मोदींची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा, लॉकडाऊनवर पुन्हा देशाला संबोधित करण्याची शक्यता

0
187

नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढवण्याच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे चर्चा करणार आहेत. हा चर्चेनंतर मोदी लॉकडाऊनच्या मुद्यावर देशाला पुन्हा संबोधित करण्याचीही शक्यता आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी देशाला अनेकदा संबोधित केले आहे.

८ एप्रिल रोजी मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या सर्व पक्षीय बैठकीत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षाचे एकमत झाले होते.

गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन एकदम समाप्त करणे शक्य नाही. कोरोनाच्या संकटाच्या आधीचे जीवन आणि या संकटानंतरचे जीवन सारखे असणार नाही, असेही मोदी म्हणाले होते. कोरोनाच्या संकटानंतरच्या जीवनात अनेक सामाजिक, व्यावहारिक आणि वैयक्तिक बदल होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पंजाब सरकारने त्या राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी १ मेपर्यंत तर ओडिशा सरकाने तेथील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यास पाठिंबा दिला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही १४ एप्रिलला लॉकडाऊन संपेल की नाही, हे परिस्थिती आणि  लोकांच्या वर्तनावर अवलंबून राहील, असे स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा