उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया सोपी करणारः गुंतवणुकदारांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

0
14
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे अर्थचक्र सुरु झाले आहे. राज्यात गुंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात आहे. अनेक अनावश्यक परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती वाढावी यासाठी आणखी काही परवानग्यांची संख्या कमी करुन ही प्रक्रिया अधिक सोपी करणार असल्याचे तसेच खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींची एक समिती तयार करून राज्यातील उद्योगवाढीसाठी आवश्यक अशा सूचना या समितीच्या माध्यमातून मागविण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

आज खासगी गुंतवणूक संस्थांच्या (प्रायवेट इक्विटी फर्म्स) प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते.

कोरोनाने आपल्याला ‘घरी राहा- सुरक्षित राहा’ हे शिकवले आहे. याच धर्तीवर राज्यातील गुंतवणूक सल्लागारांनी सर्व गुंतवणूकदारांना राज्यातच गुंतवणूक करण्याचा सल्ला द्यावा. राज्यातील त्यांची गुंतवणूक ही सुरक्षित राहील हा विश्वास त्यांनी निश्चित ठेवावा. राज्यात ग्रीन इंडस्ट्रीला चालना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या उद्योगांना खूप परवानग्यांची गरज नाही आणि ज्यांची लगेच सुरुवात करता येईल, अशा उद्योगांना ग्रीन उद्योग झोनमधून तात्काळ कार्यरत करण्याची प्रक्रिया सुरु करता येईल. यासाठी सिंगल विंडो सिस्टीम त्यांना मदतीची ठरु शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सूचनांचे स्वागतः देसाई- राज्याने उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केलेला आहे. परवानग्यांची संख्या 76 वरुन 25 वर आणली आहे. भविष्यातही राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी आलेल्या तज्ज्ञांच्या सर्व सूचनांचे स्वागत केले जाईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले.

मुंबईनजीकच मॉडेल फार्मा पार्कः मुंबई नजीकच मॉडेल फार्मा पार्क तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर नव्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रॉनिक पार्कही उभे राहात आहे. उद्योगवाढीच्या योजनांसाठीची ही केवळ सुरुवात आहे. आपल्याला सर्वांच्या साथीने लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा विश्वास शासनाच्या पाठीशी राहिल, अशी आशा त्यांनी  व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा