विद्यापीठ परीक्षा शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीत वळते कराः राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

0
89
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्र वगळता सर्व परीक्षा रद्द झाल्या असून विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी जमा केलेले परीक्षा शुल्क एक तर मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सदस्य ऋषिकेश देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचाः शरद पवारांचे पत्र मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शकः देवेंद्र फडणवीसांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर

 कोरोनाच्या संसर्गामुळे महाविद्यालये व विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अंतिम सत्र व अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्यात याव्यात, याबाबत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यूजीशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. विद्यापीठाच्या परीक्षाच रद्द झाल्यामुळे उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांची छपाई, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था. उत्तरपत्रिका तपासणी यावर होणारा खर्च आता होणार नाही.  राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जवळपास १०० कोटी रुपये जमा केले आहेत. ही रक्कम जर मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली तर कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणखी बळ मिळेल, असे देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचाः ‘पहाटे ४ वाजता ‘मिर्ची हवन’ करून फडणवीसांनी घेतली होती दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ’

राज्यात परीक्षा रद्द झालेल्या महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची संख्या २४ ते २५ लाखांच्या आसपास आहे. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २ लाख ३४ हजार ७५१, कवयित्री बहिणीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ५०,०००, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूरला १०,०००, गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात ५५,०००, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात १,१५,००० विद्यार्थी आहेत. राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांनी मिळून परीक्षा शुल्कापोटी १०० कोटींच्या आसपास रक्कम जमा केली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केल्यास कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आर्थिक बळ मिळेल, असे सांगतानाच ही रक्कम जर मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली जाणार नसेल तर ती संबंधित विद्यार्थ्यांना परत देण्यात यावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  उपमुख्यमंत्री अजित पवार,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय रविंद्र सामंत हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागणीचा सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा