बदलाच्या उंबरठ्यावर…

0
204

माणूस म्हणून आपल्या जगण्याचे नेमके प्रयोजन काय? हे कोरोनाने नेमकेपणाने आपल्यासमोर ठेवून स्वतःपुरता विचार न करता स्वतःसाठी इतरांचा विचार करण्याची अनिवार्यता सिद्ध केली आहे. हे ओळखून जुनाट विचार, पारंपरिक मानसिकतेत, त्याच त्या साचेबद्ध पठडीत  ‘लॉकडाउन’ झालेल्या मेंदूनी मुक्तविचारांची ‘क्वारंटाइन’ केलेली प्रवेशद्वारे उघडून नव्या बदलांचे स्वागत करत नव्या संधी शोधणे, निर्माण करणे हेच हिताचे ठरणार आहे.

ऋषिकेश पवार, औरंगाबाद

कोरोनापुराण सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला तरी त्याचे ‘पारायण’ अजून काही संपलेले नाही. ते इतक्यात संपेल असे देखील नाही. कोरोना विषाणू म्हणजेच कोविड-१९ चा पहिला रुग्ण डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान येथे समोर आला. (संदर्भः लॅन्सेट मेडिकल जनरल) त्यानंतर ते आजतागयत जगभरातल्या २४ लाख लोकांना कोरोनाने संक्रमित केलंय आणि १.६५ लाख लोकांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत. हे लिहितोय त्या क्षणापर्यंत, हा आकडा अधिक वाढतही असेल. अमेरिका, स्पेन, इटलीसारख्या प्रगत मानल्या जाणाऱ्या देशाच्या आरोग्यव्यवस्थेचे देखील धिंडवडे कोरोनाने काढले. तर क्युबासारख्या छोट्या देशांनी आरोग्यव्यवस्था कशी असावी ह्याचे उदाहरण समोर आणले आहे. एकंदरीतच सामाजिक, आर्थिक, राजकीय अश्या सर्वच अंगाने नव्याने विचार करायला कोरोनाने  भाग’ पाडले आहे. भारतापुरतेच बोलायचे झाल्यास कोरोनापूर्वीच आजारीअसलेल्या अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे जबरदस्त तडाखा बसून मृतप्राय स्थितीत आणले. २००८ पेक्षा अधिक भयानक आणि अधिक व्यापक, अधिक काळ आर्थिक मंदीच्या खाईत भारत असल्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली. आता पुढे काय होईल? असा सवाल सर्वसामान्य भारतीयांना पडलेला असताना गझलसम्राट सुरेश भटांची ओळ आठवते, ‘हे असे आहे परी, असे असणार नाही…. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या आजूबाजूला बरेच काही बदललेले आणि बदलताना दिसतेय. ऑनलाइनचे प्रस्थ वाढताना नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. वर्क फ्रॉम होमची संकल्पना रुजताना दिसते आहे. निसर्ग स्वत:ला पुनर्जिवित करतो आहे. सामाजिक आणि आर्थिक संरचनेत बदल घडवण्याची गरज जोर धरू लागली आहे. शिकलेली पिढी गावाकडच्या शेतीत नवनवीन प्रयोग करून नव्या संधी निर्माण करु पाहते आहे. सेकंडरी ऑप्शन असलेला डिजिटल कारभार आता प्रायमरी होतोय. नव्या स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनची भर पडतेय. स्वछतेच्या सवयी अंगवळणी पडून आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. कामाच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करता येईल का? याविषयी देखील चाचपणी अनेक कॉर्पोरेट्स करत आहेत. थोडक्यात, नकारात्मक वातावरणातही बरचसं सकारात्मक घडतंय. या बदलाचा वेग जर समजून घेतला तर पुढच्या २० वर्षांमध्ये होऊ शकणारे बदल येत्या ५ वर्षातच होतील, अशी स्थितीत सध्या भारतात आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदलाची संधी कोरोनाच्या निमित्ताने उपलब्ध झाली असून घरात बसूनच पदवीधारक होता येऊ शकेल. इंटरनेट ऑफ थिंग्सचा प्रचंड वाढलेला वापर पाहता भारतातील आयटी क्षेत्र मोठी झेप घेईल,असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रचंड वेगाने बदलत्या या काळात प्रस्थापित राजकारण आणि प्रस्थापित राजकारणी यांना देखील ‘अपग्रेड’ होण्याची वेळ आलेली आहे. बदलत्या जगाचे आकलन न होणारी ही मंडळी जर त्याच त्या पद्धतीने पारंपरिक राजकारण करत राहिली तर ‘आऊट डेटेड’ ठरत राजकीय वर्तुळाच्या बाहेर पडण्याची शक्यता का नाकारावी?  मोठया प्रमाणात बेरोजगार असलेली अन् झालेली, हात रिकामी असलेली आणि सोशल मीडियावर बोट चालवणारी कुशल, अकुशल तरुणाई इथल्या प्रस्थापित राजकारणाला प्रश्न विचारतील. त्याची उत्तरेही तयार ठेवावी लागतील. जिथे गरिबी, बेरोजगारी, विषमता प्रचंड वाढते तिथे गुन्हेगारी जन्म घेते. प्रचंड आव्हानात्मक या काळात बदलाच्या उंबरठ्यावर असताना वास्तवाची जाण ठेवून धोरणकर्त्यांनी सकारात्मकरित्या धोरणे आखणे आवश्यक आहे. अन्यथा स्वस्तात उपलब्ध असलेले मनुष्यबळ ओझे किंवा भार ठरल्याशिवाय राहणार नाही.

सातत्याने पैश्याच्या मागे धावणारा माणूस आज जरासा विसावलाय हे खरय मात्र हा विसावा जीवघेणा आहे. माणूस म्हणून आपल्या जगण्याचे नेमके प्रयोजन काय? हे कोरोनाने नेमकेपणाने आपल्यासमोर ठेवून स्वतःपुरता विचार न करता स्वतःसाठी इतरांचा विचार करण्याची अनिवार्यता सिद्ध केली आहे. हे ओळखून जुनाट विचार, पारंपरिक मानसिकतेत, त्याच त्या साचेबद्ध पठडीत  ‘लॉकडाउन’ झालेल्या मेंदूनी मुक्तविचाराची ‘Quarantine’ केलेली प्रवेशद्वारे उघडून नव्या बदलांचे स्वागत करत नव्या संधी शोधणे, निर्माण करणे हेच हिताचे आहे. कवी केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेतल्या ह्या ओळी आजच्या संदर्भाने लागू होतात ते त्यामुळेच…

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध! ऎका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी…’

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा