पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे का? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्राच्या जनतेला सवाल

1
669
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सगळे उघडून दिले म्हणून कोरोना गेला असे समजू नका. दिवाळीनंतर गर्दी वाढली आहे. काही लोक सर्रास मास्क न लावता फिरत आहेत. दिल्ली आणि पाश्चिमात्य देशांत कोरोनाची दुसरी- तिसरी लाट आली आहे. ही लाट त्सुनामी आहे की काय अशी भीती वाटत आहे. या परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे आहे का? महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे नसेल तर सावधगिरी बाळगा. अनावश्यक ठिकाणी जाऊ नका, मास्क वापरा, वारंवार हात धुवा आणि अंतर राखा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुन्हा एकदा रात्रीचा कर्फ्यू लावा, असे सूचवत आहेत. अनावश्यक ठिकाणी जाऊ नका. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. लक्षणे दिसली तर चाचणी करून घ्या. दिल्ली आणि पाश्चिमात्य देशात ही लाट आली आहे. तिकडे उभारलेली आरोग्य यंत्रणा अपुरी पडते आहे. रूग्ण संख्येच्या तुलनेत डॉक्टर, नर्सेस कमी पडले तर आपणाला कुणीही वाचवू शकणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

सहकार्य करता आहात म्हणून जो आकडा फुगत चालला होता, तो खाली जरूर आणला. दिवाळीनंतर गर्दी वाढली आहे. कोरोनाचे संकट अजिबात गेलेले नाही. पाश्चिमात्य देशात गांभीर्याने घेतली गेलेली आहे. दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. ही दुसरी- तिसरी लाट त्सुनामी आहे की काय असे वाटते आहे. आपल्या यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. सेवा करणे हे त्यांचे काम असले तरी त्यांना सहकार्य करणे, त्यांच्यावरील ताणतणाव वाढू नये याची काळजी घेणे हे आपले काम आहे. गर्दी एवढी वाढली की कोरोना चेंगरून मेला की काय असे  पुण्यात अजित पवार म्हणाले. गर्दीने कोरोना मरणार नाही, तर वाढणार आहे, असे ठाकरे म्हणाले.

लस अजून हाती आलेली नाही. डिसेंबरमध्ये लस आलीच तर महाराष्ट्रात १२-१२.५ कोटी लोकसंख्या आहे. २४-२५ कोटी जनतेला आपणाला हे लसीकरण करावे लागणार आहे. एवढ्या जनतेला लस द्यायला किती काळ जाईल. ती लस कोणत्या वातावरणात ठेवायची हेही माहीत नाही. त्यामुळे कोरोनापासून चार हात लांबच रहा. मास्क वापरा, हात धुवा, अंतर राखा या त्रिसूत्रीचे पालन करा, असेही ठाकरे म्हणाले.

आता चार दिवसांवर कार्तिकी येते. कृपा करा कालच्या दिपावलीच्या पाडव्याला प्रार्थनास्थळे उघडली आहेत. याही ठिकाणी गर्दी करू नका. कार्तिकीची वारी गर्दी न करता भक्तीभावाने साजरी करू. आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत आशा, अंगणवाडी सेविका, पोलिस, महसूल यंत्रणा यांनी अफाट काम केले. जनजागृतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा तयार झाला. महाराष्ट्राचे आरोग्य कसे आहे, हे कळले. आठ- पंधरा दिवसांतून त्यांची चौकशी करण्यास सांगितले आहे, असेही ठाकरे म्हणाले.

आताच्या लाटेत तरुणही संक्रमितः आता जी लाट आलेली आहे, त्यात तरूणही संक्रमित होत आहेत. आपण घरी ज्यांना ज्येष्ठांना आतापर्यंत जपून ठेवले आहेत, त्यांनाच आपल्या तरुणांकडून कोरोनाची लागण झाली तर काय होईल?, सध्या आपण धोक्याच्या वळणावर आहोत. त्यापासून सावध रहा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पोस्ट कोविडचे साइड इफेक्ट्सः पोस्ट कोविडचे साइड इफेक्ट्स मेंदू, किडनी, श्वसन संस्थेवर होत आहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा घ्यायची? व्हॅक्सीन येईल तेव्हा येईल. अँडिबॉडीज असल्या तरी कोरोना होतो की काय यावरही संशोधन सुरू आहे. अनेक जण मास्क घालत आहेत. बरेच जण विनामास्क फिरत आहेत. गर्दी करून विनाकारण कोरोना ओढवून घेऊ नका, असे ठाकरे म्हणाले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा