नौटंकी टाळा आणि आत्मपरीक्षण कराः खा. सुजय विखे पाटलांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले

0
1268
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना रेमडेसिवीर वाटप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगले फटकारले आहे. तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानातून उतरल्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन उतरवताना व्हिडीओ काढण्याचे आणि मतदारसंघातील लोकांसाठी मी कशा प्रकारे वजन वापरून दिल्लीतून इंजेक्शन आणल्याचे सांगण्याची नौटंकी टाळायला पाहिजे होता, अशा शब्दांत खंडपीठाने खा. सुजय विखे पाटील यांना फटकारले आहे.

न्या. रविंद्र घुगे आणि न्या. बी.यू. देबडवार यांच्या खंडपीठापुढे खा. सुजय विखेंच्या रेमडेसिवीर प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली. खा. सुजय विखे पाटील यांनी बेकायदेशीररित्या रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवले आणि चार्टर विमानाने आणले, या प्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान खंडपीठाने खा. सुजय विखे पाटील यांना चांगलेच फटकारले.

खा. विखे पाटील यांच्यावतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी बाजू मांडली. सुजय विखे पाटील हे प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहेत. खा. पाटील हे न्युरोसर्जन होते. त्यांच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पीटलचे ‘रातोरात उभारलेली संस्था’ असे चित्र चुकीच्या पद्धतीने उभे केले जात आहे, असे गुप्ते म्हणाले.

तुमच्या पक्षकाराला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानात आणि विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची नौटंकी केली नाही का? विमानातून बॉक्सेस उतरवतानाचे फोटोग्राफ्स आणि व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांनी तुमच्यासाठी दिल्लीहून माझे वजन वापरून हे औषध आणले आहे, असे सांगण्याची नौटंकी केली. त्यांनी हे टाळायला पाहिजे होते, असे न्या. रविंद्र घुगे म्हणाले.

गुप्ते यांनी सहमती दर्शवत खा. सुजय विखे यांनी लोकांना मदत करण्यासाठी चार्टर विमानाने रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या व्हायल आणल्या. त्यांची ही कृती कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी नाही, असा युक्तीवाद गुप्ते यांनी केला. एका तरूण माणसाने मारलेली ही फुशारकी आहे, हे मला मान्य आहे, परंतु ती गुन्हेगारी कृती नाही, असेही गुप्ते म्हणाले. त्यावर जर चांगले करण्याची प्रक्रियाच बेकायदेशीर असेल तर त्याचा हेतू चांगला होत नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

या याचिकेची जनहित याचिका म्हणून सुनावणी घ्यायची की क्रिमिनल पीटीशन म्हणून हे अद्याप ठरवलेले नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी बुधवारी सविस्तर सुनावणी घेतली जाईल. आम्हाला घाईत निर्णय घ्यायचा नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मागच्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना खा. सुजय विखे यांनी शिर्डी विमानतळावर उतरवलेले रेमडेसिवीरचे बॉक्सेस शोधून काढण्याचे निर्देश दिले होते.

खा. सुजय विखे पाटील यांनी चंदीगडहून रेमडेसिवीरच्या १० हजार व्हायल आणल्या नाहीत तर केवळ १,२०० व्हायल आणल्या आहेत, असे ऍड. गुप्ते यांनी न्यायालयास सांगितले. चंदीगडहून आणलेले सर्व इंजेक्शन्स जिल्हा शल्य चिकीत्सकांना देण्यात आले आहेत, असेही गुप्ते म्हणाले. अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी पुण्याच्या एका कंपनीला रेमडेसिवीरच्या १,७०० व्हायल्सची ऑर्डर दिली होती. कंपनीने फक्त ५०० व्हायल्स दिल्या. खा. पाटील यांच्या प्रतिष्ठानने जिल्हा शल्य चिकित्सकांना १,७०० व्हायल्सचे १८,१४,४०० रुपये दिले आणि खा. पाटील यांनी कंपनीच्या चंदीगड येथील युनिटमधून उर्वरित व्हायल्स फक्त आणले, असा युक्तीवादही गुप्ते यांनी केला.

 याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना सरकारी अधिकारी आता मागच्या तारखेतील रेकॉर्ड तयार करत आहेत. हे इंजेक्शन्स खरेदी करण्यात कोणतीही अनियमितता नाही, हे दाखवण्याचा आता प्रयत्न होत आहे, असा युक्तीवाद ऍड. प्रज्ञा तळेकर यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी आता ५ मे रोजी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा