विमानाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारणार, १४ दिवस घरीच रहाणे बंधनकारक

0
61
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: देशांतर्गत विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु करण्यात आली असून या माध्यमातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका आज निर्गमित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि या प्रवाशांनी १४ दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) राहणे बंधनकारक असून या कालावधीत आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे.

प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्यांच्या वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. तथापि, हा प्रवास विमानतळ ते कंटेनमेंट झोन किंवा कंटेनमेंट झोन ते विमानतळ असा करता येणार नाही, ही बाब या मार्गदर्शिकेत स्पष्ट करण्यात आली आहे.

राज्यात या मार्गदर्शिकेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी विमानतळ असलेल्या संबंधित महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश सोमवारी निर्गमित करण्यात आले.

प्रवाशांची नावे, त्यांच्या आगमनाचा दिवस आणि वेळ, मोबाइल क्रमांक, पत्ते इत्यादी सविस्तर माहिती संबंधित एअरलाइन्स आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधीत नोडल अधिकाऱ्यास उपलब्ध करुन द्यावयाची आहे. आदी विविध सूचना मार्गदर्शिकेद्वारे देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा