बोलीबाबा आणि पन्नास चोर!

0
108
प्रतिकात्मक छायाचित्र.
  • संदीप बंधुराज

देशभर कामगार कोरोनामुळे हवालदिल झालेले आहेत. घरी जाण्यासाठी तडफडत आहेत. खायला जे मिळतं त्यात कसं बसं जगणं सुरु आहे. काही लोक तर चारचार दिवस उपाशीच आहेत. कुणाच्या आईने बिछाना पकडला आहे. कुणाची  म्हातारी आई पोराच्या येण्याकडे नजर ठेवून आहे.  कुणाचा बाप प्राण डोळ्यांत घालून मुलाची, मुलीची वाट पाहत शेवटच्या घटका मोजत आहे. सरकार जावू देत नाही. अन्यथा पायाचा जीव करुन आपल्या घरी पळत जावं असं अनेकांना वाटत आहे. सरकारने गाड्या सुरु केल्या, पण फुकट नाही.  तिकीटाला पैसे कुठून आणणार? कुठपर्यंत सोडणार? सर्वच अधांतरी आहे. त्यात अजून १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढले आहे. सरकार गाड्या सुरु करण्याची आशा दाखवून अर्धवट नियोजनामुळे खरे तर अशा कामगारांची, कष्टकाऱ्यांची क्रूर चेष्‍टाच करत आहे. अशा दीनवाण्या परिस्थितीत नुकताच कामगार दिन पार पडला. (साजरा झाला हा शब्द वापरण्याची हिम्मत नाही होत.)

महाकवी वामनदादा कर्डक यांनी कामगारांच्या जीवनावर अनेक गाणी लिहिली. त्यातले एक गाणे नेहमीच माझ्या तोंडी असते. ‘घाम शेतात आमचा गळ, चोर आयताच घेवून पळं’!  हे कडवे तर त्यावेळीही सत्य होते आणि आजही आहे. कामगारांच्या स्थितीचे विदारक चित्र या गाण्यात आहे. त्याचबरोबर वामनदादांनी या शोषक व्यवस्थेला प्रश्नही विचारला आहे. की ‘ सांगा धनाचा साठा नि आमचा वाटा कुठे हाय हो…’ आजचा दीनवाणी कामगार, आणि धनचोरांच्या पळण्याच्या वाटा पाहिल्या की वामनदादांनी त्यांच्या गितातून आपल्याला जागे करण्याचा प्रयत्न केला होता हे लक्षात येते. पण आम्ही लक्ष दिले नाही. त्याकडे गांभीर्याने त्याकडे पाहिले नाही. त्यामुळेच कामगारांची अवस्था तर अधिकाधिक बिकट होत आहेच शिवाय बोलीबाबा नि पन्नास चोरांची हातचलाखी राजरोस सुरुच आहे.

जी माहिती निवडून आलेल्या खासदाराला लोकसभेत दिली गेली नाही ती अखेर एका आरटीआय कार्यकर्त्यामुळे समोर आली. सरकारने म्हणे पन्नास अब्जाधीश कर्जबुडव्यांचे ६८ हजार ६०७ कोटी रुपयांचे कर्ज राईटऑफ केले. (काही माझे मित्र राईटऑफ केले म्हणजे माफ केले नाहीत, फक्त ते हिशेबातून बाजूला ठेवलेत, ते हळूहळू वसूल होणारच आहेत असा लंगडा खुलासा करु शकतात, यात त्यांचे अज्ञानच दिसेल किंवा ते समोरच्याला अज्ञानी समजत असावेत, पण एक गोष्ट नक्की शेण चमच्याने खाल्ले काय नि बोटाने चाटले काय शेण ते शेणच असतं). विशेष म्हणजे यात देशातून पळून गेला त्या मेहुल चौक्शीबरोबर या देशातच राहून जो राष्ट्रप्रेमाचे गोडवे गाणाऱ्या आणि काँग्रेस सरकारच्या काळात काळ्या पैशाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या भगवाधारी बाबा रामदेवच्या कंपनीचेही नाव आहे. ( बुडित गेलेली कंपनी टेकओव्हर केल्याने बाबाचे नाव आल्याचे माझ्या मित्राने लक्षात आणून दिले. पण मग बाबाचा हात लागल्याने कंपनी पवित्र झाली का?  कर्ज बाबा भरणार का?  राष्ट्रभक्त बाबाने ते भरायला हवे होते पण आता ते राईटऑफ झाले.  देशाला लुटणारी कंपनी बाबा कशी काय घेतो?  चांगला खेळ आहे. बापाचे कर्ज पोराकडून फेडून घेतले जातेच ना? ) यात पन्नास चोर आहेत. चोरच म्हणायला हवं. कारण यांनी जाणून बुजून कर्जे बुडवली आहेत. ( असे आरबीआयच म्हणते, विलफुल डिफॉल्टर!) इथे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही म्हणून लोक लाजेस्तव जीव देतो आणि हे निर्लज्ज लोक बुडवण्यासाठीच कर्ज घेत आहेत. इथे कामगारांना घरी जाण्यासाठी ज्या बसेस सोडल्या जाणार आहेत त्यांच्याकडूनही तिकीटे काढण्याची अपेक्षा सरकार करते, त्यांना शंभर रुपयेही सोडायला तयार नाही आणि या बुडव्यांना ६८ हजार कोटी रुपये सोडून देते?

आपल्या देशाच्या आरोग्याचे बजेट हे ६९ हजार कोटी रुपयांचे आहे. आदिवासींचे बजेट ५३,७०० कोटी रुपयांचे आहे. एससी, ओबीसींचे ८५ हजार कोटी रुपये, तर शिक्षणाचे  बजेट ९९,३०० कोटी रुपयांचे आहे. हे आकडे आणि या चोरांनी लुटलेले रुपये पाहता निश्चितच लक्षात येईल की, या चोरांनी केवढा मोठा डल्ला मारला आहे. रामदेवबाबाने तर २२१२ कोटी रुपये बुडवले. हे म्हणजे सरदार पटेलांच्या पुतळ्यावर खर्च झालेल्या पैशांएवढेच! आज देशाला कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी पैसा कमी पडत आहेत, आणि या चोरांना सूट?

या चोरांची हिम्मत कशी होते? सरकारची त्यांनी भीती राहिली नाही का? की चौकीदाराशी काही तोडपाणी करुन चोरांनी डल्ला मारला आहे? काँग्रेसच्या काळातही असे प्रकार होतच होते. पण किमान त्यावेळी काँग्रेसी लोक चौकीदारीची भाषा तरी बोलत नव्हते. या देशात जनतेची लूट करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्याच तयार झालेल्या आहेत. पूर्वीही होत्या व आजही आहेत. ‘बोलीबाबा आणि पन्नास चोर’ ही त्यातलीच म्हणावी का?

वामनादादा आपल्या काव्यात पुढे विचारतात, ‘धन चोरांचा तो पळण्याचा फाटा कुठे हाय हो?’ विविध करांमध्ये माफी देणे, सबसिडी वगैरे तर साध्या सरळ गोष्टी आहेत. पण आडमार्ग अनेक आहेत. कर्जे राईटऑफ करणे हा त्यातलाच एक फाटा आहे. अजून अनेक प्रकारे या धनचोरांची सरकारकडूनच भर केली जात असते. त्यात यांना मोठमोठी कर्जे सरळ सरळ माफ करणे, त्यांनी घेतलेली कर्जे बुडाली की बँका बुडू नयेत म्हणून त्याची बजेटमध्ये तरतूद करुन ती कर्जे भरुन काढणे, हे आणि असे अनेक मार्ग. आपल्या सर्वांनाच याबाबत ज्ञानी व्हावे लागणार आहे.  या चोरट्यांवर व बोलीबाबांवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

आज कामगार दीन बनला आहे. त्याचा श्वास घुसमटत आहे आणि रामदेव बाबा खाल्लेले पचविण्यासाठी ‘फुस फुस’ करत सुटकेचा श्वास सोडत आहे. कामगाराचे पोट उपाशी असल्याने खपाटीला लागले आहे नि रामदेव बाबा जिरवण्यासाठी योगाचा आधार घेत पोट खपाटीला लावत आहेत. ( सोबतचे फोटो जुने आहेत, पण हा विरोधाभास समजून घेण्यासाठी उपयोगी आहेत) विशेष म्हणजे या सर्व परिस्थितीत बोलीबाबाने तोडाला चिकटपट्टी लावली आहे…. !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा