राज्यात प्रतिदशलक्ष कोरोना चाचण्यांच्या संख्येत दुपटीने वाढ, महाराष्ट्र देशात अव्वल!

0
15

मुंबई: राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत. २६ मे ते २० जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत ३० ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. असे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

९ मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला त्यावेळेस मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोराना चाचण्यांच्या सुविधेत दिवसेंदिवस राज्यशासनाने वाढ केल्याने ही संख्या आता १०३ एवढी झाली आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण ५८४७ एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण ४६१० एवढे आहे.

देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असून गेल्या तीन महिन्यात सातत्याने चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबईतील जी.टी. हॉस्पीटल येथील प्रयोगशाळांचा शुभारंभ गेल्या आठवड्यात झाला. कालपर्यंत ७ लाख ७३ हजार ८६५ एवढे नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख ३२ हजार ७५ एवढे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांचे प्रमाणे हे १७ टक्के आढळून आले आहे.

२६ मे रोजी राज्यात ७३ प्रयोगशाळा होत्या त्यावेळी प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३ हजार ३४७ एवढे होते. २९ मे रोजी ७७ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३३८७ होते. ५ जून रोजी राज्यात ८३ प्रयोगशाळा होत्या तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ४०८६ एवढे होते. १२ जून रोजी ९५ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाणे ४८६१ एवढे होते. २१ जून रोजी १०३ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ५८४७ एवढे आहे, असे टोपे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा