ओबीसी समूहात हिंदू जातीय अहंकार कुणी व का पेरला?

0
77

या उच्चवर्णीयांनी आधीच भारतातील ८५% बहुजन समाजास शूद्र म्हणून घोषित केले आहे. म्हणजे यांनी वर्णानुसार ओबीसी समाजास शूद्र म्हणून घोषित केले व नंतर याच समाजास हजारो जातीत विभागून त्यांच्यात सुद्धा उच्चनीचतेची भावना जोपासण्यास खतपाणी घातले आहे.तेच उच्चवर्णीय आज ओबीसी समाजास कायम हिंदू हिंदू म्हणवून त्यांच्या या सुप्त अहंकारास सुखावत असतातआणि आपला राजकीय हेतू साध्य करून घेत असतात.

  • प्रा. निलकंठ देवळालीकर, शिरूर,पुणे.

आज ओबीसी समाजाची अवस्था त्या संस्थान खालसा झालेल्या नवाब सारखी झाली आहे. (हा नवाब घरातून बाहेर पडल्यावर मिशीवर बासमतीचा लांब उकडलेला तांदळाचा कण ठेवत असे. घरात चटणीभाकरी मिळेल ते खाऊन बाहेर आल्यावर, मात्र कोणी विचारल्यास आत्ताच मटण बिर्याणी खाऊन आलोय असे सांगत असे…) भारतात समस्त शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजास प्रगतीस संधी मिळावी, प्रतिनिधित्व मिळावे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांचा जातनिहाय समूह बनवला व त्यास  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी अशी नावे दिली. आता हे तिन्ही जातसमूह तसे पाहायला गेल्यास मागासवर्गीयच आहेत पण त्यातही ओबीसी समाज स्वतःला तुलनात्मकदृष्टीने थोडा उच्चजातीचा समजतो. त्यांच्या या जातीच्या अहंकारामुळेच आज या समाजाची प्रगती होण्याऐवजी अधोगती झाली आहे/होत आहे. आणि या समजास भारतातील स्वतःला उच्चवर्णीय म्हणवणारे ब्राम्हण सतत खतपाणी घालीत असतात. हे लोक कायम ओबीसी समाजास हिंदू हिंदू म्हणवून त्यांच्या या सुप्त अहंकारास सुखावत असतात.

या उच्चवर्णीयांनी आधीच भारतातील ८५% बहुजन समाजास शूद्र म्हणून घोषित केले आहे. म्हणजे यांनी वर्णानुसार ओबीसी समाजास शूद्र म्हणून घोषित केले व नंतर याच समाजास हजारो जातीत विभागून त्यांच्यात सुद्धा उच्चनीचतेची भावना जोपासण्यास खतपाणी घातले आहे. अनेक ओबीसी जातीत या उच्चवर्णीय ब्राम्हणांनी घुसखोरी करून त्या मुख्य जातीतील लोकांना पुन्हा हिनतेची वागणूक दिली आहे ते वेगळेच! उदा.जसे सोनार जातीत पांचाळ, दैवज्ञ म्हणवणारे लोक खरेतर जन्माने ब्राम्हण आहेत पण जातीने सोनार सांगत इतर लाड सोनारांस शूद्र समजतात. (लाड सोनारात काही उत्साही समाजसेवक सध्या सर्व सोनार लोकांना एकत्र आणून त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार जुळवण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु पांचाळ व दैवज्ञ सोनार स्वतःला ब्राम्हण समजतात. ते लाड किंवा इतर सोनार समाजाबरोबर रोटीबेटी व्यवहार कसा बरे करतील? ….तरीही असा प्रयत्न करणाऱ्या, समाजकार्य करणाऱ्यांना शुभेच्छा.) म्हणजे हा उच्चवर्णीय जेथे जेथे फायदा असेल तेथे घुसखोरी करून त्यांच्या समाजाचा जास्तीत जास्त फायदा करवून घेत आहे. हा ब्राम्हण समाज नेहमीच परिवर्तनवादी आहे. हा समाज फायद्यासाठी वेळ पडल्यास प्रसंगी धर्मांतर करतो, मोगलांना राज्यकारभारात साथ देऊन प्रसंगी मोगलांशी रोटीबेटी व्यवहारसुद्धा करीत असे. प्रसंगी बौद्ध धर्मात प्रवेश करून त्या धर्मात भेसळ करून बौद्ध  धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आलेला आहे. ख्रिश्चन धर्मात सुद्धा घुसखोरी करण्यात हे मागेपुढे पहात नाही….अशी अनेक उदाहरणे इतिहासात डोकावल्यास पहायला मिळतात. आजही मुस्लिमांना जावई करून घेण्यात ब्राम्हण समाजातील अनेक नेते मंडळी आघाडीवर आहे. (ब्राम्हण नेत्यांच्या मुस्लिम जावयांची भली मोठी यादी हा त्याचा पुरावा सध्या समाज माध्यमातून फिरत आहेच.) पण हेच ब्राम्हण लोक मुस्लिमांची बदनामी करण्यात काहीही हातचे राखून ठेवत नाहीत. यांना मुस्लिम समाजातील उच्चभ्रू लोक त्यांच्या मुलींसाठी चालतात परंतु गरीब मुस्लिम समाज कसा अतिरेकी आहे, देशद्रोही आहे हे पटवून देण्यासाठी ते त्यांच्या सर्व यंत्रणा कामाला लावतात. हे न समजण्याइतकी जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. आता तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे कारण

जोपर्यंत भारतातील बहुजन मुस्लिमांचा द्वेष करीत राहतील तितक्या काळ या उच्चवर्णीय लोकांना बहुजन समाजाला भ्रमित करून सत्तेत राहता येणार आहे हे त्यांना चांगले माहीत असल्याने ते लोक त्यांचा हा उद्योग करणारच.

आज ३७४३ जाती ओबीसी मध्ये समाविष्ट आहेत. या सर्व ओबीसींना संविधानाने जातीवर आधारित आरक्षण देऊ केले आहे आणि संविधानात लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची स्पष्टपणे तरतूद आहे. परंतु ओबीसी समाजाची जनगणनाच होऊ नये म्हणून नागपुरातून सूत्रे हलत असतात हे किती जणांना माहीत आहे? क्रिमिलेअरचा मुद्दा हा पूर्णपणे असंविधानिक -बेकायदेशीर असूनसुद्धा केवळ ओबीसी समाजातील काही लोकांना याचा लाभच मिळू नये म्हणून सुप्रीम कोर्टानेही क्रिमिलेअरची अट लागू करून एकप्रकारे आम्ही संविधान मानीत नाही हाच संदेश ओबीसींना दिला आहे. (याच मनुवादी लोकांच्या प्रयत्नांमुळे आजपर्यंत दुरुस्तीच्या नावाखाली संविधानात जवळपास १२० पेक्षा जास्तवेळा दुरुस्ती करून संविधान या उच्चवर्णीय लोकांनी खिळखिळे करून टाकले आहे. आपण संविधानाला हात लावून तर दाखवा म्हणून त्यांना अनेकवेळा आव्हान देत असतो, परंतु त्यांनी आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आपले संरक्षक असलेले संविधान पार आतून पोखरून टाकले आहे.)

ओबीसी समाजाला कोणताही विशेष आर्थिक व या सामाजिक फायदा होऊच नये म्हणून या उच्च वर्णीय ब्राम्हणांनी खूप आधीच तयारी करून ठेवलेली आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रथम त्यांनी समस्त बहुजनांना वर्ण व्यवस्थेत शूद्र म्हणून घोषित करून ठेवले म्हणजे या बहुसंख्य लोकांचे आधीच मानसिक खच्चीकरण करून ठेवले आहे. नंतर त्यांनी या सर्व बहुजन समाजाला अनेक जातींमध्ये विभागून त्यांच्यात सुद्धा उच्च नीच भाव निर्माण करून हे बहुजन एकत्र येणार नाही याचीपण तजवीज करून ठेवली आणि सर्वात शेवटी ब्रिटिशांनी जेव्हा समस्त भारतीय जनतेला मतदानाचा अधिकार दिला तेव्हा या धूर्त लोकांनी ओळखले की, आपण ब्राम्हण तर मुठभरच आहोत मग सत्तेत कसे येणार? ग्रामपंचायतमध्ये आपला एखादा सरपंच पण निवडून येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी आणखी एक धूर्त चाल खेळली.त्यांनी या बहुसंख्य असलेल्या बहुजन समाजास हिंदू म्हणून संबोधण्यास सुरवात केली व स्वतःला फक्त आर्य म्हणवून घेणाऱ्या या उच्च वर्णीय ब्राम्हणांनी स्वतःलासुद्धा हिंदू म्हणवून घेऊ लागले. अश्या रीतीने अल्पसंख्याक असलेला हा ब्राम्हण समाज आपोआपच बहुसंख्यांक लोकांत बेमालूमपणे मिसळला गेला. त्यामुळे ब्राम्हण समाजास दोन प्रकारे फायदे झाले. एक म्हणजे स्वतःला हिंदू म्हणवून सत्तेत येण्यासाठी या सर्व हिंदूंचे एकगठ्ठा मतदान पदरात पाडून घेता आले. दुसरे म्हणजे या बहुजन समाजातील मुख्य मोठा घटक असलेल्या ओबीसी समाजाची नेहमीच काहीतरी खुसपट काढून, प्रसंगी हाती असलेली सत्ता वापरून सुप्रीम कोर्टाचा वापर करून क्रिमिलेअर अट लावून तर कधी जनगणनाच होऊ द्यायची नाही व या मोठया वर्गास कोणताच आर्थिक लाभच मिळू दिला नाही.

म्हणजे एकीकडे ओबीसी समाजास शूद्र म्हणवून हिनवायचे. त्यास लाभापासून वंचित ठेवायचे व दुसऱ्या बाजूने हिंदू म्हणवून त्यास जवळ करायचे. त्याचा वापर करून घ्यायचा. अश्या प्रकारे या सनातनी कर्मठ लोकांनी त्यांचे दुधारी हत्यार ओबीसी समाजावर वापरून आज ओबीसी समाजाची अवस्था ना घर का ना घाट का अशी अवस्था करून ठेवली आहे.

ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यासाठी हे निच भ्रष्ट लोक सतत मुस्लिमांची भीती घालून त्यांना आपल्या तंबूत येण्यासाठी मजबूर करीत असतात आणि ही वस्तुस्थिती लक्षात न घेता आजचा ओबीसी समाज स्वतःला केवळ हिंदू म्हणवून घेण्यात धन्यता मानीत आहे व स्वतः बरोबर आपल्या समाज बांधवांचे पण कधीही भरून न येणारे नुकसान करून घेत आहे. आज ओबीसी समाजातील प्रत्येकाने अभ्यास करून आत्मचिंतन करून आपल्या समाजाच्या अधोगतीस खरेच कोण जबाबदार आहेत हे शोधून काढावे व प्रगतीच्या नव्या संधी शोधाव्या.

१९३१ साली झालेल्या जनगणनेनुसार त्यावेळी ओबीसींची लोकसंख्या ५२% होती तरीपण या सनातनी सरकाराने केवळ २७% आरक्षण देऊ केले. पण याच धूर्त कपटी सनातनी समाजाने नुकतेच स्वतःच्या पदरात १०% आरक्षण पाडून घेतले. आता वास्तविक पाहता आरक्षण फक्त सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजासच मिळते मग या सरकारने कोणता निकष वापरून या उच्च वर्णीयांना १०% आरक्षण दिले? तेही त्यांनी कोणतीही मागणी केलेली नसताना! पण आपण सर्व पहात बसलो. कोणीही त्याचा जाब विचारला नाही. निषेध केला नाही. दुसरी बाब अशी की ज्याप्रमाणे ओबीसींना क्रिमिलेअरची अट लावून काही उच्च उत्पन्न गटातील लोकांना या आरक्षणापासून बाजूला काढले त्याचप्रमाणे ही अट या उच्च वर्णीय ब्राम्हण-वैश्य लोकांना का नाही लावली? आपण अश्या बाबींचा अजिबात गांभीर्याने विचार करीत नाही म्हणूनच हे उच्च वर्णीय आपल्याला केवळ हिंदू हिंदू म्हणून गोंजारत असतो. आपला केवळ सत्ता मिळवण्यासाठी वापर करून घेतला जातो हे आपण लक्षात घेत नाही. तिकडे ते उच्च वर्णीय म्हणवणारे ब्राम्हण कोणताही राजकीय पक्षात असो, संघटनेत असो त्यांच्या फायद्याच्या वेळी ते सर्व एकत्र येतात आणि आपण मात्र एकमेकांना दोष देत बसतो.

इतक्या वर्षांपासून आपण सर्व स्वतःला हिंदू हिंदू म्हणवून या सनातनी लोकांच्या खेम्यात राहून काहीच फायदा होत नाही हे पाहून आता असे वाटते की आपण सर्वांनी आता समदुखी असलेल्या एससी, एसटी समाजास साथ देऊन प्रसंगी त्यांची मदत घेऊन संवैधानिक मार्गाने ओबीसी हिताचे काहीतरी पदरात पाडून घ्यावे. कारण हे सनातनी लोक आपल्याला केवळ हिंदू म्हणवून गोड गोड बोलून आपल्याला काहीच मिळू देणार नाही हे आजपर्यंतच्या अनुभवावरून सिद्ध झालेले आहे. या अल्पसंख्याक स्वतःला उच्चवर्णीय म्हणवणाऱ्या लोकांना भीक मागण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र आलो तर हेच अल्पसंख्याक ब्राम्हण – बनिया लोक आपल्या बहुसंख्यांक लोकांसमोर हात पसरून मदतीची अपेक्षा करतील. तेव्हा आपला स्वाभिमान जागृत करून नेहमीच या लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा स्वतःच्या हिंमतीवर बहुजन समाजाचे, पुरोगामी विचारसरणीच्या लोकांची सत्ता स्थापन  केल्याशिवाय आपल्याला अच्छे दिन पाहायला मिळणारच नाहीत. शेवटी पुरोगामी बहुजन समाजच बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय घेऊ शकेल. या सनातनी उच्च वर्णीयांकडून काही अपेक्षा ठेवणे चुकीचे व आत्मघातकी ठरेल. याचा सर्व ओबीसींनी गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ येऊन ठेपली आहे.

(लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा