ये कोरोना ये, या हलकट राजकारण्यांना ने!

1
592
प्रतिकात्मक छायाचित्र.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच सर्व भाजप ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तुटून पडत आहेत त्यावरुन त्यांची सामाजिक तळमळ कमी आणि राजकारण जास्त दिसून येत आहे. त्यांना कोरोनाशी काही देणे घेणे नाही. इथले सरकार अडचणीत आले पाहिजे व ते कोसळले पाहिजे, अशी दुष्टभावना कुणी पापी आत्मा बाळगून असेल तर त्याची ही वेळ नाही. एकदाचे कोरोनाला राज्यातून आणि देशातून हद्दपार होऊ द्या आणि मग करा काय राजकारण करायचे ते! कारण तुमचा जन्मच झाला आहे राजकारण करण्यासाठी…वेळीअवेळी कधीही केवळ हिंदू – मुसलमान असे बोंबलून मतपेटी बळकट करणे एवढेच राजकारण या देशात खेळले जात असेल तर ये कोरोना ये, उचल रे बाबा या हलकट राजकारणी व दंगलखोर लोकांना अगोदर! असेच म्हणावे लागेल.

  • सौ. अनिता चंद्रप्रकाश देगलूरकर

कोरोना हा एक जीवघेणा विषाणू आहे. त्याचा फैलाव झाला तर जगातील संपूर्ण मानवजात धोक्यात येते, हे आपण पाहत आहोत. या गंभीर आजारामुळे आज जगात लाखो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. या आजाराचा वैद्यकीय पातळीवर कसा मुकाबला करायचा हाच एक प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे, परंतु काही नीच प्रवृत्तीचे किडे कोरोना म्हणजे राजकारण करण्याचे एक हत्यार समजून वावरत आहेत. त्यामुळे विनाकारण सामाजिक जनजीवन विस्कळित होऊ लागले आहे. सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच सर्व भाजप ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तुटून पडत आहेत,  हे आपण प्रसार माध्यमांतून पाहत आहोत.  त्यावरुन त्यांची सामाजिक तळमळ कमी आणि राजकारण जास्त दिसून येत आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. केंद्र व राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करत आहेत, तर त्यांना काम करु द्यावे. उगीच कुठेही नाक खुपसून राजकारण करण्याचा प्रयत्न कुणीही करु नये, कारण जनता सर्व काही जाणते.

वांद्रे येथे कोणते लोक कश्यासाठी रस्त्यावर आले व त्यांना कोणी आणले?  हे जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे. कोरोनाशी काही देणे घेणे नाही परंतु इथले सरकार अडचणीत आले पाहिजे व ते कोसळले पाहिजे, अशी दुष्टभावना कुणी पापी आत्मा बाळगून असेल तर त्याची ही वेळ नाही. एकदाचे कोरोनाला राज्यातून आणि देशातून हद्दपार होऊ द्या आणि मग करा काय राजकारण करायचे ते!  त्याचे आमच्यासारख्या सामान्य लोकांना काहीही देणे घेणे नाही. कारण तुमचा जन्मच झाला आहे राजकारण करण्यासाठी आणि ते तुम्ही करणारच.  पण आपले झाकून ठेऊन दुसऱ्याचे वाकून पाहू नका, कारण जनतेला सारे कळते. देशात कोरोनाचे सर्वाधिक संकट आज महाराष्ट्रावर आहे. मृत्यूचा आकडा पहा. मरणारे अर्ध्याहून अधिक लोक महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, हे कुणालाही कळते.

मुख्यमंत्री सहायता निधी वा कोरोनाच्या लढ्यासाठी महाराष्ट्रासाठी उभारलेल्या निधीत कुणाही भाजप आमदाराने आपले वेतन जमा केले नाही. त्यांचे वेतन पंतप्रधान निधीत का जमा केले?  खासदार विकास निधीदेखील महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांनी केंद्र सरकारकडे का वर्ग केला? नंतर केंद्र सरकारने सर्वच खासदारांचा विकास निधी दोन वर्षाकरता रद्द करून तो केंद्राच्या तिजोरीत जमा केला. त्यामुळे महाराष्ट्राचे ७०० कोटींचे नुकसान झाले. कारण हा निधी सर्व खासदारांना विकास कामांसाठी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात म्हणजे पर्यायाने महाराष्ट्रात वापरता आला असता. खासकरून कोरोनावर इलाज करताना लागणाऱ्या उपकरण, साहित्य खरेदीसाठी वापरता आला असता. हे राजकारण नाही तर काय आहे?

देशपातळीवर प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधी आहे. लोक यात निधी जमा करतात.  मग पीएम केअर्स फंड ही काय भानगड आहे? त्याची आवश्यकता का भासली? यामध्येच मदत करण्याची विनंती कुणी केली?  हीच का तुमची महाराष्ट्राबद्दलची तळमळ? त्यात आजवर किती निधी जमा झाला याचा अद्याप थांगपत्ता लागत नाही. महाराष्ट्रात रोज किती निधी जमा झाला त्याचा हिशोब उद्धव ठाकरे देतात. मग पीएम केअर फंडाचा हिशोब का दिला जात नाही?

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे वेतन, त्यांना सर्व सोयीसवलती महाराष्ट्र सरकार देते. त्यांनीही आपले वेतन पंतप्रधान सहायता (PM Cares Fund) निधीत जमा केले. राज्यपालांच्या हातून जर असे विशिष्ट राजकीय पक्षाच्या बळकटीकरणासाठी घाणेरडे राजकारण केले जात असेल तर या पदाची महाराष्ट्राला गरजच काय? कश्याला विनाकारण पांढरे हत्ती पोसायचे? आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधान परिषद बरखास्त करुन टाकली. तसे महाराष्ट्रात झाले तर?  कोट्यवधी रुपये वाचतील! असे आणखी बिनकामाचे खूप विभाग असतील. त्यांचीही बरखास्ती झाली पाहिजे. यामुळे किमान आरोग्य सुविधा अद्ययावत तरी होतील, असा सूर निघत आहे.

वाधवा नावाचे बिल्डर लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला कसे काय गेले? त्यांना परवानगी कुणी दिली? हे कळताच महाराष्ट्र सरकारने वाधवा यांना बंदिस्त करून सीबीआयला कळवले आणि ज्या अधिकाऱ्याने ही परवानगी दिली त्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्याची अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी लावली. खरे तर आयपीएस अधिकाऱ्यांवर राज्य सरकारला यापेक्षा अधिक कारवाई करता येत नाही. त्यावर केंद्राने कारवाई करायची असते. मग आता केंद्र सरकार मूग गिळून गप्प का आहे? विजय मल्ल्या, निरव मोदी हे बाहेर देशात कसे पळाले याचा खुलासा कुणीच कसा करत नाही?

कोरोना ही जागतिक आपत्ती भारतातही येऊ शकते, हे जानेवारीपासूनच जाणवत होते. परंतु घोडेबाजार करुन मध्यप्रदेशात सत्ता स्थापन करणे, नमस्ते ट्रम्प ह्यासारख्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले. त्यावर देशाचे कोट्यवधी रुपये ऊधळले. पक्षहिताची सारी कामे उरकल्यावर अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. नाही तरी असाही विलंब झाला होताच. मग जनतेला किमान चार दिवसांचा अवधी दिला असता तर लोक जिथल्या तिथे अडकून पडले नसते.

जनतेची ही ‘मन की बात’ जाणून न घेता नोटबंदी सारखे अचानक लॉक डाऊनचे धक्कातंत्र वापरण्याचे कारण काय? प्रधानमंत्री आहात की हुकुमशहा? कोरोनाच्या संकटाकडे वेळीच गांभीर्याने लक्ष दिले असते, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर वेळीच निर्बंध आणले असते तर कदाचित कोरोनाचा प्रादुर्भाव आजच्या इतका झालाच नसता. उपाययोजना म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन भाषणे दिली.  त्यात ठोस उपाययोजना किंवा मदतीचे पॅकेज, त्याचे स्वरूप वगैरे काहीही नव्हते. टाळ्या वाजवा, लाईट बंद करा, दिवे लावा अशी अवैज्ञानिक आवाहने करण्यात आली. लढाई, सैनिक, भारतमाता अशी भावनिक आवाहने करून राष्ट्रवादाचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे तुम्ही कालही राजकारण करत होते आणि आजही केवळ आणि केवळ राजकारणच करत आहात असे दिसून येते.

दिल्ली येथे झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात नऊ हजार लोक कुठल्याही सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझेशन इत्यादीचा अवलंब न करता एकत्र आले.  ते देशातील विविध राज्यात गेले आणि कोरोनाचा धोका अनेक पटींनी वाढला. या कार्यक्रमाला दिल्ली सरकारने नव्हे तर केंद्र सरकारच्या गृह खात्याने या धोक्याच्या काळात परवानगी कशी काय दिली? याबाबत केंद्रीय गृहमंत्री तोंड का उघडत नाहीत? सीएएबाबत रोज बोंबलणारे आता एकदम चिडीचूप का? प्रसार माध्यमांनी मरकजचा मुस्लिम म्हणून एवढा गाजावाजा केला की जणू काही कोरोना त्यांच्यामुळेच फैलावत आहे. मुस्लिम साऱ्या जगात आहेत. त्यामुळे विदेशातून काही मुस्लिम आले असतील. त्यांना कोरोनाने ग्रासले असावे. त्यांची त्याचवेळी विमानतळावरच तपासणी का करण्यात आली नाही?  मग यात दोष कुणाचा? योग्यवेळी योग्य उपाययोजना केल्या असत्या तर त्यांच्या माध्यमातून हा कोरोना फैलावलाच नसता. मग आता मुस्लिम मुस्लिम म्हणून गळा काढण्यात काय मतलब?

तिरुपती येथे अजूनही लाखो लोक अडकून पडल्याचे समजले आहे. अयोध्या येथे लॉकडाऊनची ऐशीतैशी करुन राम मंदिराचे बांधकाम चालू असल्याचे समजते. शिर्डी येथे तीन हजारांच्या आसपास भाविक अडकून पडले आहेत. नांदेड येथे चार हजाराच्या आसपास शीख यात्रेकरु अडकून पडले आहेत. निजामुद्दीन येथेही असेच काही झाले असे समजून मिडिया समन्यायी भूमिकेने वागताना दिसत नाही. कोरोना या भयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर हिंदू – मुस्लिम असा घाणेरडा खेळ खेळणारे हे लोक कोण आहेत? याचा जनता योग्यवेळी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही!

पालघर प्रकरणही तापवण्याचा प्रयत्न चालू आहे. तिथे दोन हिंदू साधूंची हिंदू लोकांनीच चोर समजून हत्या केली. त्यामुळे हिंदुत्व धोक्यात आल्याचा गळा काढणे योग्य आहे काय?  गुजरातच्या ऊना शहरात काय घडले होते, जरा आठवून पहा. मेलेल्या गायीचे कातोडे काढले होते तर गोहत्त्या झाली म्हणून आरोळी ठोकली. यावेळी चार चर्मकार युवकांचे मॉबलिंचिंग करण्यात आले. जीपला बांधून फटके मारत भरचौकातून त्यांची फरफट करण्यात आली.  त्यावेळी हिंदुत्व धोक्यात आले अशी आवई का उठवली गेली नाही?  ऊना आणि पालघर या दोन्ही ठिकाणी झालेल्या मॉबलिंचिंगचा निषेधच केला पाहिजे परंतु तसे झाले नाही. ज्या लोकांनी अखलाख, पहलू खान आणि इंस्पेक्टर सुबोध सिंह यांची हत्त्या, सहारनपूरचे हत्याकांड, गुजरातच्या ऊनाची मॉबलिंचिंग, उत्तर प्रदेशातील भाजप आमदाराचे बलात्कार प्रकरण, सीएए प्रकरणी उसळलेली दिल्लीतील दंगल, मुस्लिमांची मोठ्या प्रमाणात हत्त्या यांचा विरोध केला नाही, त्या लोकांना आज पालघर प्रकरणी राजकारण करण्याचा काय अधिकार आहे? उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. थोडा धीर धरा. हिंदुत्व धोक्यात आले असा गळा लगेच काढू नका.

नांदेड जिल्ह्यातील माहूरजवळील नखेगाव येथे चर्मकार मायलेकींची अत्यंत क्रूरपणे सामूहिक हत्त्या करण्यात आली.  खैरलांजी येथे जे हत्याकांड घडले. भीमाची रिंगटोन वाजली म्हणून जी हत्त्या करण्यात आली ते मॉबलिंचिंग नव्हते काय? नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पानभोशी येथे सरस्वतीबाई अंबाजी बनसोडे यांची क्रूर हत्त्या झाली. हे प्रकरण कुठे दबले? शेकापूर येथे अनिता बसवंते या मातंग समाजातील अत्यंत हुशार विद्यार्थिनीचा बलात्कार करून खून करण्यात आला. या प्रकरणाचा वीस वर्ष होऊनही निकाल का लागत नाही ? कंधार तालुक्यातीलच गोणार येथील संतोष लक्ष्मण भालके या तरण्याबांड युवकाचा अपहरण व अत्याचार करून क्रूर खून करण्यात आला.  त्याचे प्रेतही सापडले नाही. त्यावेळी कुणीच प्रस्थापितांनी आवाज का उठवला नाही? दलितांवर अत्याचार झाला तर हिंदुत्व, राष्ट्रीयत्व काहीच धोक्यात येत नाही. वेळीअवेळी कधीही केवळ हिंदू – मुसलमान असे बोंबलून मतपेटी बळकट करणे एवढेच राजकारण या देशात खेळले जात असेल तर ये कोरोना ये, उचल रे बाबा या हलकट राजकारणी व दंगलखोर लोकांना अगोदर! असेच म्हणावे लागेल.

काही महाभाग कोरोनालाही भीत नाहीत. या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी सर्व मतभेद व पक्षाभिनिवेश विसरून सर्व जाती धर्माच्या लोकांनी सरकारचे ऐकले पाहिजे. नियमांचे पालन केले पाहिजे. सरकारला खुल्या मनाने मदत केली पाहिजे.  जिल्हाधिकारी, पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सहकार्य केले पाहिजे.  घरात सुरक्षित राहिले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. सर्वांनी एकमुखाने आणि एकजुटीने कोरोनाला अगोदर हद्दपार केले पाहिजे, तरच माणसे शिल्लक राहतील. माणसेच शिल्लक नसतील तर राजकारण कश्यासाठी आणि कुणासाठी करणार?  त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे सर्वांनी आगोदर बंद केले पाहिजे. कारण कोरोनाचे विषाणू जात, धर्म, पंथ पाहून शरिरात प्रवेश करीत नाहीत!

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा