शरद पवार-मोदींच्या दिल्लीतील भेटीवरून महाराष्ट्रात राजकीय गलबला; पण भाजपच म्हणते…

0
149
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी ट्विट केले छायाचित्र.

नवी दिल्ली/मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राजधानी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चाललेल्या भेटीवरून देशात तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच महाराष्ट्रातही राजकीय गलबला सुरू झाला आहे. मात्र या भेटीमुळे महाराष्ट्रात कोणतीही राजकीय घडामोड घडण्याची शक्यता नाही, असे भाजपनेच स्पष्ट केले आहे.

या भेटीनंतर खुद्द शरद पवार यांनीच ट्विट करून राष्ट्रीय हिताच्या विविध मुद्यावर चर्चा झाली, असे सांगितले असले तरी या दोन नेत्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक अंदाज बांधले जात आहेत. मोदी-पवार यांच्यातील ही भेट मोदींच्या निवासस्थानी नव्हे तर साऊथ ब्लॉकमधील प्रधानमंत्री कार्यालयात झाली. संकेतांनुसार शासकीय कार्यालयात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा होत नाही. असे असले तरी तासभर चाललेल्या या भेटीत राजकीय चर्चा नक्कीच झाली असणार, असा राजकीय विश्लेषकांचा कयास आहे.

विशेष म्हणजे शरद पवार प्रधानमंत्री मोदींच्या भेटीला जाण्याआधी पियुष गोयल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. गोयल यांच्या पाठोपाठ केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पवारांची भेट घेतली होती. या दोघांच्या भेटीनंतर पवार- मोदी यांची भेट झालेली भेट आणि या भेटीत तासभर चाललेली खलबते यावरून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

 गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत घेतले जात आहे. काही दिवसांपूर्वीच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर बिगरभाजप राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीचाही सपाटा लावला होता. तेव्हापासून पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीत राष्ट्रवतीपदाविषयीही चर्चा झाली असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

… म्हणून घेतली भेटः उभयतांतील या भेटीचे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात लगेच पडसाद उमटले. विविध पातळ्यांवर या भेटीविषयी अंदाज बांधले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या भेटीविषयी खुलासा केला. देशाच्या वेगवेगळ्या भागातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील लोकांनी गेल्या महिना-दीडमहिन्यात अनेक पत्रे पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजे, यासाठी शरद पवार प्रधानमंत्री मोदींना भेटायला गेले, असे पाटील म्हणाले.

मोदी-पवार भेटीविषयी वावड्याः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही पत्रकार परिषद घेऊन या भेटीविषयी खुलासा केला. या बैठकीनंतर विरोधी पक्ष चुकीच्या वावड्या उठवत आहेत. या बैठकीबाबत काँग्रेस नेत्यांना माहिती देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनाही या भेटीबद्दल कल्पना देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यंच्या कोणतीही बैठक झालेली नाही, असे मलिक म्हणाले. पवार आणि मोदी यांच्या भेटीत सहकारी बँकेच्या प्रणालीत केलेल्या बदलांविषयी चर्चा झाली. बँकिंग रेग्युलेटरी ऍक्टमध्ये करण्यात आलेले बदल सहकारी बँकांसाठी धोकादायक आहे. याबाबत पवारांनी मोदींशी फोनवर चर्चा केली होती. मात्र याविषयी भेटून चर्चा करू, असे मोदींनी सांगितल्यामुळे आज प्रत्यक्ष भेटून या विषयावर चर्चा झाली, असेही मलिक म्हणाले.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता कमीचः पवार-मोदी भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा होत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र ती शक्यता फेटाळून लावली आहे. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता कमीच आहे. कारण नाईलाज म्हणून महाविकास आघाडीला एकत्र रहावेच लागणार आहे, असे पाटील म्हणाले. लोकसभा आणि राज्यसभा सुरू होण्यापूर्वी काही विषयांवर चर्चा करणअयासाठी मोठे नेते प्रधानमंत्र्यांची भेट घेत असतात. कृषी कायदे, ओबीसी आरक्षण, सहकार खात्याबाबत चर्चा करण्यासाठी पवार यांनी मोदींची भेट घेतली असावी. त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली असावी. या व्यतिरिक्त काही खास चर्चा झाली असेल तर माहिती नाही, असेही पाटील म्हणाले.

धक्कादायक असे काय?: शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली. या भेटीबाबत आश्चर्य वाटावे, धक्कादायक असे काय आहे? शरद पवार हे माजी कृषीमंत्री, संरक्षणमंत्री आहेत. सहकार क्षेत्रातील दिग्गज असे नेतृत्व आहे. अशा एखाद्या प्रश्नासाठी शरद पवार हे त्यांना भेटले असतील. या भेटीबाबत विश्वासात घेण्याचा प्रश्नच कुठे येतो? संसद सदस्य प्रधानमंत्र्यांना भेटू शकत नाही का? या भेटीवरून होणाऱ्या राजकीय चर्चांना अर्थ नाही, असे राऊत म्हणाले.

हालचाली तर वाढणारचः  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीवर भाष्य केले. अमित शाह यांच्याकडे सहकार खाते गेल्यानंतर हालचाली निश्चितच वाढणार आहेत. या हालचाली भीतीपोटी आहेत की आतापर्यंत एकाधिकार होता. राजेशाही होती. जे मनात आले ती कृती सत्तेचा उपयोग करून केली जायती. आता तुम्हाला स्वैराचार करण्यास बंदी आहे. पण शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट सहकार कायद्याच्या संदर्भात असेल असे वाटत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा