औरंगाबाद महापालिकेची थकीत मालमत्ता कराच्या व्याज आणि दंडावर 100 टक्के सवलत

0
57
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक एप्रिलमध्ये होणार असली तरी आतापासूनच निवडणूक धमाका सुरू करण्यात आला आहे. निवासी मालमत्ता कराच्या थकबाकीवरील व्याज व दंडात 100 टक्के तर व्यावसायिक मालमत्ता कराच्या थकबाकीवरील व्याज व दंडात 75 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी महापालिकेने थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी व्याज व दंडाच्या रक्कमेवर 75 टक्के सवलत दिली होती. या सवलतीचा फायदा अनेकांनी घेतल्याने 22 डिसेंबर 2019 पासून आजपर्यंत सुमारे 45 कोटी रूपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. यातच शनिवारी या सवलतीच्या शेवटच्या दिवशीच महापौरांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांसाठी ही बंपर ऑफर जाहीर केली. 31 मार्चपर्यंत या या योजनेचा लाभ मिळणार असून याअंतर्गत सुमारे शंभर कोटी रूपये थकीत कर वसुल होईल, असा विश्‍वास महापौरांनी व्यक्‍त केला.

  डिसेंबर 2019 मध्ये महापौर नंदकुमार घोडेले यांनी थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी दंड व व्याजाच्या रक्कमेत 75 टक्के सवलत देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार आयुक्तांनी 22 डिसेंबर 2019  ते 22 जानेवारी 2020 दरम्यान विशेष वसुली मोहीम राबवत व्याज व दंडाच्या रक्कमेवर 75 टक्के सवलत दिली. या मोहिमेचा फायदा 6 हजार मालमत्ताधारकांनी घेत 6 कोटीचा कर भरणा केला. त्यामुळे या सवलत मोहिमेला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीपर्यंत विशेष वसुली मोहिमेत मालमत्ता करापोटी सुमारे 45 कोटी रूपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. शनिवारी 75 टक्के सवलतीचा शेवटचा दिवस होता. या पार्श्‍वभूमीवरच महापौरांनी आयुक्‍तांशी चर्चा केली. वारंवार आवाहन करून, नोटिसा बजावून, सवलती जाहीर करूनही अद्यापही मालमत्ता कराची सुमारे 500 कोटी रूपये थकबाकी येणे आहे. ती वसूल करण्यासाठी एकदा शंभर टक्के सवलत जाहीर करण्यासंदर्भात चर्चेअंती महापौर व आयुक्‍तांचे एकमत झाले. यानंतर महापौरांनी दुपारी चार वाजता पत्रपरिषदेत 31 मार्चपर्यंत नागरिकांना थकीत निवासी मालमत्ता कर भरण्यासाठी व्याज व दंडात शंभर टक्के सवलत जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा महापौर घोडेले यांनी केली.

सातारा-देवळाईकरांची ग्रामपंचायतीची परवानगी ग्राह्य: सातारा-देवळाईकरांसाठी दिलासा देणार्‍या निर्णयाची घोषणाही महापौरांनी केली. आजपर्यंत या भागातील मालमत्तांना सातारा-देवळाई ग्रामपंचायतीची बांधकाम परवागनी असतानाही ती ग्राह्य धरली जात नव्हती. त्यामुळे येथील मालमत्ताना पालिका अनधिकृत ठरवून दुप्पट कर आकारत होती. आता ज्यांच्याकडे ग्रामपंचायतीची परवागनी असेल, अशांना सिंगल कर लावून नियमित केले जाणार असल्याचीही घोषणा महापौरांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा