गटारापासून गॅस काढण्याच्या ‘मेड इंडिया’ उचापती!

0
51
प्रतिकात्मक छायाचित्र.

चीनमुळे भारताचे अडते पण भारतामुळे चीनचे अडत नाही. कारण नवीन वस्तू बनवण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्यात भारतीय उद्योजक व गुणवत्ताधारकांना रस नाही. त्यांना आयत्या बिळात नागोबा होणेच सोयीचे व फायद्याचे वाटते! सर्वसामान्य नागरिकांची मोठी गोची होते. चीनचा माल नाकारावा तर भारतीय भांडवलदारांकडून आर्थिक शोषण, त्यांच्याच साथीने विषमतावाद्यांकडून सामाजिक शोषण, चीनचा माल स्वीकारावा तर स्वदेशीच्या नावाखाली मानसिक शोषण!

  • संदीप बंधुराज

‘चीनने एक छोटा रॉड बनवला आणि जगातल्या वेगवेगळ्या देशातील लोकांना बोलावले आणि डोके लावायला सांगितले. कुणी रॉडची लांबी व जाडी कमी केली. कुणी त्याला टोक काढले. कुणी त्या रॉडला मागे छिद्र काढले. त्यामुळे त्याची बनली सुई. आता त्यात आपल्या भारताचे दामोदरपंतही होतेच. त्यांनी या सुईवर ‘मेड इन इंडिया’ लिहून आपली ‘गुणवत्ता’ दाखविली….!’ शालेय जीवनात मी हा विनोद ऐकला होता. त्यावेळी त्यात फक्त गंमत वाटत होती आता मात्र त्यातील गांभीर्य लक्षात येत आहे….! आज चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची जी आरोळी मारली जात आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर या विनोदातील सत्यता लक्षात घ्यायला हवी!

‘आपल्या दोन्ही बाजूला विषारी साप आहेत’ अशी पुंगी वाजवून सरकारकडून आपल्याच नागरिकांना एकीकडे नाचवले जाते. तर दुसरीकडे सरकार या सापांना ओवाळताना दिसतात! कधी पाकिस्तान-कधी चीन! त्यामुळे सरकार सुतळीला साप साप म्हणून बडवते की काय असा प्रश्न पडतो. त्याचवेळी सीमेवर जवानांना जीवही गमवावा लागतो. या सर्वात सर्वसामान्य भाबडा नागरिक गोंधळून जातो. सत्तेत नसताना याबाबत वल्गना करणारे सत्तेत येताच पप्पी नि झप्पीमध्ये सुख मानू लागतात. विद्ममान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही याला अपवाद नाहीत. २०१३ मध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी माजी सैनिक व अधिकाऱ्यांच्या उपस्थित ‘केंद्रात सक्षम सरकार आले की मग पाकिस्तान आणि चीन आपल्याला डोळे दाखवू शकणार नाहीत,’ असे तडाखेबाज वक्तव्य केले होते. त्यावेळी माजी सैनिकांचा उर भरुन आला असेल, पण आता डोळे भरुन येत असतील! तोही जुमलाच होता हे जेव्हा ते पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याच्या वाढदिवसाला ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ बनून गेले तेव्हा आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षासाठी त्यांनी भारतात दोनदा पायघड्या घातल्या तेव्हाच लक्षात आले. ज्या चीनचे हात आमच्या जवानांच्या रक्ताने माखले आहेत, त्या चीनच्या राष्ट्राध्यक्षाच्या हातात हात देण्यासाठी मोदी पाच वेळा चीनला जावून आलेत. पुढचेही नियोजन जाहीर केलेले आहे. त्यांनी कमीत कमी गोळवलकरांचे तरी मानावे! संघाचे गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात ‘देशाचे तीन प्रमुख शत्रू म्हणजे चीन, पकिस्तान आणि कम्युनिस्ट’ असे मार्गदर्शन केले आहे. गोळवलकर यांना ‘गुरुजी’ मानणाऱ्या मोदींनी खरे तर २०१४ मध्येच चीनचा काटा काढायला हवा होता. पण २०१७ मध्ये चीनने डोकलाममध्ये घुसखोरी केल्यानंतरही २०१८ मध्ये त्यांनी चीनकडूनच तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्च करुन वल्लभभाई पटेलांचा भलामोठ्ठा पुतळा बनवून घेतला. (विशेष म्हणजे पटेलांनी जेव्हा संघावर बंदी घातली होती त्यावेळी गोळवलकरच सरसंघचालक होते, मला तर हा शिष्याने गुरुचा केलेला अपमानच वाटतो! गुरुच्या अपमानाचा पुतळा!) सबब, चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याची आरोळी हा काही नवीन विषय नाही.

गोळवलकरच नाही तर टिळकांनीही १९०५ मध्ये स्वदेशीचा नारा दिला होता. या दोघांच्याही विचारांना ना पूर्वीच्या ‘लोकल’ सरकारांनी भाव दिला ना आताचे ‘ग्लोबल’ सरकार देत आहे. सर्वसामान्य भारतीयाच्या मनात आपल्या जवानांबद्दल ज्या भावना असतात त्याच्याशी राजकारण्यांना काहीच देणेघेणे नसते. त्यांना त्यावरही आपली पोळी भाजून घ्यायची असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका चीनचे संबंध ताणले गेल्याचे दिसले नि तोपर्यंत ‘लॉकडाऊन’ असलेली भक्तमुखे चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा प्रचार करण्यासाठी ‘अनलॉक’ झाली. त्यात गलवानच्या घुसखोरीची भर पडली. तेथे वीस जवानांच्या शहादतचे निमित्त घेवून आपला जुनाच अजेंडा राबवण्याची ही कुनिती आहे, राष्ट्रप्रेम वगैरे काही नाही!

खरेच आज ही बंदी शक्य आहे का? तर याचे उत्तर स्वत:च्या डोक्याने विचार करणारे सर्वच अभ्यासक ‘नाही’ असेच देतात. याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील बहुतांश शेटजी आणि दामोदरपंत फेम गुणवत्ताधारक केवळ जोडतोड (Assemble) करुन ‘मेड इन इंडिया’चे लेबल लावण्याचा उद्योग वर्षानुवर्षे करत आले आहेत. हे उद्योजक चीनकडून स्वस्त मिळणारा कच्चा माल घेवून ‘ मेड इन इंडिया’चे लेबल लावून पक्का माल इथल्या नागरिकांना महाग विकून लूट करतात. तोच माल जर चीनने थेट बाजारात आणला तर तो नागरिकांना अगदी अर्ध्या किमती एवढा स्वस्त मिळतो. म्हणून मग तोच खरेदी केला जातो ही वस्तुस्थिती आहे.

चीनमुळे भारताचे अडते पण भारतामुळे चीनचे अडत नाही. कारण नवीन वस्तू बनवण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्यात भारतीय उद्योजक व गुणवत्ताधारकांना रस नाही. त्यांना आयत्या बिळात नागोबा होणेच सोयीचे व फायद्याचे वाटते! सर्वसामान्य नागरिकांची मोठी गोची होते. चीनचा माल नाकारावा तर भारतीय भांडवलदारांकडून आर्थिक शोषण, त्यांच्याच साथीने विषमतावाद्यांकडून सामाजिक शोषण, चीनचा माल स्वीकारावा तर स्वदेशीच्या नावाखाली मानसिक शोषण!

जोपर्यंत भारत स्वनिर्भर होणार नाही, तोपर्यंत चीनवर अवलंबून राहण्याची नामुष्की भारतावर राहणार आहे. सरकारची व आयातखोर बड्या मक्खीचुस उद्योजकांची सध्या तरी तशी मन की बात दिसत नाही! खरे तर आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) करारानुसार कुणीच कुणाला व्यापार करण्यास रोखू शकणार नाही. हां, कुणा बेरोजगाराने सुरु केलेल्या चायनीज फुडच्या गाड्या फोडून शौर्य गाजवले जावू शकते! या अशा मोहिमा संपूर्ण देशभर एकाच वेळी कोण राबवते हे आता उघड झालेले आहेच. पण अजूनही नागरिकांचा असा एक  मोठा वर्ग आहे जो अशा मोहिमांना बळी पडून आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतो!

कोरानाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या गेलेल्या इज्जतीकडून लोकांचे लक्ष ‘राष्ट्रीय’ भावनेची गोळी देवून वळवण्यात यशही येत आहे. हा मात्र ‘गटारापासून गॅस’ काढण्याप्रमाणेच शत प्रतिशत ‘मेड इन इंडिया’ उद्योग आहे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा