औरंगाबादकरांची मनपाकडून फसवणूकः थकीत मालमत्ता कर व्याजात १०० ऐवजी ७५ टक्केच सूट !

0
131
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरवासीयांना खुश करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले  थकीत मालत्ता कराचे व्याज आणि दंडात १०० टक्के सूट देण्याची घोषणा फसवी निघाली. महापौरांच्या घोषणेनुसार मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना १०० ऐवजी ७५ टक्केच सूट मिळाली.

महापौर घोडेले यांनी आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांना विश्वासात घेऊन महिनाभरापूर्वी निवासी मालमत्तांच्या थकबाकीवरील व्याज व दंडात १००  टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेचाच करभरणा सॉफटवेअरमधील तांत्रिक दोषामुळे गेम झाला. त्यामुळे नागरिकांना केवळ 75 टक्के सवलतीचाच लाभ मिळत आहे. परिणामी, शंभर टक्के सवलतीच्या आशेने कर भरण्यासाठी प्रभाग कार्यालयांत येणारे नागरिक निराशेने परतत असल्याचे शुक्रवारी समोर आले.

  डिसेंबर 2019 मध्ये महापौर घोडेले यांनी थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी दंड व व्याजाच्या रक्कमेत 75 टक्के सवलतीची विशेष मोहिम राबविण्याची सूचना आयुक्त पांडेय यांना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार आयुक्तांनी 22 डिसेंबर 2019  ते 22 जानेवारी 2020 दरम्यान विशेष वसुली मोहीम राबवत व्याज व दंडाच्या रक्कमेवर 75 टक्के सवलत दिली. या मोहिमेचा फायदा 6 हजार मालमत्ताधारकांनी घेतला आणि मनपाच्या तिजोरीत 6 कोटींचा कर भरणा केला. त्यामुळे या सवलत मोहिमेला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या मुदतीपर्यंत विशेष वसुली मोहिमेत मालमत्ता करापोटी सुमारे 45 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत आले. नंतर 75 टक्के सवलतीच्या शेवटच्या दिवशी 8 फेब्रुवारी रोजी महापौरांनी आयुक्तांशी चर्चा करून पत्रपरिषदेत 31 मार्चपर्यंत नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी निवासी मालमत्तांना व्याज व दंडात 100 टक्के तर व्यावसायिक मालमत्तांना 75 टक्के सवलत जाहीर केली. या घोषणेनंतर मागील 28 दिवसांपासून निवासी मालमत्ताधारक सवलतीच्या लाभ घेण्यासाठी कराचा भरणा करण्यास प्रभाग कार्यालयांत जात आहेत, मात्र त्यांना केवळ 75 टक्के सवलतीचाच लाभ दिला जात आहे. यावेळी सॉफटवेअरमधील तांत्रिक कारण सांगितले जात आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक कर न भरताच परतत असून महापालिकेनेच आपली फसवणूक केल्याचे म्हणत संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे आजपर्यंत यावर प्रशासनाने महापालिका पदाधिकाऱ्यांपासून ही माहिती लपवून ठेवली. शुक्रवारी ही बाब महापौरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ कर वसुली विभागाचे प्रमुख करणकुमार चव्हाण, तांत्रिक अधिकारी अब्दुल बारी यांना दालनात बोलावून घेतले. मनपा निवडणुकीच्या तोंडावर केलेली घोषणा फसवी ठरल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.

अधिकाऱ्यांनी सूचवले दोन उपायः महापालिकेचे करभरणा सॉफ्टवेअर मुंबईच्या एबीएम कंपनीने विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर याच कंपनीकडून चालवले जाते. मात्र महापालिकेने थकीत बिल अदा न केल्याने कंपनीने काम थांबवले. या सॉफ्टवेअरमध्ये निवासी, व्यावसायिक व इतर मालमत्ता या एकत्रितच आहे. त्यामुळे निवासींना वेगळी व व्यावसायिकांना वेगळी सवलत देताना हे सॉफ्टवेअर अ‍ॅक्सेप्ट करत नाही. त्यामुळे एक तर सर्वच मालमत्तांना थकीत करावरील व्याजात 75 टक्के किंवा 100 टक्के सवलत देण्यात यावी. असे केले तरच सवलतीचा लाभ देता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता सर्वच मालमत्तांना 100 टक्के सवलतः तांत्रिक अडचण जाणून घेतल्यानंतर महापौर घोडेले यांनी निवासी व व्यावसायिक अशा सर्वच मालमत्तांना थकीत कराच्या व्याज व दंडात शंभर टक्के सलत देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार आता आयुक्तांनी महापौरांची ही सूचना मान्य केली तरच शंभर टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. 31 मार्चपर्यंत ही सवलत असेल.

सोमवारपासून व्यावसायिकांनाही लाभः जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे नागरिकांना शंभर टक्के सवलतीचा लाभ मिळणारच आहे. तांत्रिक समस्येमुळे केवळ निवासींना मालमतत्तांना लाभ देता येत नव्हता. करीता आता निवासी व व्यावसायिक अशा सर्वच मालमत्तांना थकीत करावरील व्याज व दंडात शंभर टक्के सवलत देण्याविषयी आयुक्तांना पत्र देऊन सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे घोडेले म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा