जैन साधू-साध्वींना चातुर्मासस्थळी पोहोचण्यासाठी प्रवासाची परवानगी, सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य!

0
49
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: जैन समाजाचा चातुर्मास सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर साधू-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित प्रवास करणार नाहीत आदी अटींनुसार प्रवास करून या साधू-साध्वींना चातुर्मासस्थळी पोहोचण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जैन समाजाचे चातुर्मास पर्व जुलै महिन्यात प्रारंभ होत आहे. या काळात जैन साधू-साध्वी निश्चित केलेल्या चातुर्मासस्थळी पोहोचण्यासाठी पायी प्रवास करतात. काही वृद्ध साधू-साध्वी व्हीलचेअरने प्रवास करून सेवकवर्गासह चार्तुमास स्थळी पोहोचतात.

हेही वाचाः अनलॉक-१ः आता राज्यात किंवा दुसऱ्या राज्यात कुठेही जा; वेगळी परवानगी, ई-पासची गरज नाही!

सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक भागातून साधू-साध्वी प्रवास करू शकत नाहीत. मात्र चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारित स्थळी पोहोचण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.पायी प्रवासादरम्यान गर्दी होणार नाही, पाचपेक्षा जास्त जण एकत्रित प्रवास करणार नाही, जेथे मुक्काम आहे त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, कोरोना संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, प्रवासादरम्यान दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचाः अनलॉक-१: आता १ जूनपासून ५० लोकांच्या उपस्थितीत उरकता येतील लग्न समारंभ!

साधू-साध्वींच्या प्रवासादरम्यान व मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जाईल याची दक्षता जिल्हा व पोलिस प्रशासनाने घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. यासंदर्भात आपत्ती विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सर्व पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा