दिल्लीच्या ‘मरकझ’मधून औरंगाबादेत परतलेले ४७ जण सापडले, ४० जणांची तपासणी

0
484
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबाद/ नवी दिल्लीः  दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलीग जमातच्या मरकझमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन आलेल्या  औरंगाबादच्या ४७ जणांचा शोध लागला असून आतापर्यंत ४० जणांची तपासणी करण्यात आली आहे. मरकझमध्ये सहभागी झालेल्या ४४१ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. तबलीग जमातच्या मरकझमधून आतापर्यंत १५४८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या मरकझमध्ये सहभागी झालेल्या सर्वच जणांची तपासणी करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारांनी दिल्यामुळे ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दिल्ली येथील हजरत निजामुद्दीनस्थित मरकझ येथील तबलिघ-ए- जमातमध्ये  देश-विदेशातील सुमारे दोन हजार लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे या कार्यक्रम संपल्यानंतर देशभरातील आपापल्या शहरात परतलेल्या लोकांपासून इतरांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या सर्वांचा शोध घेऊन तपासणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादेतही ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

निझामुद्दीनच्या मरकझमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या औरंगाबादेतील ४७ जणांचा आतापर्यंत शोध लागला आहे. हे ४७ जण शहरात परतलेले आहेत. त्यांच्यापैकी ४० जणांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी गांधीनगर भागातील सात जणांना क्रांतीचौक पोलिसांनी घाटी रुग्णालयात भरती केले होते. अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील कार्यक्रम आटोपून आल्यानंतर या सातपैकी सहा जण लग्नाला गेले होते.

दिल्लीच्या मरकझमध्ये जाऊन आलेल्यांना शोधाः दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्लीच्या मरकझमध्ये जाऊन आलेल्या राज्यातील सर्व लोकांचा शोध घ्या आणि त्यांची तपासणी करा, असे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यांच्या आदेशावरून राज्यभरात अशा लोकांचा शोध घेतला जात आहे. या लोकांची तपासणी करून त्यांच्यात लक्षणे आढळून आली तर त्यांना क्वारंटाइन केले जाणार आहे.

निझामुद्दीनमधील १४४ जणांत कोरोनाची लक्षणेः दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात असले तरी ते धुडकावून दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलीग जमातच्या मरकझमध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मरकझमधून आतापर्यंत १५४८ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यापैकी ४४१ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

तामीळनाडूतील ४५ जण पॉझिटिव्हः या मरकझमधील कार्यक्रमात तामीळनाडूतून सर्वाधिक १५०० मुस्लिम गेले होते. त्यापैकी ४५ जणांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची माहिती तामीळनाडूच्या आरोग्य सविच बेला राजेश यांनी दिली. या कार्यक्रमासाठी तामीळनाडूतून गेलेल्या १५०० लोकांपैकी ११३० लोक तामीळनाडूत परतले आहेत. उर्वरित सगळे अजूनही दिल्लीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा