‘बामु’च्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशींचा सेवाखंड क्षमापनही बेकायदेशीरच, असा आहे घोटाळा…

0
486
संग्रहित छायाचित्र.
  • सुरेश पाटील/ औरंगाबादः

जन्माने मराठा असूनही व्हीजेएनटी प्रवर्गातील ‘राजपूत भामटा’ जातीचे प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे उच्च शिक्षणातील अध्यापन क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या आणि नंतर आपले शिक्षण आणि नोकरी दोन्हीही गुणवत्तेच्याच आधारे झालेले आहे, असा शपथपत्रात दावा करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या सेवाकाळाच्या प्रारंभापासून ते आजपर्यंतच्या प्रवासात पदोपदी ‘गुणवत्ते’चीच प्रचिती देणारे अनेक पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले आहेत. त्याचा पर्दाफाश न्यूजटाऊनने याआधीच्या तीन भागात केलेला आहेच. आता त्यांनी मिळवलेल्या सेवाखंड क्षमापनातही घोटाळा असल्याचे आणि त्यात औरंगाबादच्या उच्च शिक्षण सहसंचालकांनी  १२ ऑगस्ट १९९९ च्या शासन आदेशाचे उल्लंघन करून हडेलहप्पी केल्याचे स्पष्ट होत आहे.

डॉ. जयश्री राजेश सूर्यवंशी (माहेरचे नावः जयश्री मारोतीराव शिंदे) यांनी २४ जानेवारी १९९० रोजी आंतरजातीय विवाह केल्यानंतर जन्मतः मराठा असूनही विवाहानंतरच्या दहाव्याच महिन्यात म्हणजेच १५ नोव्हेंबर १९९० रोजी कन्नडच्या तहसील कार्यालयातून ‘राजपूत भामटा’ जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्या आधारेच त्यांचा उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापकीय आणि प्रशासकीय सेवेचा प्रवास झाला. मात्र या जातप्रमाणपत्रावर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर ‘आपण मिळवलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र शोभेची वस्तू असल्यासारखे पडून आहे. या प्रमाणपत्राचा आपण कधीही वापर केलेला नाही. आपले शिक्षण आणि नोकरी दोन्हीही गुणवत्तेच्या आधारेच आहे,’ असे त्यांनी औरंगाबादच्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर नोटरीद्वारे साक्षांकित केलेल्या शपथपत्रावर ठासून सांगितले आहे.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना आज जे ‘राजपूत भामटा’ जातीचे प्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’ वाटते, त्याच ‘शोभेच्या वस्तू’च्या आधारेच त्यांनी औरंगाबादच्या सौ. इं.भा.पा. महिला महाविद्यालयात पुरेशी शैक्षणिक पात्रता धारण करत नसतानाही वाणिज्य विषयातील सहायक प्राध्यापकाची (तत्कालीन अधिव्याख्याता नामाभिधान) मिळवली. तब्बल सहावर्षे महिला महाविद्यालयात सहायक प्राध्यापकाची नोकरी केल्यानंतर त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात सहायक प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर त्यांनी या ‘शोभेच्या वस्तू’ आधारे महिला महाविद्यालयात मिळवलेला अध्यापनाच्या अनुभवाच्या जोरावर प्राध्यापकपद आणि नंतर कुलसचिवपदापर्यंत मजल मारली आहे.

हेही वाचाः डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या ‘गुणवत्तेच्या आधारे’ निवड झाल्याच्या दाव्यातही खोटच, ही वाचा वस्तुस्थिती…

तब्बल १५ महिने ९९ दिवसांचा सेवाखंडः डॉ. जयश्री सूर्यवंशी डॉ. सौ. इं.भा. पा. महिला महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून रूजू झाल्यानंतर १९९४ ते १९९९ या काळात त्यांच्या सेवेत तब्बल सहावेळा खंड पडला आहे. १६ एप्रिल १९९४ ते ३ ऑगस्ट १९९४ असे ३ महिने १९ दिवस, ९ एप्रिल १९९५ ते ३ जुलै १९९५ असे २ महिने २६ दिवस, १६ एप्रिल १९९६ ते ३१ जुलै १९९७ असे ३ महिने १५ दिवस, १६ एप्रिल १९९७ ते ३१ जुलै १९९८ असे ३ महिने १५ दिवस, १६ एप्रिल १९९८ ते ३०  जून १९९८ असे २ महिने १५ दिवस आणि १६ एप्रिल १९९९ ते २४ जून १९९९ असे २ महिने ९ दिवस असा एकूण १५ महिने ९९ दिवसांचा सेवाखंड आहे.

हेही वाचाः डॉ. जयश्री सूर्यवंशींच्या ‘गुणवत्ते’वर ‘परफॉर्मन्स नॉट सॅटिसफॅक्टरी’चा निवड समितीचाच शेरा, पण…

औरंगाबाद विभागाचे तत्कालीन उच्च शिक्षण सहसंचालकांनी ९ जानेवारी २००२ च्या पत्रान्वये डॉ. सूर्यवंशी यांचा सेवाखंड क्षमापित केला आहे. हे सेवाखंड क्षमापन फक्त सेवानिवृत्तीच्या लाभापुरतेच मर्यादित आहे. हा सेवाखंड क्षमापन वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणी किंवा वेतन निश्चितीच्या आर्थिक लाभांसाठी नाही, असेही या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. परंतु डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा हा सेवाखंड क्षमापित करताना उच्च शिक्षण सहसंचालकांनी बेकायदेशीररित्या कृती केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी प्र.ना. ढवळे यांनी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेले पत्र

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उच्च शिक्षण सहसंचालकही गोत्यातः १९९९-२००० या शैक्षणिक वर्षापासून महिला महाविद्यालय शंभर टक्के अनुदानावर आल्यानंतर महाविद्यालयात कार्यरत असलेल्या अधिव्याख्यातांचा सेवाखंड क्षमापित करण्याची कार्यवाही करताना संबंधितांच्या सेवेबाबत आवश्यक ती तपासणी करणे आवश्यक होते. परंतु सदर कार्यवाही योग्य प्रकारे केली नसल्याचे निदर्शनास येते. सबब सदर कार्यवाही संदर्भात संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून नियमोचित कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देशच राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी प्र.ना. ढवळे यांनी १७ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या पत्रान्वये राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांना दिले आहेत. त्यामुळे आता डॉ. सूर्यवंशी यांचा सेवाखंड बेकायदेशीररित्या क्षमापित करणारे औरंगाबादचे तत्कालीन उच्च शिक्षण सहसंचालकही कारवाईच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा