पैठणः औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरण ताजे असताना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुन्हा एका पंचवीस वर्षीय युवकाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. शहरातील गंगवेश्वर महादेव मंदिरात कटरने त्याच युवकाने गळा चिरल्याने महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे हा खून आहे की त्या युवकाने स्वत:चा गळा कापला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे पैठणमध्ये खळबळ उडाली आहे.
पैठण शहरातील शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात पिंडीजवळ कहारवाडा येथील रहिवासी नंदू देविदास घुंगासे या पंचवीस वर्षीय युवकाचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा सडा सांडला होता. या युवकाचा गळा कटरने कापला गेला असून त्याच्या हाताची बोटेही कापली गेल्याने त्याने स्वत:च गळा कापला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
मयत हा धार्मिक वृत्तीचा असल्याचेही म्हटले जात आहे. मात्र हा प्रकार खून आहे की आत्महत्या हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, गोपाळ पाटील, चालक कल्याण ढाकणे हे घटनास्थळी दाखल झाले. रक्तबंबाळ आणि गंभीर जखमी अवस्थेतील या युवकाला पोलिसांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले.
जिल्हा ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नि. भागवत फुंदे, खांडेभराड, राहुल पगारे हे पैठणमध्ये दाखल झाले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या ठिकाणी हा मृतदेह सापडला त्या महादेव मंदिरात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम वारे यांच्या पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला मयत युवकाच्या नातेवाईकांनी सरकारी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.