उन्हात ताटकळणाऱ्या पोलिसांना शेतकऱ्याने दिली निर्यात दर्जाची ८५० किलो काकडी भेट!

0
51

नाशिक : लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बसला आहे. लाखो रुपयांची निर्यात गुणवत्ता असलेल्या द्राक्षबागांवर शेतकरी नांगर फिरवत आहेत. काहीजण भाजीपाला बांधावर फेकत आहेत. कष्टाने पिकविलेला हा शेतमाल असा फेकतांना, सडतांना पाहून अनेकांच्या पोटात धस्स होते. पण अशाही परिस्थितीत निफाड तालुक्यातील शेतकरी शरद शिंदे यांनी तब्बल साडेआठशे किलो निर्यायतक्षम काकडी शेतातून काढून लॉकडाऊनमध्ये दिवस रात्र रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसांसाठी भेट दिली आहे. शरीराला लाभदायी ठरणारी काकडी मिळाल्याने पोलिसांनीही या शेतकऱ्यांचे आभार मानले असून शिंदे यांच्या या औदार्याचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी कौतुक केले आहे.

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शरद शिंदे हे मध्यमवर्गीय युवा शेतकरी आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्य शासनाचा कृषी पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. शेततळे, पॉलिहाऊस, कृषी विभागाच्या फलोत्पादन अभियान या योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या आहेत. देशसेवा करणाऱ्या हातांना आपलेही बळ लाभावे या विचाराने शिंदे यांनी निर्यात गुणवत्तेची सुमारे साडेआठशे किलो काकडी नाशिक शहरातील बंदोबस्तावर असणाऱ्या सुमारे तीन हजार पोलिसांना सामाजिक बांधिलकीतून वाटप केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून युरोपीयन देशांसह विविध देशात जाणाऱ्या शेतीमालावर मोठा परिणाम झाला आहे. हवाई, जल वाहतूक बंद आहे. त्यामुळे शेतमालाची निर्यात बंद आहे. काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात द्राक्ष, काकडी व इतर फळे विकून नुकसान कमी करण्यावर भर दिला. तर काहींनी संकटकाळात अडकलेल्या नागरिकांना, निवारागृहात आपला शेतमाल भेट म्हणून दिला.

शेतीमाल फेकू नका, निवारागृहाला दान कराः या काकडीचे वैशिष्ट्य असे की, तहान, ज्वर, शरीर दाह, गर्मीचे सगळे दोष, चर्मरोगात काकडी लाभदायक आहे. या काकडीचा रस किडनी स्टोनमध्ये लाभदायक आहे. मधुमेहमध्ये पण लाभदायक आहे. गुडघे दुखीला दूर करण्यासाठी, जेवणात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे. उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याला काकडी नक्कीच लाभदायक ठरणार आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल नष्ट न करता, फेकून न देता तो लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनातर्फे चालवल्या जाणाऱ्या निवारागृह, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनहितासाठी दान करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा