‘पहले हिजाब, फिर किताब…’ बीडमध्ये पोस्टरबाजी, मालेगावात मोर्चा; कर्नाटकच्या घटनेचे पडसाद

0
262
छायाचित्रः सोशल मीडिया.

बीड/मालेगावः विद्यार्थीनींनी शाळा- महाविद्यालयात हिजाब घालून येण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे कर्नाटकांत मोठे वादंग माजले असतानाच त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. बीडमध्ये ‘पहले हिजाब, फिर किताब… क्यों की हर किमती चीज पर्दे मेंही होती है…’ अशा आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत. तर मालेगावमध्ये मुस्लिम महिलांनी रस्त्यावर उतरून मोर्चा काढला.

कर्नाटकमधील हिजाब बंदीचा वाद सध्या चांगलाच चिघळला आहे. उडपीमधील काही विद्यार्थीनींना हिजाब परिधान करून आल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे या वादाला सुरूवात झाली. जर ड्रेस कोड लागू असेल तर वेगळा पोशाख घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बसू दिले जाणार नाही, अशी भूमिका महाविद्यालयाने घेतली आहे. महाविद्यालयाच्या या निर्णयाला मुस्लिम विद्यार्थीनींनी विरोध केला. त्याविरोधात या मुलींनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. हिजाब घालू न देणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे आणि कलम १४ आणि २५ चे उल्लंघन आहे, असे मुस्लिम विद्यार्थींनीचे म्हणणे आहे. मुस्लिम विद्यार्थीनींनी सुरू केलेल्या हिजाब बंदी विरोधातील आंदोलनाला विरोध म्हणून भगवी उपरणी गळ्यात टाकून विद्यार्थी आणि विद्यार्थीनीही रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळला आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कर्नाटकातील हिजाब बंदीचा वाद हा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जातीय ध्रुवीकरण करण्यासाठी मुद्दामच उकरून काढण्यात आल्याची टीका होत असतानाच त्याचे पडसाद देशातील अन्य भागातही उमटू लागले आहेत. मराठवाड्यातील बीडमध्ये ‘पहले हिजाब, फिर किताब…’ अशा आशयाचे झळकलले पोस्टर्स ही त्याचीच प्रतिक्रिया आहे. फारूखी लूखमान नावाच्या विद्यार्थी नेत्याने बीडमध्ये ‘पहले हिजाब, फिर किताब…’ चे पोस्टर्स लावले आहेत. बीडच्या शिवाजी महाराज चौक, बशीर गंज चौक, राजुरीवेस परिसर या भागात  डिजिटल प्रिंट केलेले हे पोस्टर्स लावण्यात आले असून हे पोस्टर्स चर्चेचा विषय ठरले आहेत.

 मालेगावमध्ये मुस्लिम महिला रस्त्यावरः कर्नाटकमधील हिजाब बंदीच्या निषेधार्थ बीडमध्ये पोस्टर्स झळकले असतानाच मालेगावमध्ये मुस्लिम महिला हिजाबच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. मुस्लिम महिलांनी रस्त्यावर उतरून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि काही काळ धरणे आंदोलनही केले. आंदोलनात सहभागी झालेल्या संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत कर्नाटक सरकारचा निषेधहबी केला. कर्नाटक सरकार भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणत असल्याचा आरोप मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी केला आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

कर्नाटकात वाद चिघळलाः कर्नाटकमध्ये हिजाब बंदीच्या वादामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्बई यांनी राज्यातील सर्व हायस्कूल- महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा-महाविद्यालये बंद असतानाच आज कर्नाटकच्या शिमोगा येथील एका महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावला. व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार एक विद्यार्थी राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर भगवा ध्वज फडकवत आहे आणि तेथे उपश्ति असलेले विद्यार्थी जल्लोष करत आहेत. या बहुतांश विद्यार्थ्यांच्या हातात भगवे झेंडे आणि गळ्यात भगवे उपरणे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा