औरंगाबाद अब तक २०९: दिवसभरात आढळले ३२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, आठवा बळी

0
152
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबादेत आज शुक्रवारी दिवसभरात ३२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २०९ वर गेली आहे. दरम्यान, गारखेडा परिसरातील गुरूदत्तनगर येथील एका ४७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आज सकाळी मृत्यू झाल्याने शहरात कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या ८ झाली आहे.

नवीन कोरोनाबाधित रूग्णांमध्ये संजय नगर, मुकुंदवाडीतील १६, रोहिदास नगर, मुकुंदवाडीतील २, नूर कॉलनीतील २, वडगावातील १, असेफिया कॉलनीतील ३, भडकल गेट भागातील १,  गुलाबवाडीतील २, महेमुदपुऱ्यातील१, सिटी चौकातील १, जयभीम नगरातील २ आणि  टाऊन हॉल परिसरातील १ रूग्णाचा समावेश आहे.  

हेही वाचाः १७ मेपर्यंत वाढवला देशव्यापी लॉकडाऊन; रेल्वे, विमानसेवाही बंदच!

आज शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत ४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. घाटीत सध्या ४७ रूग्ण भरती आहेत. सहा कोरोना निगेटीव्ह बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे. चिकलठाण्यातील विशेष कोरोना रुग्णालय म्हणजेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील कोरोना रुग्णांपैकी २२ वर्षीय कोरोना बाधिताची चाचणी निगेटिव्ह आल्याने या कोरोनामुक्त रुग्णास आज सुटी देण्यात आली आहे. एकूण ८५ जणांचे स्वॅब घेण्यात आले. ६८ जणांचे अहवाल प्राप्त झाले.  ८५  अहवाल येणे अपेक्षित आहेत, असे  जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने कळवले आहे.

हेही वाचाः लॉकडाऊन-३ मध्ये काय सुरू आणि काय बंद?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गारखेडा परिसरातील गुरूदत्त नगर येथील ४७ वर्षीय रुग्णास २७ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी ६.२० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोरोना रुग्णालयात ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आज सायंकाळी सात वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २०९ झाली आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी कळवले आहे.

हेही वाचाः कोरोनाचे संकटः महाराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये, फक्त ६ जिल्हेच ग्रीन झोनमध्ये!

व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरू दत्तनगर येथील या रूग्णास सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. संबंधित लक्षणे कोरोना आजाराची दिसत असल्याने त्यांना संशयित कोरोना कक्षात भरती केले होते. तेथे त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठवल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कोरोना कक्षात हलवण्यात आले. तिथे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा