते की काय अशीही शक्यता निर्माण झाली होती. भाजपने तर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

हेही वाचाः धनंजय मुंडेंचे मंत्रिपद वाचले; भाजपने ऐनवेळी ‘मनसे’ दिलेली साथ आली कामी!

मात्र, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करणारी महिला प्रतिष्ठितांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करणारी असल्याची तक्रार आंबोली पोलिस ठाण्यात दिली. त्या पाठोपाठ मनसेचे नेते मनीष धुरी यांनीही अशीच तक्रार केली आणि या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. ही महिला आपणाला ब्लॅकमेल करत असल्याच्या मुंडेंच्या आरोपांना या दोघांच्या आरोपांमुळे पुष्ठी मिळाली आणि मुंडेंच्या बाजूने वातारवण तयार होऊन त्यांच्या मंत्रिपदावर आलेले बालंटही टळले.

हेही वाचाः एमआयएम आता पश्चिम बंगालमध्ये आम्हाला मदत करेलः भाजप खासदार साक्षी महाराजांचे वक्तव्य

या सगळ्या पार्श्वभूमीवर रेणू शर्माने काही ट्विट्स केले आहेत. एक काम करा. सर्व निर्णय तुम्हीच घ्या. काहीच माहीत नसताना तुम्ही सर्वजण आणि जे मला ओळखतही नाहीत तेही चुकीचे आरोप करत आहेत. तर तुम्ही सगळे मिळून ठरवा. मीच मागे हटते. जशी तुमची सर्वांची इच्छा आहे, असे रेणू शर्माने म्हटले आहे.

जर मी चुकीची होते तर एवढे लोक आतापर्यंत माझ्याबद्दल बोलायला का आले नाही? मी माघार घेतली तरी मला माझ्या स्वतःवर गर्व असेल की, संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच लढत होते. मी कोणत्याही राजकीय पक्षाचे नावही घेतले नाही तरी मला हटवण्यासाठी आणि पाडण्यासाठी एवढ्या लोकांना यावे लागले आहे. आता तुम्हाला सर्वांना मिळून जे काही लिहायचे आहे ते लिहा. देव तुमचे भले करो, असे रेणू शर्माने म्हटले आहे.

मुंडेच्या मेव्हण्याचीही रेणू शर्माविरोधात तक्रारः दरम्यान, धनंजय मुंडे यांचे मेव्हणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी नोव्हेंबरमध्ये रेणू शर्माच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती, अशी माहितीही आता पुढे येत आहे. रेणू शर्मा ही धनंजय मुंडे यांना अनेक वर्षांपासून ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे धनंजय मुंडे डिप्रेशनमध्ये गेले होते. असे केंद्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे. केंद्रे यांनी मुंबईत ही तक्रार दाखल केली. नोव्हेंबरमध्ये ही तक्रार देऊनही पोलिसांनी त्यावर अद्याप कारवाई केली नाही, असेही आता पुढे येऊ लागले आहे. पुरुषोत्तम केंद्रे हे मुंडे यांचे मधवे मेव्हणे असून ते पुण्यात बांधकाम व्यवसाय करतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा