भगवतीचरण वोहराः स्वातंत्र्य लढ्यातील निधडा क्रांतीकारक

2
81

स्वातंत्र्य संगरातील क्रांतीकारी युवांचा लढा हा इतिहासाचा स्वतंत्र भाग. या लढ्यात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या युवांनी हौतात्म्य पत्करले. या लढ्यात भगवतीचरण वोहरा हे भगतसिंग यांचे महत्वाचे साथीदार. लाहोरच्या तुरूंगातून भगतसिंगांची सुटका करण्यासाठी बॉम्ब बनवण्याच्या प्रयत्नात ते २८ मे १९३० रोजी शहीद झाले. त्यानिमित्त…

कल्पना पांडे

भगतसिंग यांचे महत्वाचे साथी भगवतीचरण वोहरा यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या लाहौर येथे ४ नोव्हेंबर १९०३ रोजी झाला. ते गुजराती ब्राम्हण होते. त्यांचे वडील पंडित शिवचरण वोहरा हे रेल्वेत उच्च पदस्थ अधिकारी होते. इंग्रजांनी त्यांना ‘रायसाहब’ ही मानद पदवी बहाल केली होती. त्यावेळी टंकलेखनाच्या मशीन नसल्याने भगवतीचरणचे आजोबा आग्र्याला उदरनिर्वाहनासाठी लिहिण्याचे काम (किताबत) करायचे. त्यांचे पूर्वज गुजरातवरून आगरा आणि आगरावरुन लाहौर येथे येऊन स्थायिक झालेले होते. वोहरा (संस्कृत उद्गम : व्यूह) या आडनावाचा उर्दू अर्थ व्यापारी देखील होतो. भगवतीचरण यांचा परिवार लाहौरच्या मुस्लिम बहुल भागात ब्राम्हणी काम सोडून धंदा व्यवसाय करत असल्याने त्यांचा आडनाव वोहरा पडले असा अंदाज आहे. भगवतीचरण यांच्या आजोबांविषयीचा एक मजेदार किस्सा आहे. ते त्यावेळी दिवसाला एक रुपया कमवायचे आणि एक रुपया कमाई करून झाली की काम बंद करून टाकायचे. ही गोष्ट दीडशे वर्षे जुनी आहे. अर्थात त्यावेळी आज सारखी असुरक्षितता आणि हाव नव्हती. १९१८ मध्ये जेव्हा ते फक्त १४ वर्षांचे होते त्यांच्या पालकांनी त्यांचे लग्न पाचवीपर्यंत शिकलेल्या ११ वर्षीय दुर्गावतीदेवींशी लावून दिले.

सायन्स विषयांतून इंटर केल्यानंतर भगवतीचरण वोहरांनी असहकार आंदोलनात उडी घेतली. भगतसिंग, सुखदेव आदी देखील या आंदोलनात होते.परंतु चौरीचौराच्या हिंसेनंतर ज्या एकतर्फी पद्धतीने गांधीजींनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे निराश झालेल्या तरूणांत ते देखील होते. त्यानंतर त्यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली. तेथे त्यांची ओळख भगतसिंग व इतर अनेक सहकार्‍यांशी झाली. ते ‘देशाचे पारतंत्र्य व मुक्तिचे प्रश्न’ नावाने अभ्यास गट चालवायचे. भगतसिंग व सुखदेव त्याचे प्रमुख सदस्य होते. १९२३ मध्ये भगतसिंग यांच्या पुढाकाराने नौजवान भारत सभा या संघटनेची स्थापना करण्यात आली. भगवतीचरण हे त्याचे प्रचार सचिव नियुक्त करण्यात आले. नौजवान भारत सभेचे काम लोकांमध्ये क्रांतीकरक विचारांचा प्रसार करणे होते. भगवतीचरण, भगतसिंग, सुखदेव, धन्वंतरी, एहसान इलाही, पिंडीदास सोढी हे सभेचे कार्यक्रम आखण्यापासून सभा करण्यासाठी सतरंज्या लादून फिरणे, टाकणे, उचलणे ही सर्व कामे करायचे. संघटना राजकीय व्याख्यानांव्यतिरिक्त सामाजिक भोज आयोजित करायची. यात सर्व धर्माचे व जातीचे लोक बोलावून खिचडीसारखे साधे जेवण सर्वांनी एकत्र बसून एकमेकांना वाढून खायचे. नौजवान भारत सभेने जाणीवपूर्वक वंदे मातरम, सत-श्री अकाल, अल्लाहू अकबर या धार्मिकछ्टा असलेल्या घोषणांऐवजी इन्कलाब झिंदाबाद, जय हिंद, हिंदोस्तान झिंदाबाद या सर्वसमावेशक व धर्मनिरपेक्ष स्वरुपातल्या घोषणा वापरण्याचे ठरवले.

गदर आंदोलनात १९१४ मध्ये फाशी देण्यात आलेल्या क्रांतिकारी कर्तारसिंह सराभा यांचा एक छोटा फोटो भगतसिंग नेहमी आपल्या खिश्यात ठेवायचे. नौजवान भारत सभेने एकदा धाडस करून सराभा यांचा स्मृती कार्यक्रम लाहोरच्या ब्रॅडले हॉलमध्ये ठेवला. भगवतीचरण यांनी स्वतःच्या पैशातून छोट्या फोटोपासून त्याचे एक मोठे चित्र बनवून घेतले. त्या चित्रावर पांढर्‍या रंगाचा खादीचा पडदा लटकवण्यात आला. यावेळी भगवतीचरण यांच्या मुख्य भाषणाने वातावरण भारावून सोडले. त्यांच्या पत्नी दुर्गावती आणि सुशीलादीदी नावच्या नौजवान भारत सभेच्या छोट्या कार्यकर्तीने आपले बोट कापून त्याच्या शिंतोड्याने तो पांढरा पडदा रंगवला व मरेपर्यंत स्वातंत्र्यासाठी काम करण्याची शपथ घेतली.

दुर्गावती यांनी भगवतीचरण वोहरा यांच्या कामात प्रत्येकवेळी साथ दिली. क्रांतिकारक हालचाळींमुळे भगवतीचरण यांना बर्‍याच वेळी फरार व भूमीगत राहावे लागायचे. या काळात त्यांच्या गैरहजेरीतही भगवतीचारण यांच्या घरी आर्थिक व इतर मदतीसाठी क्रांतिकारकांची ये-जा सुरू असायची. या अनोळखी लोकांना येता-जाता पाहणार्‍यांनी त्यामुळे दुर्गावती यांच्या चारित्र्याबाबच अपचर्चा देखील पसरवल्या. हा अपमान पचवून देखील या दांपत्याने आपल्या घरची दारे नेहमी क्रांतीकारकांना जेवण, शरण व आर्थिक मदतीसाठी खुली ठेवली. त्या दिवसांत लाहोरमध्ये त्यांच्याकडे तीन घरे होती. लाखोंची संपत्ती आणि हजारोंची बँक शिल्लक होती. परंतु त्यांनी या सगळ्या सुखसुविधा नाकारून स्वातंत्र्यासाठी अनेक अडचणीं असलेला क्रांतिकारक मार्ग निवडला. लग्न झाले तेव्हा भगवतीचरण हे त्यांच्या पत्नी दुर्गा यांना साधारण ग्रामीण स्त्री समजायचे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव क्रांतिकारक शचिंद्रनाथ सान्याल यांच्या नावावर शचिंद्र ठेवले. भगतसिंहांचे साथीदार यशपाल आपल्या ‘फांसी के फंदे तक’ या पुस्तकात लिहितात, ‘भगतसिंग यांनी दिल्ली व कानपूर येथे संघटनेचे संपर्क तयार केले होते. काकोरी षड्यंत्रात अटक झालेल्या क्रांतीकारकांना सोडवण्यसाठी योजना तयार केली जात होती. काकोरी अटकेनंतर संघटना कमजोर झाली होती. भगतसिंग पंजाबच्या बाहेर ये जा करायचे आणि पंजाबचे नेतृत्व जयचंद्रच्या हाती देण्यात आले. तो निष्क्रिय होता.’ यशपाल लिहितात की, ‘जयचंद्र अत्यंत घाबरट स्वभावाचा होता. तो कधीही बंदूक गोळ्या हाताळत नव्हता. तो गोळ्याही पिस्तुलाच्या बाहेर काढून ठेवायचा. त्याला नेतृत्वपदी येण्यात भगवती अडचण वाटायचे. कारण त्यांना सक्रियता अपेक्षित होती. भगवतीचरण बराच पैसा संघटनेसाठी खर्च करायचे पण काहीच होत नसल्याने ते कंटाळले होते. त्यांनी हे देखील म्हटले की, अडचणी आम्हाला देखील माहीत पडल्या पाहिजे. त्यांनी जाहीरपणे म्हटले की, जर काही होत नसेल तर आम्ही वेगळे काही तरी करू. जयचंद्रच्या नेतृत्वालाचा आव्हान दिल्याने त्याला भगवतीचरण आडकाठी वाटू लागले.

भगवतीचा राजकीय प्रभाव वाढत होता. पंजाबच्या जुन्या क्रांतीकारकांशी देखील त्यांचे संबंध होते. १९२२ चा सत्याग्रह व्यर्थ वाटल्यानंतर ते त्यावेळी पंजाबमध्ये गुप्तपणे स्थापन करण्यात आलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या जवळ गेले होते. या कम्युनिस्ट पक्षाचा लोकांचा वस्तुतः नंतर भारताच्या कम्युनिस्ट पक्षाशी जवळचा असा संबंध नव्हता. पंजाबचे काही साहसी लोक अफगाणिस्तानमार्गे रशियात गेले होते. त्यांनी वापस येऊन हा गट बनवला होता. ही लोक रशिया आणि युरोपमधून आलेले कम्युनिस्ट साहित्य गुप्तपणे वाटप करायचे. आंदोलनात क्रम व नियोजन नसल्याने जमवण्यात आलेला पैसा असाच खर्च होऊन जायचा. पेशावरहून लाहोरमध्ये येणारी पुस्तके आणि निधि भगवतीचरण यांच्याच घरी यायचा. काकोरीच्या क्रांतीकारकांना सोडवण्यासाठी कट करणारे म्हणून भागवतीचरण आणि यशपालवर वॉरंट काढण्यात आले होते व दोघे फरार होते.

जयचंद्रने परिस्थितीचा फायदा घेत भगवतीचा काटा काढण्यासाठी त्याने अफवा उडवली की भगवती पोलिसांचा खबरी आहे. आंदोलनात उलटतपास करण्याचा वेळ नव्हता. भगवती श्रीमंत होते. त्यांना कुठेही चांगली नोकरी भेटली असती. चांगला व्यापार करू शकले असते. पण त्याची गरज काय? तो तर सीआयडीत नोकरी करतच आहे. तो कोणताही कामधंदा करत नाही. नेहमी दाराच्या आड बसून काही तरी लिहीत असतो. तो यासाठीच राजकीय काम करत आहे जेणे करून सर्व उत्साही क्रांतीकारकांना एकाच वेळी जाळ्यात ओढता यावे, अशा अफवा पसरवण्यात आल्या. लोक या अफवावर विश्वास ठेऊन भगवतीकडे संशयाने पाहू लागले. भगतसिंग यादरम्यान फार विक्षिप्त झाले होते. एकतर त्यांचा जवळचा मित्र पोलिसांचा खबरी बनल्याची बातमी होती. दुसरीकडे जयचंद्र आल्यापासून संघटनेचे काम विस्कळीत झाले होते. रशियन क्रांतीच्या काळात झारची माणसे क्रांतीकारकांना पकडण्यासाठी स्वतः झारविरोधात कट रचायचे. असे उल्लेख सगळ्यांच्या वाचनात आले होते. भागवतीचारण सीआयडीत असल्याचा प्रचार इतका वाढला की, तो नौजवान भारत सभा आणि काँग्रेसपर्यन्तही पोहोचला. सगळीकडे कानावर पडायचे की ‘विश्वस्त सूत्रांकडून हा माणूस खबरी असल्याची माहिती मिळाली आहे’.

काकोरी षड्यंत्रात अटक झालेल्या क्रांतिकारकांना सोडवण्याचा बेत सुरू असताना पंजाबकडून कोणतीही मदत उभी होत नसल्याने त्यांना जेलमधून बाहेर काढण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. जयचंद्र हे पंजाब भागात नौजवान सभेचे प्रमुख होते. पण तेच कोणतीही हालचाल करायचे नाही आणि कारणे पुढे करायचे. त्यांनी हे खापर भगवतीचरण यांच्यावर फोडले. भगवतीचरणबद्दल वेगाने खोटे प्रचार सुरू केले. आता लाहोरमध्ये संघटनेची बांधणी अश्याप्रकारे करण्याचे ठरवण्यात आले की, ज्याचा कोणताही सुगावा भगवतीचरणला लागणार नाही. पण मोठी अडचण हीच होती की, भगवतीचरणला संघटनेच्या बऱ्याच गोष्टी माहीत होत्या. त्यात जयचंद्रचा व्यवहार असा होता की ते दाखवत भगवतीचरण हा धूर्त आणि चलाख व्यक्ती आहे. कोणतीही योजना ठरवली जात असताना जयचंद्र आपल्या ओठावर बोट ठेवून म्हणायचा भगवतीला माहीत पडून जाईल आणि गोष्ट तशीच राहून जायची.

भगतसिंग द्विधा मनस्थितीत होते. एक तर त्यांना भगवतीचरणवर पूर्ण विश्वास होता. पण दुसरीकडे त्यांच्यामुळे त्यांना संघटनेच्या सर्व कामात अडचणी जाणवायच्या. भगतसिंगांना संघटनेच्या कामात व्यतिगत मैत्रीला आड येऊ द्यायची नव्हती. भगतसिंग या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते की, याला मारून टाकले पाहिजे. नाहीतर आपल्या संघटनेच्या कामात नेहमी अडथळे येत राहतील. या एका माणसामुळे सगळे बर्बाद होत आहे. पण तरीही त्यांचा विश्वास बसत नव्हता की भगवतीचरण सीआयडीत आहेत.

यशपाल आणि दुर्गाभाभी यांनी एकत्रच प्रभाकरची परीक्षा दिली होती म्हणून त्यांचे भागवतीचरण यांच्या घरी सहज येणे-जाणे होते. त्यामुळे एक दिवस भगतसिंग यशपालवर चिडून बोलले, ‘तुझं नेहमी त्याच्याकडे येणे जाणे असते… मस्त खाऊन पिऊन येतो. गपाड्या मारून येतो. पण तुला हे माहीत करता येत नाही का तो सीआयडीचा माणूस आहे म्हणून. यशपाल म्हणाले ‘मी प्रयत्न करून पहिला पण मला काही सापडले नाही आणि सगळी लोक जर त्याला सीआयडीचा समजत आहेत तर मी तरी कसा नाकारू.’ एके दिवशी भगतसिंगांनी यशपालला एक भरलेले पिस्तुल दाखवून गंभीरपणे म्हटले की, ‘आता मी त्याला गोळी मारणाj आहे. यशपालने म्हटले जबाबदारी तुझीच असेल. भगतसिंग गप्प झाले आणि यानंतर एक दिवशी यशपालला घेऊन भगतसिंग भावतीचरणच्या घरी गेले. भगवतीचरण उशी घेऊन आडवा झालेला होता. भगवतीचरण बनियानमध्ये पोटावर हात फिरवत गप्पा मारत होते. यशपाल यांनी लिहिले आहे की, ‘भगतसिंगचा चेहरा अंतर्द्वंद्वाने जळत होता. भगवतीवर त्यांचा असलेला विश्वास, भगवतीचरण यांची निश्चलता, चातुर्य आणि संघटनेच्या हितात ते सामंजस्य बसवू पाहत होते.

यानंतर संघटनेत अशाही चर्चा झाल्या की, यशपाल त्यांच्या घरी नेहमी येत जात असतो म्हणून त्यानेच त्यांना मारावे. यशपालला ही हो म्हटल्याशिवाय इलाज नव्हता. एक दिवस सुखदेव यशपालकडे आले आणि बोलले की ‘भगवतीचरणचा काहीतरी इलाज केला पाहिजे.’ यशपालने विचारले, ‘म्हणजे काय करायला पाहिजे? सुखदेवने म्हटले की, सध्या भगतसिंग त्याला दुसऱ्या शहरात घेऊन गेला आहे. तू त्याच्या घरी जा आणि सगळ्या कागदपत्रांची शोधाशोध घे आणि बघ काही मिळते का. यशपाल खूप हिम्मत करून त्यांच्या घरी गेले तेव्हा दुर्गाभाभी घरी होत्या. त्यांनी खिशातली एक औषधाची पुडी देऊन ते औषध दुर्गाभाभींना बारीक करण्यास सांगितले. त्या आत गेल्यावर त्यांनी प्रत्येक अलमारीची तपासणी केली. त्यांनी यावेळी आपल्यासोबत एक चावीचा गुच्छा देखील आणला होता. पण तिथे कुठेच कुलूप नसल्याने त्याची गरज पडली नाही. काही ठिकाणी कुलूप होते पण ते खुलेच होते. पुष्कळ ठिकाणी त्यांच्या लिहिलेले टिप्पण विखुरले होते. ‘रिवोल्युशन इज द बर्थ राईट ऑफ एव्हरी स्लेव्ह नेशन’ असं लिखाण. पंजाबच्या गदर परतीच्या आंदोलनाची प्रशंसा करणारे लिखाण… यातले काही लिखाण भगवतीचरणने अगोदरही यशपालला वाचून दाखवले होते. त्याने सगळी तलाशी घेतली आणि चाललो म्हणून सांगत निघून गेला. परतून त्याने सुखदेवला तपशील सांगितले. तोपर्यंत भगवतीचरणला मारण्याचा ठोस निर्णय झाला नव्हता. नंतर भगवतीचरणबद्दल अफवा पसरली गेली असे लोकांच्या लक्ष्यात येऊ लागले.

सायमन कमिशनचा विरोधात निदर्शने करत असताना लाला लाजपतराय यांच्यासोबत नौजवान भारत सभेचे तरुण कार्यकर्ते देखील मोठ्याप्रमाणात सहभागी होते. पोलिसांच्या निर्दयी लाठीमारात जखमी होऊन लाला लाजपतराय शहीद झाले. तेव्हा त्यांच्या हत्येचा बदला घेण्याचे भारत नौजवान सभेने ठरवले. सांडर्सला गोळ्या घालून लालाजींच्या हौतात्म्याचा बदला घेण्यात आला. याच्याच संशयावरून भगतसिंगांसह सर्व कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी धाडसत्र सुरू झाले व अनेक कार्यकर्ते भूमिगत होऊ लागले. भगवतीचरण यांच्यावर मेरठ खटल्यामध्ये अटक वॉरंट निघाल्यामुळे ते भूमिगत झाले होते. त्यावेळी भगतसिंग यांची देखील सांडर्स याच्या वधासंदर्भात शोधाशोध सुरू होती. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी भगतसिंग यांना लाहोरच्या बाहेर पडणे भाग होते. यासाठी एक योजना त्यांनी आखली.

भगतसिंगानी आपले केस व दाढी तर कापली पण याने त्यांच्या दिसण्यात फारसा फरक पडला नाही. गोळी चालवताना त्यांना काही पोलिसांनी बघितलेले होते. त्यांचे रेखाचित्र पोलिसांच्या हाती असल्याने अतिशय सावधागिरी बाळगण्याची गरज होती. मदत मागण्यासाठी म्हणून सुखदेव रात्री आठ वाजता भाभीकडे गेले आणि म्हणाले की, एका व्यक्तीला पोलिसांपासून वाचून लाहोरच्या बाहेर काढायचे आहे तुम्ही त्यांची पत्नी मेमसाहेब बनून त्याच्याबरोबर जाल का? दुर्गावती यांना तेव्हा त्यांच्यासोबत जाणारा अनामिक व्यक्ती हा आपला क्रांतिकारी मित्र भगतसिंगच आहे याची कल्पना देखील नव्हती. ते एकमेकांना कॉम्रेड म्हणून हाक मारायचे आणि त्यांच्या घरी येणार्‍या प्रत्येक सहकार्‍याविषयी त्यांना इतका विश्वास होता की, दुर्गा भाभीने पकडल्या जाण्याची आणि देशद्रोहाच्या शिक्षेची प्रचंड शक्यता व कल्पना असूनही त्यांनी लगेच हो म्हटले. नंतर तेथे भगतसिंग देखील हजर झाले आणि त्यांनी योजना समजावून सांगितली. रात्रभर मुक्काम करून सकाळी कलकत्ता मेलने ते रवाना झाले. यावेळी भगतसिंगने कॉलर वर करून लांब असा ओव्हरकोट परिधान करून आपली हॅट जरा चेहर्‍यावर ओढून घेतली व भागवतीचरण यांचा तीन वर्षीय मुलगा शचिन्द्रकुमार याला आपल्या चेहर्‍यासमोर पकडून घेतले. दुर्गाभाभी देखील चेहर्‍यावर रंगोटी करून उंच टाचेची सॅंडल घालून खटखट चालत भगतसिंगसोबत निघाल्या. राजगुरू त्यांचे नोकर बनले. यावेळी भगतसिंगांकडे भरलेली पिस्तूल देखील होता. पोलिसांना जराही संशय आला असता तर नक्कीच गोळीबार झाला असता आणि असे घडले असते तर लहानग्या शचिंद्र व दुर्गभाभी यांचे जीव जाऊ शकले असते. पण तरीही त्यांनी न घाबरता मोठी हिम्मत दाखवली.

भगवतीचरण कलकत्त्यातच लपून बसलेले होते. ज्यावेळी स्टेशनवर भगतसिंग भेटले व त्यांच्यासोबत त्यांनी आपल्या पत्नी व मुलाला पहिले तेव्हा तिच्या खांद्यावर कौतुकाने हात ठेवून म्हणाले, ‘तुला आज ओळखले.’ दुर्गावती यांना गावातून आलेली एक साधी महिला ते समजायचे. परंतु या साहसपूर्ण घटनेने त्यांचा दुर्गवतींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. यावरून दुर्गादेवी यांच्या जीवनावर भागवतीचरण यांच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या कामांची किती छाप होती ते दिसून येते.

संसदेत भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी कमी क्षमतेचा बॉम्ब भिरकावून पत्रके फेकत घोषणाबाजी केली. त्यांना बोस्टन जेलमध्ये कैदेत ठेवण्यात आले होते. काही दिवसांनी सुखदेव आणि राजगुरू यांना देखील अटक करण्यात आली. या सर्वांना सोडवण्यासाठी भगवतीचरण, चन्द्रशेखर आझाद, यशपाल, दुर्गावती या सगळ्यांनी मिळून योजना बनविली. भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आदींना एकत्र जेव्हा लाहोर तुरूंगातून कोर्टात नेण्यासाठी बाहेर आणले जाईल तेव्हा सेंट्रल जेलच्या दारावरच अचानक हल्ला करून त्यांची सुटका करायची असे ठरले. पहारा कडक असल्याने या कामासाठी शक्तीशाली बॉम्बची आवश्यकता होती. भगवतीचरण यांना बॉम्ब बनवण्याची कला अवगत होती. बॉम्ब किंवा इतर साहित्य आणताना कमी धोका असावा आणि त्यात पकडले जाऊ नये यासाठी जेल जवळच एके ठिकाणी खोटे नाव धारण करून हे लोक भाड्याच्या घरात राहू लागले. 

इथे बॉम्बचे कवच व रसायने गोळा करून पुढच्या काही दिवसांत बॉम्ब बनवले गेले. बॉम्बचा खोळ नीट रसायने लावून सुकवून आणि ट्रिगर फिट करण्याची जबाबदारी यशपालची होती. त्यादिवशी ट्रिगर ढिला होता. यशपाल बाहेर गेले होते. पण उपयोगात आणण्यापूर्वी त्यांची चाचणी गरजेची होती म्हणून भगवतीचरण, बच्चन आणि सुखदेवराज हे परीक्षणासाठी बॉम्ब सोबत घेऊन रवी नदीच्या किनारी गेले. भगवतीचरण यांना हा ट्रिगर ढिला असलेला बॉम्ब लक्षात आल्याने त्यांनी ते ठेऊन दिले. पण सुखदेवराज गमतीने म्हणाला, ‘तुम्हाला भीती वाटत असेल तर मला द्या.’ भगवती म्हणाले, असे काहीच नाही. जे माझ्यासाठी आहे तेच तुझ्यासाठीही आहे. मागे हो’ असे म्हणून त्यांनी बॉम्ब फेकले पण ट्रिगर बरोबर नसल्याने तो हातातच फुटला. त्यात ते इतके जखमी झाले की, त्यांचा एक हात मनगटापासून वेगळा झाला. दुसर्‍या हाताची बोटे पूर्ण तुटून पडली. चेहर्‍यावर पुष्कळ ठिकाणी घाव झाले. पोटाच्या उजव्या बाजूला छिद्र होऊन रक्त निघू लागले व डाव्या बाजूने आतडी बाहेर आली. पोलिसांची नजर चुकवून रक्ताने माखलेल्या भगवतीचरण यांना उचलून नेणे शक्य नव्हते. म्हणून सुखदेवराज यांनी बच्चन यांना तिथेच पहार्‍यावर ठेऊन दुःखाने राहत्या ठिकाणी आले. यशपाल यांनी छैलबिहारी यांना आपल्यासोबत घेऊन टॅक्सी करत रावी नदीच्या किनार्‍यावर असलेल्या जंगलात पोहोचले. भगवतीचरण यांच्या पोटात मोठे छिद्र पडून त्यातून रक्त बाहेर पडत होते. पोटातून आतडी बाहेर पडली होती. तोपर्यंत ते जीवंत होते. स्काउटिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या त्या क्रांतिकारकांनी त्यांना जंगलातून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला.

यशपाल यांनी आपल्या ‘फांसी के फंदे तक’ पुस्तकात नमूद केले आहे की, जखमी अवस्थेत भगवतीचरण म्हणाले ‘मला दुखा आहे की भगतसिंगला सोडवण्यात मी योगदान करू शकलो नाही. हे मरण दोन दिवस पुढे ढकलले गेले असते तर काय बिघडले असते?’ ते म्हणाले, ‘बॉम्बचा धमाका जोरात झाला आणि जर पोलिस आले तर काय फायदा? माझे हात असते तर माझ्या हाती पिस्तूल देऊन पोलिसांना माझी खबर दिली पाहिजे होती. भगतसिंगला सोडवण्याचा प्रयत्न थांबता कामा नये.’

 बॉम्बचा तुकडा किडणीत घुसल्याने त्यांना लघवी लागत होती पण येत नव्हती. रात्र झाली होती. छैलबिहारीला त्यांच्या जवळसोडून सुखदेव, यशपाल परत शहरात येऊन तिथल्या ख्रिश्चन कॉलेजच्या वसतिगृहात देवराज सेठी आणि सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन (नंतर ते हिन्दी साहित्यात ‘अज्ञेय’नावाने प्रसिद्ध झाले). या दोघांना त्यांना उचलण्यासाठी सोबतीला घेऊन पुन्हा काळोख्या घनदाट जंगलात पोहोचले. भगवतीचरण शहीद झाले होते आणि अंधारात भीतीमुळे छैलबिहारी भीतीने पळून गेला होता. दृश्य पाहून सगळ्यांना रडू कोसळले. यशपाल म्हणाले, ‘आपल्या बहादूर नेत्याच्या सन्मानात त्यांना शेवटची सलामी देऊया’ सॅल्युट म्हटल्याबरोबर सर्व लोक मृतदेहाजवळ एक मिनिटापर्यन्त हात माथ्याजवळ सलामीच्या मुद्रेत ठेऊन उभे राहिले. २८ मे १९३० रोजी फक्त २६ वर्षांच्या वयात भगवतीचरण शहीद झाले.

हे सर्व लोक मृतदेहावर चादर टाकून पुन्हा किरायाने घेतलेल्या आपल्या बंगल्यावर पोहोचले. तोवर चन्द्रशेखर आझाद परतले होते. घरी छैलबिहारी, मदनगोपाल, दुर्गावती यांना मोठे काळीज करून बातमी देण्यात आली. दुर्गावती मनमोकळं करून रडू ही शकत नव्हत्या. कारण आवाज झाले तर लोक जमतील आणि सर्व फरार क्रांतिरकांची सुरक्षितता धोक्यात आली असती. आझाद यांनी नेहमीच्या वेळी घराचे दिवे विझवले. ही रात्र या सर्व क्रांतिकारकांनी जागून काढली. दुसर्‍या दिवशी उजेड होण्याच्या अगोदरच चन्द्रशेखर यांनी बाहेर पाडण्यासाठी संगितले. पूर्वीच दुर्गावती क्रांतिकारकांच्या बैठकींसाठी या क्रांतीकारकांसोबत सायकलच्या मागे बसून ये-जा करायच्या म्हणून त्याकाळी त्यांच्या चारित्र्यावर आजूबाजूला चर्चा होऊ लागली होती. दुर्गावती यावेळी त्यांच्यासोबत अंधारात बाहेर पडू शकत नव्हत्या. शेवटी यशपाल, चंद्रशेखर आणि बच्चन हे तिघे जंगलाकडे निघाले. मृतदेहाकडे कोणता जंगली श्वापद आला नव्हता. परंतु रक्तामुळे मोठमोठ्या मुंग्या जमल्या होत्या. त्यांच्यासोबत फावडा किंवा कुदळ नसल्याने ते खोदकाम करून मृतदेह पुरू शकत नव्हते. जाळल्याने धूर व वासामुळे पोलिसांचा धोका होता. शेवटी नाइलाजाने चादरीवर शव बांधले गेले. काही केस कापून स्मृति म्हणून ठेवण्यात आले आणि पाण्यात मृतदेह तरंगून वर येऊन नये म्हणून मोठे दगड त्या चादरीत टाकून भगवतीचरण यांना जलसमाधी देण्यात आली. सर्व लोक घरी परतले आणि सर्वांनी आपल्या लाडक्या क्रांतिकारकला आदरांजली दिली.

या घटनेमुळे यशपाल हे स्वतःलाच दोषी मानत राहिले. भगवतीचरणच्या मृत्यूवर चन्द्रशेखर आझाद म्हणाले की, त्याचा उजवा हात कापला गेला आहे. यानंतर अनेक दिवस योजना आणि जेल परिसरचा अभ्यास चालू राहिला. काही दिवसांनी बोर्लस्टल जेलबाहेर सर्वांनी तयारी देखील केली परंतु भगतसिंग यांनीच प्रतिसाद न दिल्याने पोलिसांची गाडी त्यांना बसवून पुढे निघून गेली.चंद्रशेखर आझाद शहीद झाल्यानंतर भागतसिंह म्हणाले ‘आमचे तुच्छ बलिदान साखळीचा दुवा मात्र आहे. ज्याचे सौन्दर्य कॉम्रेड भगवतीचरण वोहरा यांचा शोकांतक पण अभिमानास्पद आत्मत्याग आणि आमचे प्रिय योद्धा ‘आझाद’ यांच्या अभिमानास्पद मृत्यूने बहरून आले आहे.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा