येत्या शैक्षणिक वर्षापासून सामजिक न्यायच्या वसतिगृहांसाठी मध्यवर्ती भोजनालय योजना

0
38
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : सामजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या वसतिगृहांसाठी मध्यवर्ती भोजनालय व्यवस्था येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य मोहन मते यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुंडे म्हणाले, नागपूर येथील गड्डी गोदाम वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाच्या भोजनाबाबत आंदोलन केले होते. चौकशीअंती या वसतिगृहाचे गृहपाल यांची बदली करण्यात आली. तसेच भोजन पुरवठा करणारा कंत्राटदार देखील बदलण्यात आला. अशा स्वरुपाच्या तक्रारींची दखल घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून मध्यवर्ती भोजनालय संकल्पना राबविण्यात येईल. त्याचबरोबर वसतिगृहासंदर्भातील सोयी-सुविधा, भोजन व्यवस्था यांचा दर्जा राखण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. राज्यात सामाजिक न्याय विभागाची मुलींसाठीची जी वसतिगृहे आहेत तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या वर्षभरात मुला-मुलींच्या सर्व वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, असे मुंडे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने जो सकस आहार ठरवून दिलेला आहे, त्यानुसार भोजन दिले जाते. मात्र राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या सर्व ठिकाणच्या वसतिगृहांमध्ये समान दर्जाच्या सुविधा, भोजन मिळण्याकरिता धोरण तयार करत असल्याचे मुंडे यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य संग्राम थोपटे, राधाकृष्ण विखे-पाटील, विकास ठाकरे, रवि राणा यांनी भाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा