परळीत एक रूपयात थर्मल टेस्टिंग, घरोघरी जाऊन केली १ लाख १४ हजार नागरिकांची तपासणी

0
62

परळी : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाथ प्रतिष्ठान व मुंबई येथील वन रुपी क्लिनिकच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ८ दिवसात परळी येथे घरोघरी नागरिकांचे केवळ १ रुपयात थर्मल टेस्टिंग करण्यात आले असून या माध्यमातून एकूण १ लाख १४ हजार नागरिकांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली.

या पूर्ण तपासणीसाठी वन रुपी क्लिनिकच्या दहा डॉक्टर्सची टीम गेल्या आठ दिवसांपासून परळीत होती. या चाचणीदरम्यान शहरात तापाचे ८५, सर्दी – खोकल्याचे ३४ तर अन्य किरकोळ आजाराचे २३ रुग्ण आढळून आले असून त्यांची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयांस कळवण्यात आली आहे आणि आवश्यकतेनुसार स्वॅब टेस्ट व अन्य वैद्यकीय उपचारांचा सल्ला देण्यात आला आहे.

वन रुपी क्लिनिकने या कठीण काळात सामाजिक भान ठेवून या संपूर्ण टेस्टिंगसाठी केवळ ‘एक रुपया’ फीस घेतली असून धनंजय मुंडे यांनी वन रुपीचे संचालक डॉ. राहुल घुले यांना एक रुपया देऊन समस्त परळीकरांच्या वतीने त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. मुंडे यांच्या परळीतील नागरिकांप्रति असलेल्या तळमळीने आम्ही भारावून गेलो, वन रुपी क्लिनिकने आज १ लाख १४ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण केली. भविष्यात कोणत्याही वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास आमची सर्व टीम कधीही सेवेसाठी तयार असेल. सध्या कोरोनाचे संकट पूर्णपणे टळेपर्यंत आमचे दोन डॉक्टर्स परळीतच राहणार असल्याचे वन रुपीचे संचालक डॉ. घुले म्हणाले.

परळी मतदारसंघात दोन मोबाइल हॉस्पिटलः परळीत येऊन गेल्या ८ दिवसात १ लाख १४ हजार नागरिकांचे नाममात्र दरात टेस्टिंग करणाऱ्या वन रुपीच्या टीमचे मुंडे यांनी आभार मानले. वन रुपीच्या धर्तीवर परळी मतदारसंघात लवकरच शहरात एक व ग्रामीण भागात एक असे दोन सुरू करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.परळीत वन रुपी क्लिनिकची कायमची शाखा सुरू करण्याचा मानसही यावेळी मुंडे यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जि. प. गटनेते अजय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, चंदूलाल बियाणी, डॉ. मधुसूदन काळे, डॉ. अजय मुंडे, अनंत इंगळे, अनिल अष्टेकर, रमेश चौंडे, राहुल ताटे आदींची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा