मिठागराच्या जागेत परवडणारी घरे बांधण्यासाठी पर्यवेक्षण, सनियंत्रण समिती गठित

0
47
संग्रहित छायाचित्र.

मुंबई : विक्रोळी ते मुलुंड या भागातील एकूण मिठागराच्या जागेपैकी 355 एकर जागेत सामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. यादृष्टीने बृहत् आराखडा तयार करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे. यावर पर्यवेक्षण व संनियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित केली असून, या समितीच्या अहवालाअंती हा प्रकल्प राबवायचा की नाही यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत मुंबईतील विक्रोळी ते मुलुंड या जागेतील मिठागराच्या जागेत परवडणारी घरे देण्यासंदर्भात सदस्य अमित साटम यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले. मंत्री श्री. थोरात म्हणाले, या परिसरात ४० मिठागरे असून, ३५५ एकर जमीन इतके विकसनशील क्षेत्र उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या क्षेत्रात सामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासनाचा आहे. या मिठागर जमिनी केंद्र व राज्य शासन यांच्या मालकीच्या असल्याने सदर जमिनींच्या विकासासंदर्भात्‍ दोन्ही शासनांच्या समन्वयाने धोरण ठरवण्यात येईल.या जमिनींच्या सर्वेक्षणाचे काम आयआयटी मुंबईकडून जिऑलॉजिकल सर्व्हेद्वारे करण्यात येईल. तसेच, येथे 34 एकरात झोपडपट्टीचे अतिक्रमणही आहे. यासंदर्भातील सर्व निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने दिलेल्या अहवालानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा