‘५ वर्षे सत्तेत होतात तेव्हाही औरंगजेबाचे वंशज नव्हता की कसे, तेव्हा संभाजीनगर का केले नाही?’

0
657
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करा, ही मागणी लावून धरली आहे. त्यावरून राजकारणही पेटले आहे. आम्ही काही औरंगजेबाचे वंशज नाही, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झाले पाहिजे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद दौऱ्यात म्हटले होते. त्यावरून काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ‘ तुम्ही पाच वर्षे सत्तेत होतात, तेव्हाही औरंगजेबाचे वंशज नव्हतात की कसे?’ असा सवाल केला आहे.

राज्याच्या सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्यावर पुन्हा राजकारण करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.  औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झाले पाहिजे, ही शिवसेनेची जुनी मागणी भाजपने लावून धरली आहे.  पाच वर्षे सत्तेत असताना भाजपला या मुद्याची एकदाही आठवण झाली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी नुकताच औरंगाबाद दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी आम्ही काही औरंगजेबाचे वंशज नाही, औरंगाबादचे संभाजीनगर झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

‘औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे. आम्ही काही औरंगजेबाचे वंशज नाही आहोत- इति चंद्रकांतदादा पाटील… बरं दादा हे औरंगजेबाचे वंशज गेली पाच वर्षे सत्तेत असतानाही नव्हतात तुम्ही की कसं काय? नाही असेच विचारतोय आपलं. म्हणजे कसं की गेली पाच वर्षे तुमचेच सरकार होते.. मग का नाही बदलले हो नाव?’ असा सवाल जगताप यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा