कोरोनाच्या सावटाखाली राज्यात १४० लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन

0
4
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र  त्यातून शेतीच्या कामांना वगळण्यात आले असून या पार्श्वभूमीवर राज्यात १४० लाख हेक्टर क्षेत्रावर आगामी खरीप हंगामाचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या बियाण्यांची उपलब्धता आहे. खरीपाचे नियोजन करताना त्यात शेतकरी हित केंद्रित ठेवावे. जिल्हा आणि विभागीय स्तरावरील नियोजन ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.  १५ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा प्रारंभ झाला आहे. या काळात खरीप २०२० चे नियोजन कृषि विभागामार्फत केले जात असून कोरोनाच्या संकटामुळे त्यात काहीसा बदल करणे भाग आहे. मात्र असे करताना शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवावे, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा समावेश या नियोजनात करावा, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे.

जिल्ह्याचे खरीप नियोजन केल्यानंतर पालकमंत्र्यांची मान्यता घ्यावी. त्यानंतर विभाग व राज्यस्तरीय नियोजन पूर्ण करावे. कृषि विभागाच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत, त्यांची यशस्वी अमंलबजावणी होणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. शेततळे अस्तरीकरण, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, ठिबक सिंचन या योजनांची नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात खरीप हंगामः
• राज्यात १४० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप २०२० चे नियोजन केले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी यांचा समावेश आहे.
• यासाठी सुमारे १६.५७ लख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे.
• महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून बियाण्यांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
• खरीप हंगामासाठी केंद्र शासनाकडून ४० लख मेट्रिक टन खत पुरवठा केला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा