कोरोनाग्रस्तांना किटकनाशकाचे इंजेक्शन द्याः डोनाल्ड ट्रम्प यांचा अघोरी सल्ला

0
808
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः कोरोनाग्रस्तांना किटकनाशकाचे इंजेक्शन देऊन या विषाणूचा संसर्ग दूर केला जाऊ शकतो का? यावर संशोधन झाले पाहिजे, असा अघोरी सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आणि सर्वत्र खळबळ उडाली. ट्रम्प यांच्या या विधानाला डॉक्टरांनी तर जोरदार विरोध केलाच परंतु राजकीय वर्तुळातही ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांवर अल्ट्रा व्हायोलेट किरणांच विकिरण सोडण्यात आले पाहिजे. म्हणजे कोरोना विषाणू मरून जाईल, असेही ट्रम्प म्हणाले. डॉक्टरांनी ट्रम्प यांचा हा सल्लाही धुडकावून लावला आहे.

व्हाइट हाऊसमध्ये कोरोना टास्क फोर्सची बैठक गुरूवारी सुरू होती. सूर्याचा प्रकाश आणि तापमानाचा प्रभाव यामुळे कोरोना विषाणू कसा कमकुवत होत चालला आहे. ब्लीच आणि अल्कोहोलव्दारेही कोरोना विषाणूचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो, असे या बैठकीत सांगण्यात आले. त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बैठकीला हजर असलेले टास्क फोर्सचे सदस्य डेबोरा बर्क्स यांच्याकडे वळले आणि म्हणाले, ‘सूर्याचा तीव्र प्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणे शरीरावर टाकल्याने काय होईल? मला वाटते यावर संशोधन झालेले नाही आणि तुम्ही ते करायला निघाला आहात आणि किटकनाशक तर एक मिनिटांतच आपले काम फत्ते करून दाखवते. आपण रोग्याच्या शरीरात इंजेक्शनद्वारे किटकनाशक सोडू आणि त्यामुळे शरीर साफ होईल, असा काही मार्ग आहे का की आपण असे करू शकू?  हे तपासून पाहणे मनोरंजक ठरेल.’

आपण काही डॉक्टर नाही, एक सामान्य माणूस आहोत. पण मी अशी माहिती ठेवतो, असे सांगायलाही ट्रम्प विसरले नाहीत. ट्रम्प यांच्या या विधानांनंतर त्याच बैठकीत खुद्द राष्ट्राध्यक्षच अशा पद्धतीच्या गोष्टी करून लोकांमध्ये चुकीच्या धारणा पसरवत आहेत, असे सवाल उपस्थित केले गेले. डॉक्टरांनी ट्रम्प यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त करत असे केल्यामुळे मृत्यूलाच निमंत्रण मिळू शकते, असा इशारा दिला आहे. मानवी शरीरात इंजेक्शनद्वारे किटकनाशक सोडण्याचा ट्रम्प यांचा सल्ला आपणच आपला कपाळमोक्ष करून घेण्यासारखा आहे. या गोष्टी मुळातच विसंगत, निरर्थक आणि कोणत्याही पुराव्याचा आधार नसलेल्या आहेत, असे कोलंबिया विद्यापीठातील सेंटर फॉर डिजास्टर प्रिपेडनेसचे संचालक डट. इर्विन रेडलेनर यांनी म्हटले आहे.

फुफ्फुसतज्ज्ञ डॉ. विन गुप्ता म्हणाले की, शरीरात कोणत्याही प्रकारचे किटकनाशक किंवा स्वच्छता करणारी वस्तू सोडण्याबद्दलचे हे विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आणि अत्यंत घातक आहे. जेव्हा कुणी आत्महत्या करू इच्छितो, तेव्हा तो असे करतो, असे फुफ्फुसतज्ज्ञ डॉ. विन गुप्ता म्हणाले. राजकीय वर्तुळातही ट्रम्प यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. डेमॉक्रॅटिक पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार जो बिडेन यांनीही ट्रम्प यांच्यावर टिकास्त्र सोडताना ‘अल्ट्रा व्हायोलेट किरणे? किटकनाशकांचे इंजेक्शन? राष्ट्राध्यक्ष महोदय, मला वाटते जास्तीत जास्त लोकांची तपासणी झाली पाहिजे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्सची व्यवस्था!’,  असे म्हटले आहे.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मलेरियाच्या उपचारासाठी वापरात येणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध प्रभावी असल्याचे म्हटले होते आणि त्यासाठी त्यांनी भारताकडून ३.२ कोटी गोळ्यांची व्यवस्थाही केली. या गोळ्या मिळवण्यासाठी त्यांनी भारतावर दबाव टाकला. भारताने हे औषध दिले नाही तर बदला घेऊ, अशी धमकीही दिली होती. कोरोनाग्रस्तांना क्लोरोक्वीनचा प्रयोग केल्यामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या वाढल्याचे अमेरिकेतील सरकारी रूग्णालये आणि लष्करातील निवृत्त लोकांच्या रूग्णालयात केलेल्या परीक्षणात आढळून आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा