घाटीत एन-९५ मास्क, पीपीई किट तातडीने उपलब्धः मार्डच्या आंदोलनानंतर मंत्री देशमुखांचा निर्णय

0
50
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय अर्थात घाटीमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रूग्ण दाखल होऊ लागल्याने एन-९५ मास्क,  पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात याव्या, या मागणी मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी आज घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी ही बाब वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कानावर टाकल्यानंतर त्यांनी वेळीच दखल घेऊन एन-९५ मास्क व पीपीई किट उपलब्ध करून दिल्या आहेत.

निवासी डॉक्टरांची संघटना मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाबाधित रूग्णावरील उपचार करताना पीपीई आणि एन-९५ मास्क उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी घाटीत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यानंतर मार्डच्या शिष्टमंडळाने अधिष्ठातांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मोहन डोईबळे, डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड उपस्थित होते.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार  फिवर ओपीडी, अपघात विभाग, विलगीकरण कक्ष, कोविड-१९ वार्ड येथे एन-९५ मास्क व पीपीई किट मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सदरचे एन-९५95 मास्क व पीपीई किट संबंधित वॉर्डात देण्यात येतील. त्याची जबाबदारी संबंधित वॉर्डातील मुख्य परिचारिका (इंचार्ज सिस्टर) किंवा कर्तव्यावर हजर असलेल्या परिचारिकेकडे सोपवण्यात आली आहे. डॉक्टरांना  एन-९५ मास्क व पीपीई किटची आवश्यकता असेल. त्यावेळी त्यांनी वॉर्डातील परिचारिका यांच्याकडे मागणी करावी. त्यांना एन-९५ मास्क व पीपीई किट संबंधित परिचारिकेकडून पुरवण्यात येईल, असे मार्डच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर पदाधिकाऱ्यांचे समाधान झाल्याने त्यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा