लॉकडाऊन काळात २१८ सायबर गुन्हे दाखल, ४५ आरोपींना अटक

0
47
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यात काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात २१८ गुन्हे दाखल झाले आहेत तर ४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या २१८ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र आहेत.

दाखल झालेल्या गुन्ह्यांत बीड २६, कोल्हापूर १५, पुणे ग्रामीण १५, जळगाव १३, मुंबई १२, सांगली १०, जालना ९, नाशिक ग्रामीण ९, सातारा ८, नांदेड ७, परभणी ७, नाशिक शहर ७, ठाणे शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५, नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, लातूर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, रायगड २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १,धुळे १ यांचा समावेश आहे .

यात आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १०२ गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी ७१ गुन्हे, टिकटॉक व्हिडिओ शेअरप्रकरणी २ गुन्हे व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यू ट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी ३८ गुन्हे दाखल झाले आहेत.

नागरिकांना आवाहन सोशल मीडियाचा (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी) वापर जपून व तारतम्य बाळगून करावा. एखादी बातमी किंवा माहिती तुमच्या वाचनात किंवा पाहण्यात आली तरी सदर बातमीची व माहितीची खात्री व सत्यता पडताळूनच त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी. तसेच अशा पोस्ट्सवर आपल्या प्रतिक्रिया चिथावणीखोर नाहीत याची खात्री करावी व आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यास व चुकीचा अर्थ निघून कोणत्या ही कायद्याचे किंवा सरकारी आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा