दिल्लीतील मरकजची राज्यात पुनरावृत्ती नको, सर्व धार्मिक सण-उत्सव रद्दचः उद्धव ठाकरे

0
13

मुंबई : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेल पण कोरोनाचे संकट जाईस्तोवर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना बजावले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अधिक काळजी घेण्याच्या आणि मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही केले.

कोणत्याही परिस्थितीत गर्दी दिसली नाही पाहिजे यासाठी जे जे तुमच्या अधिकारांत आहे ते करा. आपण नागरिकांच्या सुविधेसाठी २४ तास दुकाने उघडी ठेवली आहेत. मात्र काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत असे दिसते. भाजीबाजारांतसुद्धा सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजाराला दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

आशा, अंगणवाडी सेविकाची मदत घ्याः सध्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आहे. डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी यांना दिवस रात्र काम करावे लागते. आपण पुढील काही दिवसांत आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनाही मदतीसाठी तयार ठेवा. विविध आवश्यक वैद्यकीय उपकरणे राज्य शासन प्रयत्न करून आणतच आहे मात्र दर्जाहीन आणि मिळेल ते उपकरण घेऊन आरोग्याला धोका करून घेऊ नका, असेही ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा