अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

0
145
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केल्यामुळे गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची रवानगी १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत केली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीनेही गुन्हा नोंदवून देशमुख यांना समन्स बजावले होते. ईडीच्या कारवाईविरोधात देशमुखांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी देशमुख स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची १२ तास चौकशी केल्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री त्यांना अटक केली होती. २ नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली होती.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

ईडीच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. देशमुख यांची आणखी चौकशी करण्याची आवश्यकता असून त्यांची ईडी कोठडी नऊ दिवसांनी वाढवण्याची विनंती ईडीने केली होती. मात्र ती विनंती फेटाळत न्यायालयाने देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत अनिल देशमुखांची रवानगी १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत केली आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे, असे देशमुख यांचे वकील ऍड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा