‘दोन गडी कोल्हापुरी’ हा हॅशटॅग घेऊन आनंदी जीवनाचा संदेश देत दोन तरूण सायकलने दिल्लीत

0
43
आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे

नवी दिल्ली : ‘दोन गडी कोल्हापुरी’ हा हॅशटॅग घेऊन कोल्हापुरातील आकाश बोकमुरकर आणि अनिकेत कांबळे या दोन तरूणांनी सायकलद्वारे 2 हजार किलोमीटर प्रवास करून आनंदी जीवनाचा संदेश देत दिल्ली गाठली आहे.

आज या तरूणांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी आकाश आणि अनिकेत यांचा उत्साह वाढवित पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारीपूर्वी दिल्लीत येण्याचा संकल्प आकाश आणि अनिकेत यांनी केला होता, तो त्यांनी वेळच्या आतच पूर्ण केला.  आनंदी जीवनाचा संदेश देत हा प्रवास केला असून प्रवासातही आनंद मिळाल्याचा अनुभव आकाश आणि अनिकेत यांना आला. 2 जानेवारीपासून सुरू झालेला प्रवास दिल्लीत 23 जानेवारीला संपला. हा प्रवास मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांमधून झाला असल्यामुळे आपला भारत देश हा किती वैविध्यपूर्ण आहे याचा प्रत्यक्षदर्शी अनुभव घेता आला असल्याचे आकाश आणि अनिकेत यांनी सांगितले. 12 किलो वजन घेऊन हा प्रवास केला असून, या दरम्यान कमीतकमी साहित्य वापरून कसं जगता येतं याचाही अनुभव आकाश आणि अनिकेत यांना आला. सोबतच रात्रीच्या वास्तव्यासाठी मंदिर, मस्जिद, गुरूद्वारा अशा धार्मिक ठिकाणीच थांबले असल्यामुळे त्या-त्या भागातील संस्कृती, भाषा समजली आणि खाद्यपदार्थांचा आस्वादही त्यांनी घेतला. फेसबुकच्या माध्यमातून जोडलेले पण कधीही भेट न झालेले आभासी मित्रांचे ‘रियल’ वास्तव्य या प्रवासामुळे कळले. आभासी जगातील मित्र हे आभासी नसून खरेच असतात हा विश्वास दृढ झाला. फेसबुकवरील मित्रांनी  या संपूर्ण प्रवासाचा खर्च उचलला हे विशेष,  असल्याचे आकाश यांनी सांगितले. फिरस्त्यांना जात, धर्म नसतो, त्यांच्याकडे माणूस म्हणूनच बघितले जात असल्यामुळे माणूसपण किती मोठे आहे हे या प्रवासामुळे शिकता आल्याने विचारांची समृद्धता अधिक वृध्दिंगत झाली, असल्याच्या भावना आकाश आणि अनिकेत यांनी व्यक्त केल्या.  सायकल प्रवासाचा पुढील टप्पा हा कोकणाचा असणार आहे. लवकरच हा प्रवास सुरू करणार असल्याचे आकाश आणि अनिकेत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा