पुस्तकदिन विशेषः बाबासाहेब,पुस्तकप्रेम आणि ज्ञानार्जन!

0
214
संग्रहित छायाचित्र.

बाबासाहेब एकदा म्हणाले होते की, तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल. दुसऱ्यांचे विचार डोळेबंद करून फॉर्वर्ड करणाऱ्या आजच्या पिढीने आजच्या पुस्तकदिनी बाबासाहेबांचा हा वसा घ्यायला काय हरकत आहे?

  • डॉ. अतुलकुमार चौरपगार

आजपर्यंत जे समाजसुधारक झाले त्यांनी सामाजिक सुधारणांकरीता शिक्षणाचा वापर केला व शिक्षणाचे सार्वत्रिकरन करणे हे प्रमुख उदिष्ट समोर ठेवले. समाजातील सर्व स्तरांतील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अशा थोर समाजसुधारकांच्या अग्रस्थानी येते. शिक्षणाशी संबंधित असलेल्या शिक्षणसंस्था, विद्यार्थी व शिक्षक या घटकांविषयी सखोल चिंतन करून अत्यंत तळमळीने डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले. त्यांच्या मते, शिक्षणाचे जे घटक आहेत त्यामध्ये विद्यार्थी व शिक्षक हे प्रमुख घटक आहेत. यापैकी कोणताही घटक प्रामाणिक नसेल तर प्राथमिक तसेच उच्चशिक्षण अंधारमय होईल यात काही शंका नाही. शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करावे व विद्यार्थ्यानी ज्ञान आत्मसात करण्याचे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे समाज सुधारण्याचे विचार दिले. परंतु शिका सोडून संघटित होऊन दिशाहीन संघर्षाकडे अधिकचे लक्ष दिले जात आहे. ज्यामुळे मोठ्याप्रमाणात सामाजिक तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्वक उच्चशिक्षणासाठी झटून अभ्यास केला पाहिजे. जेणेकरून नोकरी व व्यवसायमध्ये महत्वाच्या जागेवर कामाची संधी मिळेल, असे विवेचन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बऱ्याच भाषणात विशेषतः विद्यार्थ्यांसामोर केलेल्या भाषणात आढळून आले आहे. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाच्या सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते असे दिसून येते. त्यांच्या मते, शिक्षण ही एक पवित्र सामाजिक संस्था आहे. शिक्षण संस्थेमध्ये समाजात राष्ट्रीयतेचे, मानवतेचे आणि अज्ञान दूर करण्याचे सामर्थ्य असते.  यामुळेच अन्य सामाजिक संस्थांपेक्षा शिक्षण संस्था या अत्यंत महत्वाच्या असतात. शिक्षणाने विद्यार्थी सक्षम झाला तर तो समाज जीवनात चांगले योगदान देऊ शकतो. म्हणून शिक्षकांनी ज्ञानार्जन हे एकच ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे असे प्रतिपादन बाबासाहेब करतात.

शिक्षणाशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. ती महासागरासारखी आहे. शिक्षणात समाजातील गुलामगिरी नष्ट करण्याची ताकद असते. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ‘उपासमारीने पोषण कमी झाल्यास माणूस हीनबळ होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसर्‍याचा गुलाम बनतो.’ सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध आहे. हेच उद्धिष्ट ठेऊन सन १९४५ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मुंबई येथे स्थापन करून शिक्षणाच्या सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ सर्वप्रथम बाबासाहेब रोवतात. या शिक्षण संस्थेच्या नावामध्येच ‘पीपल्स एज्युकेशन’ हा प्रमुख उद्धेश आहे.  त्यांनी सन १९४६ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर ०१ सप्टेंबर १९५१ रोजी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसोबतच सर्व जातींच्या आणि धर्मांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी हे प्रमुख उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊनच!  यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाच्या प्रगतीचाच विचार करीत होते हे दिसून येते.

बाबासाहेबांचे पुस्तकप्रेम तर सर्वोच्च होते. त्यांनी ग्रंथ हेच आपले गुरू मानले. बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव होते की, त्यांनी केवळ पुस्तकांसाठीच बंगला बांधला आणि त्यात बावीस हजारांपेक्षाही जास्त पुस्तकांचा संग्रह केला होता. बाबासाहेब एकदा म्हणाले होते की, तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल. बाबासाहेबांचे पुस्तक प्रेम अपार होते. पुस्तकांची आवडही त्यांची कधीही न संपणारी तृष्णा झाली होती. पुस्तकांबद्दलची बाबासाहेबांची आस्था क्वचितच कोणाकडे दिसून येईल, बाबासाहेबांचा हा गुण ज्ञानार्जनाकडे वळवण्यासाठी सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. दुसऱ्यांचे विचार डोळेबंद करून फॉर्वर्ड करणाऱ्या आजच्या पिढीने आजच्या पुस्तकदिनी बाबासाहेबांचा हा वसा घ्यायला काय हरकत आहे?

विद्यार्थ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे हा त्यांचा आग्रह होता. उच्चशिक्षण घेण्यासाठी सर्व समाज घटकांनी पुढे यावे असे त्यांना नेहमी वाटत होते. परंतु आज २१ व्या शतकातसुद्धा बरेच सामाजिक घटक उच्च शिक्षणापासून उपेक्षितच आहेत.  याचे प्रामुख्याने नमूद करावे असे कारण म्हणजे शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात झालेले आणि होत असलेले खाजगीकरण हे होय. गेल्या शतकात शिक्षणविषयक निर्णयामध्ये विनाअनुदानित महाविद्यालये व विद्यापीठांची मोठ्या प्रमाणात स्थापना करुन सर्वांना शिक्षण मिळावे हे उद्दिष्ट होते. परंतु सद्स्थितीत काही अपवाद वगळता अशाप्रकारे चालवली जाणारी महाविद्यालये व विद्यापीठे सामाजिक / नैतिक मूल्यांचे पालन करतांना दिसत नाहीत. शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा नफ्याचे महत्तमीकरण करण्यासाठी शिक्षण शुल्कात वाढ करण्यात येत आहे. यापुढील पाऊल म्हणजे या संस्थांना दिली जाणारी शैक्षणिक स्वायत्तता. यामुळे कोणत्याही जाती-धर्मातील सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांना उच्च गुणवत्तापूर्वक शिक्षण घेणे कठीण होईल. सध्यस्थिती बदलावायची असेल तर क्रांतिबा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षि धोंडो केशव कर्वे यांनी घालून दिलेल्या तत्वांचा आपणास अंगीकार करावा लागेल.

२१ व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ नुसताच प्रेरणादायी नसून त्यांच्या विचारांमध्ये असणारी व्यापकता, पारदर्शकता आणि सामाजिक न्यायाप्रतीची बांधिलकी,  या सर्व बाबींना पुन्हा एकदा उजळा देण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा संदर्भ आणि उपयोगिता ही कालसापेक्ष नसून कालनिरपेक्ष आहे, याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांचे सामाजिक पुररूज्जीवन करण्याची गरज निर्माण झाली असून या बाबींचा आपण सर्व समाजघटकांनी गांभीर्याने विचार करायला हवा!

(लेखक अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादा पाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहेत.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा