औरंगाबादेतील कोरोना संशयिताची प्रकृती स्थिर, दोन दिवसांत मिळणार स्वॅब तपासणी अहवाल

0
130
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः उत्तर प्रदेशहून औरंगाबादला आलेल्या १६ वर्षीय कोरोना संशिताची प्रकृती स्थिर असल्याचे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय म्हणजेच घाटीच्या सूत्रांनी सांगितले. या रूग्णाच्या स्वॅब तपासणीचा अहवाल उद्या शुक्रवारपर्यंत किंवा शनिवारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

हा कोरोना संशयित बुधवारी आढळून आला होता. त्याला घाटीच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या रूग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवरच महापालिका व जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचे, काळजी घ्यावी, परंतु नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

  बुधवारी श्वास घेण्याच्या त्रासाच्या उपचारासाठी संबंधित युवक घाटीत दाखल झाला होता. कोरोनाच्या संशयावरून या रुग्णाला तातडीने डॉक्टरांच्या पथकासह रुग्णवाहिकेद्वारे चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. येथे तपासणी केल्यानंतर त्यात कोरोनाची लक्षणे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी पुन्हा घाटीत हलवण्यात आले. त्याच्यावर सीव्हीटीएसच्या इमारतीत अतिदक्षतेत उपचार सुरु आहे. हा रुग्ण ऑक्सिजनवर आहे. सध्या त्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता नसून त्याची प्रकृती स्थिर आहे. कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा 48 तास ते 3 दिवसांत प्राप्त होतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले. पुणे येथून हा अहवाल येणार आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी प्राप्त झालेले नवीन व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांसाठी वापरण्याची तयारी घाटी प्रशासनाने केली असल्याचे घाटीचे निवासी डॉक्टर सुरेश हरबडे यांनी सांगितले. तथापि, त्या रूग्णाचा 72 तासांत अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर तो रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास त्याच्या संपर्कात आलेल्यांनाही घाटी प्रशासन, जिल्हा आरोग्य विभाग व महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शोध घेऊन त्यांची तपासणी करावी लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

घाटीत एन-95 मास्क उपलब्धः घाटी रूग्णालयात सध्या पन्नास एन-95 मास्क उपलब्ध आहेत. हा मास्कही केवळ 8 तास वापरता येतो. रुग्णांजवळ असणारे डॉक्टर, परिचारिकांना एन-95 मास्क देण्यात येत आहे. मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या इमारतीत आणखी 30 खाटांचे नियोजन केले आहे. आगामी 3 दिवसांत हे काम केले जाणार असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाः  केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार सर्व प्रशासकीय संस्थांनी असे कार्यक्रम सध्या स्थगित केले आहेत. खासगी संस्थांनीही गर्दीचे कार्यक्रम घेऊ नयेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तथापि, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे नागरिकांनी टाळावे, असेही आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा