औरंगाबादच्या जाधववाडी मंडीत भाजीपाला, फळांची ठोक स्वरूपातच होणार खरेदी-विक्री!

0
75
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: जाधववाडीतील भाजीपाला बाजारात होत असलेली गर्दी रोखण्यासाठी तेथे फळे व भाजीपाल्याची केवळ ठोक (घाऊक/होलसेल) स्वरुपात खरेदी-विक्री होईल, असा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

औरंगाबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधववाडी संकुलात घाऊक व किरकोळ भाजीपाला खरेदी-विक्रीच्या दैनंदिन व्यवहारासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या गर्दीला तत्काळ आळा घालून खरेदी- विक्री व्यवहार सुरळित व्हावेत यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, अपर आयुक्त विजयकुमार फड, सहकार उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उपस्थितीत होते.

जाधववाडीत किरकोळ खरेदी-विक्रीसाठी दररोज येणारांची व्यवस्था औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे करावी. सदर ठिकाणावर नागरिकांत खरेदी-विक्रीच्या वेळी सामाजिक अंतर राखले जाईल, यासाठी महापालिकेने रितसर आखणी करुन द्यावी. आवश्यकतेप्रमाणे किरकोळ विक्री ठिकाणात वाढ करावी. फळे व भाजीपाला खरेदी-विक्रीच्या वेळी नागरिक योग्य ते सामाजिक अंतर राखतील यादृष्टीने पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

पूर्वीची किरकोळ भाजीपाला खरेदी-विक्री केंद्रे व्यवस्थ‍ितपणे चालू होणे आवश्यक असल्याने महापालिकेने जागेची निश्चिती, सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून आखणी करावी. जाधववाडीवाडी येथे कोणत्याही परीस्थितीत फळे व भाजीपाला ठोक स्वरूपात खरेदी-विक्री व्यतिरिक्त किरकोळ खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावी. कृषी उत्पन्न बाजार समिती व महापालिका आणि पोलिसांनी याबाबत नागरिकांत जागृती करावी. पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे विक्रेते व ग्राहकांना याबाबत माहिती द्यावी. बाजार समितीने फलक लावावेत. एखाद्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे किंवा गर्दी होत आहे असे निदर्शनास आल्यास महापालिकेने गरवारे स्टेडियम, आमखास मैदान, तसेच इतर मोकळ्या मैदानाचा किरकोळ खरेदी-विक्रीसाठी वापर करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा