व्हिडीओः भाजप पदाधिकाऱ्याचा महिलेवर ‘डोळा’: पुंडलिकनगरात भिडल्या शिवसेना-भाजप कार्यकर्त्या

0
703

औरंगाबादः भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या महिलेला अश्लील शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी भाजपचा जिल्हा सचिव अशोक दामले व त्याच्या पत्नीविरोधात औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज पोलिस ठाण्यावर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी शिवसेना आणि भाजपच्या महिला कार्यकर्त्या समोरासमोर भिडल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

२९ वर्षीय महिला न्यू हनुमाननगरातील गल्ली नंबर २ मध्ये भाड्याने खोली करून राहते. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता २९ ऑगस्ट रोजी घरासमोर झाडू मारत होती. या महिलेच्या घरासमोरच राहणारी अशोक दामलेची पत्नीही झाडू मारत होती. त्यावेळी दामलेंच्या पत्नीने या महिलेला उद्देशून अश्लील शिविगाळ सुरू केली. त्याचा जाब विचारत पीडित महिलेने दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा स्वतःचा पती काय करतो ते बघा, असे पीडित महिलेने म्हटल्यानंतर दामलेच्या पत्नीने आवाज देऊन अशोक दामलेला बोलावले. अशोक दामले हातात स्टील रॉड घेऊन बाहेर आला आणि अश्लील शिवीगाळ करत त्याने महिलेला मारहाण केली. या मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली. महिलेच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिसांनी दामले व त्याच्या पत्नीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार कळल्यानंतर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आज पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धडक दिली आणि पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी केली. यावेळी शिवसेना-भाजपच्या महिला कार्यकर्त्या समोरासमोर आल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पीडित महिलेचे दामलेवर गंभीर आरोप-म्हणाली न्याय द्या अन्यथा आत्महत्याः  मी एक वर्षापासून त्या रूममध्ये भाड्याने राहते. सहा महिन्यापासून अशोक दामले मला ट्राय करत होता. मी नाही म्हटले. त्याचे लक्ष या बाईवर आहे, असे त्याच्या पत्नीला कळले. तेव्हापासून ती बाई माझ्याशी वाद घालू लागली. विनाकारण माझी बदनामी करू लागली. ही बाई फालतू असल्याचे कुणालाही सांगू लागली. अपशब्द वापरू लागली. २९ तारखेला मी झाडू मारत असताना तिने माझ्याशी वाद घातला. तिचा माझा वाद सुरू असताना त्याने मला स्टीलच्या रॉडने येऊन मारहाण केली. मी बेशुद्ध झाले. तर मी दारू पिलेली आहे, बेशुद्ध झालेली आहे, असे तो लोकांना सांगत होता. माझे तीन लेकरे आहेत. माझ्या तोंडातून फेस येताना मला सोडवायला कुणी मध्ये पण आले नाही. भाडेकरू आहे म्हणून एवढा अत्याचार का? माझे कुणी लोकलचे नाही म्हणून मला एवढा त्रास का? आता माझ्या सासू-सासरे नातेवाईकांनी माझा सोडला. येऊ नको, आम्हाला कलंक लागला असे म्हणत आहेत. सोशल मीडियावर काहीही अपशब्द वापरून त्याने माझी बदनामी केली. व्हिडीओ सेंड केला. माझे शिक्षण नाही. मी आठवी पास आहे. मी पंधरा वर्षांपासून इथे राहते. माझी मागणी फक्त एकच आहे, मला न्याय भेटला पाहिजे. मला न्याय भेटला नाही तर तीन लेकरांसह मी रॉकेल टाकून आत्महत्या करीन. कारण आज मी पूर्णतः बरबाद झालेले आहे. मला कलंक लागलेला मिटला पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे. नाही तर मी तीन लेकरांसह फाशी घेईन किंवा रॉकेल टाकून आत्महत्या करीन. त्याला कारणीभूत दामले परिवार आणि त्याला सपोर्ट करणारे सर्वजण भाजप कार्यकर्ते राहतील, असे पीडित महिलेने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या महिलेचा व्हिडीओ न्यूजटाऊनकडे उपलब्ध आहे, परंतु तिची ओळख सार्वजनिक होऊ नये म्हणून आम्ही तो प्रसिद्ध करणे टाळले आहे. मात्र पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धडक देऊन शिवसेनेच्या रणरागिणींनी जाब विचारल्यानंतर तेथे भाजपच्या कार्यकर्त्याही आल्या आणि दोन्ही पक्षाच्या महिला कार्यकर्त्या अशा भिडल्या, त्याचा हा व्हिडीओः

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा