बचत गटांचे मास्क देताहेत सुरक्षित श्वास!

कोरोना संकटात नाशिक जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार मास्कची निर्मिती करण्यात आली असून त्यातून महिला बचत गटांना ४२ लाख ५५ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

0
88

नाशिक:  दर उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटांपुढे यंदा कोरोना महामारीच्या संकटाने मोठा पेच निर्माण केला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ‘आपत्तीतून इष्टापत्ती’ साधत या बचतगटांतील महिलांमध्ये आत्मविश्वास  निर्माण करून मास्क निर्मितीचा मंत्र दिला आणि पाहता पाहता या लघुउद्योगाने  संपूर्ण जिल्ह्याला एक प्रकारे कोरोनाशी लढण्यासाठी  ‘सुरक्षा कवच’च  तयार करून दिले. नाशिक जिल्ह्यातील २५३ बचत गटांनी तब्बल ४ लाख ३६ हजार मास्क निर्मिती केली असून, त्यापैकी ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री केली आहे. त्यातून तब्बल ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २५ मार्च २०२० रोजी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊनमुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अनेकांचे रोजगार गेले. उन्हाळ्यात वाळवणं तयार करुन लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या बचतगटाच्या हाताचेही काम गेले. गटातील महिलांचाही उपजीविकेचा प्रश्न उभ राहिला. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी  या बचत गटांना ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर मास्क तयार करून त्याची विक्री करावी, असे आवाहन करून बचतगटाच्या काम करणाऱ्या महिलांमध्ये एक ऊर्जा निर्माण केली. जिल्ह्यातील २५३ बचतगटांनी लीना बनसोडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आजपर्यंत ४ लाख ३३ हजार मास्कची विक्री करून ४२ लाख ५५ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.

सामाजिक बांधिलकीतून उपजिविका: कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क गरजेचा आहे. आज घराबाहेर पडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसतो. मात्र मास्क वापराची जनजागृती करीत असताना जाणविले की ग्रामस्तरावर मास्कचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे तालुकास्तरावरुन बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देऊन त्यांची उपजीविका साधण्याचा सुवर्णमध्य जिल्हा परिषदेने साधला.

………………………………………….
आकडे बोलतात…

नाशिक जिल्ह्यात १५ तालुक्यातील उपक्रम.
२५३ बचत गटांचा समावेश.
४ लाख ३६ हजार मास्कची निर्मिती.
४ लाख ३३ हजार ४२८ मास्कची विक्री.
४२ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न.
………………………………………….

प्रबोधन करणाऱ्या वर्गाला मास्कची आवश्यकता : कोरोनापासून बचाव कसा करावा याबाबत प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यात साडेतीन हजार आशा, ७३९ आरोग्य सेविका, ३२८ आरोग्य सेविका व ९ हजार १०६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सर्वांना मास्क अत्यंत गरजेचे असल्याने स्वयंसहायता समूह बचत गटांकडून मास्क तयार करण्यात आले व बचतगटांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.

“बचत गटांच्या चळवळीवर आणि त्यांच्या कामावर माझा पूर्ण विश्वास आहे. गेल्या १२ वर्षांपासून मी या बचत गटांचे काम खूप जवळून पाहिले आहे. त्यात सहभाग घेतला आहे. करोना संकटसमयी मला खात्री होती की, बचत गटांच्या माध्यमातून आपण खूप मोठे काम उभे करू शकतो. आमच्या आवाहनाला महिलांनीही प्रतिसाद दिला. त्यांच्या हातांनाही काम मिळाले, रोजगार मिळाला. खास करून त्यांचा आत्मविश्वासही वाढला.”
लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा