कारखाने,आस्थापनांना एकत्रित वार्षिक विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

0
59
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवल्यामुळे कारखाने अधिनियम, दुकाने व आस्थापना आणि इतर विविध कामगार अधिनियमांतर्गत एकत्रित वार्षिक विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात अली असल्याची माहिती कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिली.राज्यात सुमारे ३८ हजार कारखाने आणि सुमारे २९ लाख दुकाने आस्थापना नोंदणीकृत आहेत.

कारखाने अधिनियमांतर्गत एकत्रित वार्षिक विवरणपत्र १ फेब्रुवारीपूर्वी तर दुकाने व आस्थापना आणि इतर विविध कामगार अधिनियमांतर्गत एकत्रित वार्षिक विवरणपत्र १ मार्चपूर्वी कामगार विभागाकडे दाखल करणे कायद्याने बंधनकारक आहे. सदर कारखाने व आस्थापनांकडून मागील वर्षातील तपशिलवार माहिती पडताळणी करून वार्षिक विवरणपत्रात भरण्यात येते. परंतु लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग व आस्थापना बंद असल्याने आवश्यक अधिकारी व कर्मचारी कामासाठी उपलब्ध नाहीत. ही आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता अनेक उद्योजक, व्यावसायिक व त्यांच्या संघटनांनी २०१९ वर्षाचे वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती  सरकारकडे केली होती.

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे उद्योजक व व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, ही वस्तुस्थिती विचारात घेता उद्योजक व व्यावसायिकांना कामगार कायद्याचे अनुपालन करण्याकरिता मुभा देणे आवश्यक आहे. कारखाने अधिनियम व दुकाने व आस्थापना आणि इतर विविध कामगार अधिनियमांतर्गत सन २०१९  या वर्षाचे एकत्रित वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलला आहे. सदर निर्णयामुळे राज्यातील उद्योजक व व्यावसायिक यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती कामगार आयुक्त यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा