देशातील कोणत्याही शहरातून तुम्हाला करता येणार तुमच्या मतदारसंघात मतदान!

0
338
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः मतदार म्हणून तुमची कुठेही नोंदणी झालेली असली आणि मतदानाच्या दिवशी तुम्ही देशातील कोणत्याही शहरात असाल तरीही आधार लिंक्ड इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीमुळे तुम्हाला तुमचा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. निवडणूक आयोग आयआयटी-मद्रासच्या साह्याने अशी प्रणाली विकसित करत आहे.

आयआयटी-मद्रास पुढील महिन्यात निवडणूक आयोगासमोर हे नवे मॉडेल सादर करणार असून त्याला मंजुरी मिळाली तर या नव्या प्रणालीचे प्रोटोटाइप या वर्षाअखेरपर्यंत किंवा पुढील वर्षी तयार केले जाईल, अशी माहिती निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली. निवडणूक आयोगाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला तर निवडणूक कायद्यात दुरूस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोग विधी मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करणार आहे.

ही नवी प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर मतदारांना देशातीलच नव्हे तर परदेशातीलही कोणत्याही ठिकाणाहून मतदान करता येणार आहे. उदाहरणार्थः मुंबईमध्ये नोंदणी झालेला मतदार मतदानाच्या दिवशी हैदराबादमध्ये असेल तर मतदानाच्या दिवशी त्याला किंवा तिला हैदराबादमधील निर्धारित मतदान केंद्रावर जाऊन तो किंवा ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावू शकेल. पहिल्या टप्प्यात अशा रितीने मतदान करण्यासाठी प्रत्येक शहरात काही ठराविक मतदान केंद्रांवर मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली तर परदेशात असलेले मतदारही अशाच पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील, असे सक्सेना यांनी सांगितले.

आयआयटी-मद्रास ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून टु-वे रिमोट व्होटिंग प्रणाली विकसित करत आहे. ही मतदान प्रणाली स्वतंत्रपणे काम करू शकणार नाही. तिचे निवडणूक आयोगाच्या ईआरओ नेट प्रणालीशी इंटिग्रेशन करावे लागणार आहे. त्यामुळे एखाद्या मतदाराने रिमोट पद्धतीने मतदान केले तर मतदान यादीत त्याची लगेच नोंद होईल, असे सक्सेना म्हणाले. निवडणूक आयोगाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा नोकरदार मतदारांसाठी वन-वे इलेक्ट्रॉनिक प्रणाली वापरली होती. त्यामुळे एकूण मतदानात वाढ होऊन ते ६०.१४ टक्क्यांवर पोहोचले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा