पुण्यात कोरोनाच्या दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू, आवश्यक काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

0
231

पुणे: दुबईला जाऊन पुण्यात आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आलेले आहे. या दोन्ही रूग्णांना नायडू रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत. या दोन्ही रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. दोनपैकी एका रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तर दुसऱ्या रुग्णांमध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाहीत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

नायडू रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रूग्णांनी यापूर्वीच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी प्रवास केला, त्याची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही व्यक्ती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुबई येथे 40 जणांच्या ग्रुप सोबत फिरायला गेले होते आणि ते एक मार्च रोजी भारतात परतले. या दोन व्यक्तीपैकी एका व्यक्तीने त्रास झाल्यामुळे ८ मार्च रोजी डॉक्टरकडून तपासणी करून घेतली. त्यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. दुबई हे ठिकाण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीत नसल्यामुळे संशयित रुग्ण 1 मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही. भारतात परत आल्यानंतर या दोन्ही व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रूग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत रूग्णांच्या कुंटुंबातील 3 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असे म्हैसेकर म्हणाले.

या दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या एकूण 40 व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे विविध जिल्ह्यातील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करत आहे. या दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीच्या टॅक्सीने मुंबईवरून पुण्याला प्रवास केला आहे, अशा व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांनाही काल रात्री दवाखान्यांत दाखल करून घेण्यात आले आहे, अशी माहिती म्हैसेकरांनी दिली.

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पथकाद्वारे हे दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा