अनलॉक-१: आता १ जूनपासून ५० लोकांच्या उपस्थितीत उरकता येतील लग्न समारंभ!

0
324
प्रतिकात्मक छायाचित्र.

नवी दिल्लीः केंद्र सरकारने देशातील कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली असली तरी कंटेनमेंट क्षेत्राबाहेरील भागात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालायाने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार १ जूनपासून लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचाः कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवला, अन्य भाग टप्प्याटप्प्याने खुला होणार

कोरोना व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांमध्ये १ जूनपासून बदल करून लग्न समारंभासाठी ५० पेक्षा जास्त लोकांचा जमाव असू नये, असे म्हटले आहे. अंत्यविधी आणि त्यासंबंधीत कार्यक्रमांसाठी मात्र जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूटांचे अंतर राखले जाईल, याची दक्षता घ्यावी, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा होणारे सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांवरील बंदी ३० जूनपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.

हेही वाचाः अनलॉक-१ः आता राज्यात किंवा दुसऱ्या राज्यात कुठेही जा; वेगळी परवानगी, ई-पासची गरज नाही!

सार्वजनिक ठिकाणे, कामाची ठिकाणे आणि दळणवळणाच्या वेळी फेस मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच लग्न समारंभासाठी येणाऱ्या ५० पाहुण्यांनाही मास्क घालूनच उपस्थित रहावे लागणार आहे. या छोटेखानी लग्न समारंभातही सोशल डिस्टन्सिंगचे म्हणजे दोन व्यक्तींमधील किमान ६ फूटांचे अंतर पाळावे लागणार आहे. आज जाहीर झालेल्या नियमांनुसार कंटेनमेंट झोनबाहेरील ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे खुली केली जाणार आहेत.

हेही वाचाः राज्यात आज २ हजार ९४० नवे कोरोना बाधित रूग्ण, ९९ मृत्यू; ३ हजार १६९ सक्रीय कंटेनमेंट झोन

वधू-वर संशोधनही झाले सुकरः लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारने राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासही परवानगी दिली आहे. यासाठी कोणतीही वेगळी परवानगी किंवा ई-पास घेण्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे वर आणि वधू पित्यांना राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे जाता येणार असल्यामुळे वधू-वर संशोधन करणे सुकर झाले आहे. यापूर्वी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी होती आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे झाल्यास ई-पास काढणे अनिवार्य होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा