ब्रिटनहून औरंगाबादेत आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणेची उडाली झोप

0
3369
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबादः ब्रिटनहून औरंगाबादेत आलेली एक ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून तिला ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनची लागण तर झालेली नाही ना, याच्या तपासणीसाठी या महिलेच्या लाळेचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून हळूहळू सुटका होऊ लागलेल्या औरंगाबादकरांच्या चिंतेत भर पडली असून आरोग्य यंत्रणा खडबडून जागे झाली आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद महापालिकेने ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. आतापर्यंत ४४ नागरिक ब्रिटनमधील लंडनमधून शहरात दाखल झाल्याचे समोर आले आहे. यातील एका ५७ वर्षीय महिलेची गुरुवारी कोरोना चाचणी केली होती. तिचा अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. या महिलेला ब्रिटनमधील नवीन विषाणूची तर  लागण झालेली नाही ना, याची तपासणी करण्यासाठी महिलेच्या स्वॅबचे नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

हेही वाचाः ब्रिटनहून औरंगाबादेत आलेले १३ जण आरोग्य यंत्रणेला सापडेनात, पोलिसांची मागितली मदत

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन घातक विषाणू निघाल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनमध्ये तर या नवीन विषाणूची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे ब्रिटनची विमानसेवा तातडीने बंद करण्यात आली आहे. तसेच राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्य सरकारने नवीन कोरोना विषाणूची खबरदारी घेण्यासाठी महिनाभरात ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा आयुक्त सुनील चव्हाण यांच्या आदेशावरुन महापालिकेने २५ नोव्हेंबर नंतर ब्रिटन येथून शहरात आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे.

नवीन कोरोना विषाणूची भिती असल्यामुळे पालिकेने तातडीने ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. तसेच यातील पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांसाठी धूत हॉस्पीटलमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली आहे. हा स्वतंत्र वॉर्ड राहणार असून या वॉर्डात कोरोना पॉझिटिव्ह दाखल असलेल्या रुग्णांशी संपर्क होवू दिला जाणार नाही. असेही डॉ.पाडळकर यांनी स्पष्ट केले.

१५ डिसेंबर रोजी आली शहरातः १५ डिसेंबर रोजी ब्रिटनमधील लंडन येथून एक महिला शहरात दाखल झाली. या महिलेने गुरुवारी सकाळी बन्सीलालनगर येथील आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करुन घेतली. आज या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या महिलेला नवीन कोरोना विषाणूची लागण झालेली आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी महिलेच्या लाळेचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणूजन्य प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठविले आहेत, असे आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

आजवर ४४ नागरिक ब्रिटनहून शहरातः विमानतळ प्राधिकरणाकडून प्राप्त प्रवाशांची यादी ४४ वर गेली आहे. २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान शहरात ४४ नागरिक ब्रिटन येथून आले आहेत. त्यापैकी ११ जणांची आरटीपीसीआर पध्दतीने कोरोना चाचणी केली असून ही महिला वगळता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील काहीजण परत देखील गेले असून काही बाहेरच्या जिल्हयातील आहेत. शहरात आलेल्या नागरिकांची माहिती घेवून त्यांच्याशी संपर्ककेला जात आहे. असेही डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा