औरंगाबादेत 22 नोव्हेंबरपासून तीन दिवस जागतिक बौद्ध धम्म परिषद, दलाई लामांची प्रमुख उपस्थिती

0
438

औरंगाबाद : जागतिक किर्तीचे बौध्द धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत 22 ते 24 नोव्हेंबर असे तीन दिवस जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेची सध्या जोरात तयारी सुरू आहे. या धम्म परिषदेला 13 देशांमधील बौध्द भिक्खू उपस्थित राहणार आहेत. राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या पत्नी रोजना व्हॅनीच कांबळे यांच्या पुढाकारातून ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. नागसेन वनातील पीईएसच्या स्टेडियमवर होत असलेल्या या धम्म परिषदेत जगभरातील बौद्ध भिक्खू पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या धम्म परिषदेत अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक पूज्य भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा, भदन्त बोधिपालो महाथेरो (लोकुत्तरा), भदन्त चंदिमा (सारनाथ), भदन्त मैत्री महाथेरो (नेपाळ), भदन्त संघदेसना (लडाख), भदन्त शिवली (श्रीलंका), भदन्त वॉनसन साऊथ (कोरिया), भदन्त प्रधामबोधिवाँग, भदन्त प्रहमा केयरती श्रीउथाना (थायलंड), भदन्त पीच सेम (कम्बोडिया) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, 22 नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता होईल. यावेळी १३ देशांतील प्रमुख भिक्खू, विचारवंतांची प्रमुख उपस्थिती असेल. शनिवारी व रविवारी पहाटे ६ ते ८ या वेळात पीईएसच्या मैदानावर विपश्यना होईल. ज्येष्ठ भदन्त हे उपासक- उपासिकांना विपश्यनेचा सप्रयोग अर्थ उलगडून दाखवतील.


‘‘ प्रबुद्ध व्यक्ती, कुटुंब आणि पर्यायाने प्रबुद्ध भारताची निर्मिती करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जागतिक धम्म परिषद एक माध्यम ठरावे, हेच या परिषदेचे अंतिम ध्येय आहे. संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सिद्ध झाले पाहिजे.’’
-डॉ. हर्षदीप कांबळे, संयोजक

शनिवारी सकाळी ९ ते १२  या वेळेत चौका येथील लोकुत्तरा महाविहारात फक्त बौद्ध भिक्खूंसाठी संवाद सत्र होणार आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘बौद्ध संस्कृती आणि जीवन जगण्याचा मार्ग’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५.३० ते रात्री ९.३० या वेळेत ‘बुद्धाने दिलेली शिकवण’ याचे विवेचन व विश्लेषण जगभरातून आलेले ज्येष्ठ भिक्खू करणार आहेत. हे दोन्ही परिसंवाद व चर्चा पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून, ते सर्वांसाठी खुले आहेत. दुपारी १ वाजेपासून ३ वाजेपर्यंत युवकांसाठी एक सत्र होणार आहे. दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत उपासक -उपासिका व त्यांच्या कुटुंबासाठी एक स्वतंत्र सत्राचे आयोजन केले आहे. ५.३० वाजता परिषदेचा सांगता समारंभ होईल. रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. त्यानंतर परिषदेची सांगता होईल.

24 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता दलाई लामांची धम्मदेसना : या जागतिक धम्म परिषदेत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत जागतिक किर्तीचे बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांचे बुद्धांनी दिलेल्या प्रेम, शांती, प्रज्ञा, शील, करूणा, अहिंसा, सामाजिक बंधुभाव या सर्वोच्च जीवनमूल्यांवर आधारित धम्मदेसना होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा