कोरोनाः जागतिक संसर्ग, आगतिक राजकारण!

0
53
प्रतिकात्मक छायाचित्र.

कोरोना संसर्गाच्या फैलावाबरोबरच जागतिक पातळीवर राजकारणही चांगलेच तापले आहे. या संसर्गाचे बिल अमेरिका चीनच्या नावाने फाडत आहे. त्यामुळे१९८० मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा एड्स आढळला आणि जगभर पसरला तेव्हा जगाने अमेरिकेला जबाबदार धरले होते का? २००८ मध्ये अमेरिकेच्या लेहमन ब्रदर्सच्या पडझडीने जगाला आर्थिक मंदीत लोटले, तेव्हा कुणी अमेरिकेला नुकसान भरपाई मागितली होती का?  २००९ मध्ये अमेरिकेत एच१ एन१ आढळला आणि २१४ देशात त्याने दोन लाख लोकांचे बळी घेतले. तेव्हा जगाने अमेरिकेला जाब विचारला का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आर. एस. खनके, पुणे

कोविड-19 मध्ये  (नोवेल कोरोना व्हायरस) सर्व जग बंदीशाळा झाले असताना जागतिकस्तरावर आरोप-प्रत्यारोप आणि ‘कहीं खुषी कहीं गम’चे राजकारण सुरु झाले आहे. अर्थात संधीसाधूंना यासारखी दुसरी सुवर्ण संधीपण नसते म्हणून असेल. कोविड-19 वर उपचार करण्यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे आमेरिकन माध्यमांपुढे भारता बद्दलचे धमकी भरले वाक्य भारतात गाजले होते. त्यानंतर सात दशकांपूर्वीच्या राष्ट्रीय औषध (ड्रग) निर्यात धोरणात बदल करुन हायड्रोक्सीक्लोरोक्वीन अमेरिकेला उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता अमेरिकन अहवालानुसार हे हाड्रोक्सीक्लोरोक्विन कोविड-19 च्या उपचारासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे अहवाल अमेरिकन प्रशासनाच्या पुढे आले आहेत. ज्यांना या मलेरिया विरुद्धच्या ड्रग्जचे डोस कोविड-19 आजारावर उपचार करण्यासाठी दिले गेले त्या लोकांमधला मृत्यूदर अधिक असल्याचा अहवाल  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने (NIH) अर्थसहाय्य केलेल्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने अमेरिकी प्रशासनाला नुकताच सादर केला आणि ट्रम्प यांच्याकडून व्हाईट हाउसमध्ये घेतल्या जाणाऱ्या दैनिक न्यूज कॉन्फरन्समध्ये याबाबत चर्चा करण्यात आल्याने माध्यमांतून त्याची वार्ता जगभर पोचली.

या तज्ञ गटाने कोरोना उपचारासाठी Hydroxycloroquine आणि azithromycin च्या एकत्रित वापराबाबतही विरोध दर्शवलेला असून अमेरिकन FDA प्रशासनाने मात्र या अहवालाच्या पार्श्वभूमीवर सदरच्या औषध वापराबाबत अद्याप कुठलाही अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले आहे. अमेरिकेत सध्या कोरोना रुग्ण आणि त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जगात सर्वाधिक झाली आहे.

विज्ञानाचा सन्मानः या पार्श्वभूमीवर अमेरिकी काँग्रेसचे पास्क्रेल यांनी देशाला अवाहन करताना केलेले विधान अत्यंत महत्वाचे आहे. ते म्हणतात, ‘अमेरिकी लोकांना करिष्माई उपचारांची नाही तर विज्ञान आणि फक्त विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारे उपचार हवे आहेत. ‘विज्ञानाच्या निष्कर्षावर अंतिम विश्वास’ अशी अमेरिकी पूर्वजांची समृद्ध विज्ञानवादी परंपरा अमेरिकेसारख्या देशाला आहे. ट्रम्प प्रशानाने विज्ञानापेक्षा राजकारण मोठे करून अमेरिकन लोकांच्या जीविताशी खेळू नये.’

इंगलंडचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन कोरोनासारख्या महमारीतून बाहेर आले. त्यावेळी त्यांनी पहिली प्रेस घेतली आणि विज्ञान आणि डॉक्टरांचे आभार मानले. वैद्यांशिवाय मी या आजारातून बाहेर येवू शकलो नसतो. असे विधान त्यांनी केले आणि वैद्यांच्या कामाचा सन्मान केला. त्यातून देशवासियांना आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या समुदायाला किती चांगला आणि काय संदेश गेला असेल हे सांगने न लागे.

मांत्रिक आणि करिष्माई उपचाराचा भारजीय गजरः यापार्श्वभूमीवर भारतात ‘गो करोना गो’चा गजर, समूह गायन-भजन, गोमूत्र प्राशन पार्ट्या, गाईचे तूप आणि गायत्री मंत्राचे पठन करून कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या आजारावर उपचार करण्याचे आवाहन भंपक लोक आणि लोकप्रतिनिधींकडून केले जात आहे. एका माजी लोकसभा अध्यक्षांनी याबाबत मध्यप्रदेशात केलले गायत्री मंत्राचे कथन भारताला ताजं आहे. विषेश म्हणजे त्या जेथे राहतात ते इंदौर शहर त्या राज्यातील कोरोना हॉट्स्पॉट ठरत आहे. यावरून आपली मानसिकता किती अविज्ञान आणि पुराणकथा उपचारप्रेमी आहे. याबद्दल वेगळे सांगायची आवश्यकता नाही. 

जागतिक आरोग्य संघटना-WHO चे महत्वः जागतिकस्तरावर काम करणारी WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेला जगातील प्रमुख सधन देश आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी देणगी देत असतात. इंग्लंड आणि जर्मनीने आपले योगदान दिले आहे. मात्र अमेरिकी प्रशासनाने अशी देणगी अजून दिलेली नाही. जर्मनीच्या चान्स्लर अंजेला मर्केल या क्वॉन्टम केमिस्ट्री या विषयात डॉक्टरेट आहेत आणि बोरिस जॉन्सन यांचा ताजा कोरोना आजारातला अनुभव असेल पण त्यांनी WHO ची गरज काय आहे हे समजून घेत आर्थिक मदत दिलेली आहे.

यादरम्यान पाश्चिमात्य युरोपीयन आणि अमेरिकी लोकांमध्ये या कोरोना महामारीच्या विषाणूसाठी चीनला दोष देणाऱ्या फैरी झडत आहेत. अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांची वेळोवेळची या अनुषंगाने केली जाणारी विधाने या खसखसीला खतपाणी घालत आहेत. चीनने प्रयोगशाळेत हा विषाणू निर्माण केला असेल आणि जाणीवपूर्वक जगभर पासरवू दिला असेल तर त्याची किंमत चीनला मोजावी लागेल. यासाठी एक पथक चीनला तपासणी करायला पाठवण्यापर्यंतची विधाने ट्रम्प यांनी केल्याने जगभरातून विशेषत: पाश्चिमात्य देशातून चीन विरोधी वातावरण निर्माण होत आहे.

चीनच्या नावाने नुकसान भरपाईचे बिलः याचा कहर म्हणून की काय या दरम्यान जर्मनीतील एका सर्वाधिक खपाच्या बॉम्बशेल नावाच्या सनसनाटी वर्तमानपत्राने संपादकीय पानाशेजारील पृष्ठावर एका लेखाद्वारे १३० बिलियन पौंडचे (१२.४ लाख कोटी भारतीय रुपये) नुकसान भरपाईचे बिलच चीनच्या नावाने काढले आहे. कोरोना महामारीमुळे जर्मनीतील विविध उद्योग, सेवा ठप्प झाल्या आहेत. दरडोई उत्पनात घट झालेली आहे. यामुळे जर्मन अर्थव्यवस्थेचे नुकसान झालेले असून त्याला चीन कारणीभूत आहे. म्हणून उपहासाने लिहिलेल्या एका सविस्तर लेखाद्वारे हे १३० बिलियन पौंडची नुकसान भरपाई चीनने जर्मनीला द्यावी यासाठी नकली बिल(मॉक बिल) चीनच्या नावाने काढले आहे.

विषेश म्हणजे भारतातील हिंदी पट्ट्यातील काही नामांकित दैनिकांनी आणि सर्वाधिक दर्शकाचा दावा करणाऱ्या पोर्टलवरून देखील सदरच्या वृतपत्रातील या लेखाबाबतचे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रकाशित करून चीनविरुद्धच्या या सनसनाटी प्रकाराला खतपाणी घातले आहे. आज त्यातीलच एका पोर्टलने फॅक्ट चेक करून जर्मनीने अशी मागणी केली नसल्याचे वृत्त दिले आहे.

जर्मन सरकार कडून मात्र अशा आरोपाचे कुठलेही अधिकृत वक्तव्य आजपर्यंत झालेले नाही. याउलट जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल याबाबत जबाबदार विधाने करताना दिसतात. कोरोनाबाबत चीनच्या अनुषंगाने त्यांनी केलेले ताजे विधान त्यांच्यातला समतोलपणा सांगून जातो. त्या म्हणतात, ‘I believe the more transparent China is about the origin story of the virus, the better it is for everyone in the world in order to earn from it.’

चीनचा प्रतिआरोपः पाश्चात्य देशांकडून कोरोनाच्या उत्पत्तीवरून चीनला दोषी ठरवण्याच्या बातम्या आणि चर्चा जगभरातून प्रसारित होत असताना चीनने अमेरिकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. चीनच्या म्हणण्यानुसार चीन गुन्हेगार नसून कोरोनाचा स्वत: बळी ठरलेला आहे. वुहानमध्ये पुन्हा नव्याने कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर उद्रेक झालेला आहे.

अमेरिकेने कोरोना विषाणूबाबत चीनला दोषी ठरवल्याने चीनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता जेंग शुआंग यांनी देखील अमेरिकेला फैलावर घेत १९८० मध्ये पहिल्यांदा अमेरिकेत AIDS आढळून आला आणि जगभर पसरला. त्याच्या फैलावाबाबत अमेरिकेला जागतिक बिरादरीने जबाबदार धरले होते का? २००९ मध्ये अमेरिकेत H1N1 चा उद्रेक झाला आणि तो २१४ देशांत पसरला. त्याने सुमारे दोन लाख लोक जगभरातून मृत्युमुखी पडली. त्याबद्दल जगाने अमेरिकेला त्याची नुकसान भरपाई मागितली आहे का? असे सवाल केले आहेत.

सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर किशोर मधुबनी यांच्या म्हणण्याचा हवाला देत जेंग म्हणतात की, २००८ मध्ये अमेरिकेतील लेहमन ब्रदर्स पडझडीच्या प्रकरणामुळे जग आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडले. त्यासाठी अमेरिकेला जबाबदार धरून जगभरातून कुणीही अमेरिकेला नुकसान भरपाई मागितली नाही. जागतिक समुदायाला उद्देशून केलेले हे चीनचे हे प्रतिप्रश्न चायना डेली या दैनिकातून प्रसिद्ध झाली आहेत.

एकूणच कोरोना व्हायरसच्या सोबतीनेच जगभरात आरोप-प्रत्यारोप आणि विज्ञान-अविज्ञानाच्या चर्चेला उत आला आहे. यापेक्षा विज्ञानाची कास धरून संपूर्ण जगाने एकत्र येत या मानव जातीच्या अस्तित्वावर गंडांतर आणलेल्या महामारीवर उपाय शोधण्यात उर्जा खर्ची करणे अधिक आवश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा