महाराष्ट्रात कोरोनाः २ हजार ४८७ नवीन रूग्ण, ८९ मृत्यू; एकूण रूग्णसंख्या ६७ हजार ६५५

0
85

मुंबई: राज्यात आज कोरोना संसर्गाचे २ हजार ४८७ रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ६७ हजार ६५५ झाली आहे. दुसरीकडे राज्यात आज ८९ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्याही २ हजार २८६ झाली आहे. दरम्यान, आज १ हजार २४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २९ हजार ३२९ झाली आहे. सध्या राज्यात ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या राज्यात ४४ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७८ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रतिदशलक्ष ३५८५ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २७२२ एवढे आहे. आजपर्यंत ४ लाख ६२ हजार १७६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ६७ हजार ६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार १०० लोक होम क्वारंटाइन तर ३४ हजार ४८० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत ५२, पुण्यात ९ जणांचा मृत्यूः राज्यात ८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यात मुंबईतील ५२, ठाण्यात ५,  नवी मुंबईत ९,  कल्याण डोंबिवली ४, मालेगावमध्ये ६, पुण्यात ९, सोलापुरात २ आणि उस्मानाबाद व यवतमाळमधील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर ४३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४७  रुग्ण आहेत तर ३५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे.

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग  १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा