कोरोनाशी लढाः सरकारी कार्यालये आठवड्यातून एकदाच सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे संकेत

0
346
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात एकदिवसाआड रोज ५० टक्के कर्मचारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता परिस्थितीनुसार सर्व सरकारी कार्यालये आठवड्यातून एकदाच सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत.

कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्राला संबोधित केले. या संबोधनात त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला घाबरून न जाता हिमतीने कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याचे आवाहन केले आहे. गर्दी, अनावश्यक प्रवास टाळा. निष्कारण घराबाहेर पडू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले. गर्दी टाळण्यासाठी कालच सर्व सरकारी कार्यालयात दिवसाआड ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय मी घेतला आहे.  त्यांना वेळा वाटून देतो आहे. कदाचित मी दिवसाआड किंवा आठवडाआड असा निर्णय घेतोय, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या संसर्गाविरुद्ध डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, पोलिस आदि सर्व यंत्रणा अहोरात्र लढत आहेत. त्यांच्यावरचा भार कमी करा. हा भार जेवढा कमी होईल, तेवढी यंत्रणेची कार्यक्षमता वाढेल. त्यामुळे घराबाहेर पडू नका, अनावश्यक प्रवास टाळा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा